Even five-six years ago, when you set foot in any shop, you would see a slogan on the facade,’Nobody gets anything better than time and luck’. Ofcource, since it is a common belief that the shopkeeper makes a lot of money by robbing us, it seemed that the shopkeeper must be presenting his side from that good idea. Now recently these ‘knowledge’ boards have disappeared from shops. But there is no problem in saying that the information about this supernatural ring called ‘bhagya’ or ‘luck’ started from the time started coming to read the board’s in the shops.
अगदी पाच-सहा वर्षांपूर्वी कुठल्याही दुकानात पाय ठेवला की दर्शनी भागातच एक सुविचार दिसायचा, ‘ समय से पहले और भाग्य से जादा किसी को कुछ नही मिलेगा ‘. अर्थात दुकानदार हा आपल्याला लुबाडून खूप कमाई करतो असा सार्वत्रिक समज असल्याने दुकानदार त्या सुविचारातून आपली बाजू मांडत असावा असेच वाटायचे. आता अलीकडे ह्या ‘ज्ञान’ देणाऱ्या पाट्या दुकानातून गायब झाल्यात. पण ह्या ‘भाग्य’ नावाच्या अलौकिक वलयाची माहिती दुकानातील पाटी वाचायला यायला लागल्यापासून मिळायला सुरुवात झाली होती, असं म्हणायला हरकत नाही.

आपलं ‘यश’ आणि आपलं ‘भाग्य’ मापायच्या आपल्या स्वतःच्या काही अटकळी असतात. प्रयत्नपूर्वक आपण जे हस्तगत करतो त्याला आपण ‘यश’ म्हणतो. पण या यशाचे वाटेकरी खूप असतात. किंबहुना दुसऱ्यांना तुमच्या यशाचे श्रेय दिल्याशिवाय ते मिळवलेले यश तुम्हाला पचवता देखील येत नसते. इथे तुमच्या यशाचे श्रेय लाटायला काहीही संबंध नसणारे लोक लगेचच तुमच्याभोवती गर्दी करतात. त्यालाच आपण यशाचा ‘जल्लोष’ असंही म्हणतो. कारण ‘मतलब’ नसेल तर तुमच्या आनंदोत्सवात सामील व्हायला वेळ कुणाजवळ असेल ? असो….तर हे झालं यशाचं. आता तुम्ही काहीही प्रयत्न न करता, तुमच्या ध्यानीमनी नसताना किंवा तुमच्या ‘अवतीभवती’ असणाऱ्यांच्या देखील ध्यानीमनी नसताना तुम्हाला चकित करण्यासारखे काही मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं..? इथं भाग्याचा संबंध येतो. यालाच आपण भाग्य म्हणतो. असा ‘बोनस’ परमेश्वराकडून प्रत्येकाला मिळत असतो. त्यामुळेच मिळाले तर माझ्या भाग्यात होते अन नाही मिळाले तर….एव्हढं कुठलं ‘भाग्य’ आमचं..? अशी विचारधारा आपल्या डोक्यात कायमस्वरूपी फिट्ट बसलेली असते. बरं प्रत्येक वेळी परमेश्वर आपल्याला हा बोनस देईल याची आपल्याला देखील खात्री नसते. त्यामुळे ‘भाग्य’ ही लॉटरी आहे. म्हणूनच ‘भाग्याचे’ अस्तित्व मान्य केले असले तरी प्रयत्नातून ‘यश’ मिळते यावरचा माणसाचा विश्वास कायम आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे’ ही दुर्दम्य आशावाद जागवणारी म्हण त्याचेच प्रतीक आहे.

प्रत्यक्ष अंगमेहनतीच्या कामात जर आपण ‘भाग्य’ किंवा ‘नशिबावर’ अवलंबून राहिलो तर यश आपल्याला मिळणारच नाही. पण प्रतिकूल परिस्थिती असतानाही सतत हुलकावणी देणाऱ्या निसर्गाशी सामना करत केवळ नशिबावर भरोसा न ठेवता स्वतःच्या प्रयत्नांवर आपली ‘शेती’ फुलविणारा शेतकरी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. लहरी पाऊस आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही शेतकरी आपल्या शेतात राबून धान्य पिकवतो ते खरं शंभर नंबरी यश असतं. अर्थात शेतकरी जर नशिबावर विसंबून राहिला तर त्याच्या पदरी निराशा आणि दुःखाशिवाय काहीच मिळत नाही. मग तो आपल्या भाग्याला दोष देत बसतो. पण शेती फुलविणे किंवा कोणत्याही निर्मितीचे कार्य करणे ही भाग्यावर अवलंबित बाब नसून ती परिश्रमावर अवलंबित असते. हेच सत्य आहे. नशीब-भाग्य हे जरी तुमच्या जीवनात प्रवेश करणारे सुखदायक घटक असले तरी प्रयत्नपूर्वक परिश्रम करणाऱ्याच्या जीवनात हेच भाग्य सुखस्थानात कायमचं ठाण मांडून बसते.

आपल्याला हे समजत नाही असं मुळीच नाही. पण ‘कळतं पण वळत नाही’ या स्थितीत आपण गेलेलो असतो. जरा काही आपल्या मनाविरुद्ध घडले, कमी यश मिळाले किंवा अपयशी ठरलो की आपण भाग्याच्या नावाने आणि परमेश्वराच्या नावाने रडायला-भेकायला सुरुवात करतो. ज्या निसर्गाच्या पोटावर राहून आपले जीवन फुलवितो, त्या निसर्गाला आपण दोष द्यायला लागतो. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला परमेश्वर आणि निसर्गाकडून विनासायास हवी असते. ‘ दे रे हरी…खाटल्यावरी ‘चा जप करत हातावर हात ठेवून बसून राहिलात तर हरी देणार आहे का ? आपल्याला आयतं मिळालं नाही तर परमेश्वर आणि निसर्ग आमच्या ‘भाग्यात’ नाही असं म्हणायला आपण मोकळे होतो….पण परमेश्वर आणि निसर्गाला म्हणायची सोय आहे का ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा