It is said that it takes ‘luck’ to make things happen and what happens as we thought. Then see, you will feel many stressful situations in your life automatically dissolve. Once the effects start to subside, you can work harder on the changes.
असं म्हणतात की, मनाप्रमाणे घडायला ‘भाग्य’ लागतं आणि आपल्या सोबत जे घडतंय ते देखील आपण विचार केला होता असंच घडतंय. मग बघा, तुमच्या आयुष्यातील कितीतरी तणावाचे प्रसंग आपोआप विरघळलेले तुम्हाला अनुभवता येतील. एकदा का परिणामांची तीव्रता कमी जाणवू लागली की तुम्ही त्याच्या बदलांवर अधिक जोरकसपणे काम करू शकता.

माणसाचं मन फार चंचल तर असतंच पण ते मत्सरी पण असतं. दिवसभर आपण जे काम करतो, त्यातील नव्वद टक्के भाग आपण फक्त आणि फक्त मत्सरातून कुणाशी तरी सतत स्पर्धा हवी या इर्षेपोटी करत असतो. आपल्याला काहीतरी करावेसे मनापासून वाटणे हा केवळ दहा टक्केच भाग असतो. म्हणजेच कोणतेही काम जर आपण इर्षेपोटीच करणार असू तर त्या कामाचे फलित काय असणार ? पुन्हा त्यातून नव्या ईर्षेचा जन्म होणार. कोणतीही इच्छा, ईर्षा, स्पर्धा न करता जर आपण कार्य करू शकलो तर त्याचे फलित म्हणून ‘समाधान’ तर नक्कीच आपल्या पारड्यात पडणार आहे. याशिवाय नवनिर्मिती आणि परिवर्तनाचे आपण साक्षीदार ठरू. पण आपल्या आयुष्यातील बदल देखील इतरांशी तुलना करत ठरवत असल्याने आपली बदलाची व्याख्या देखील ‘इतरांच्या तुलनेत’ अशीच असते.

आपण एखाद्याशी तुलना किंवा बरोबरी करायला लागलो की ती एव्हढ्या व्यक्तिगत पातळीवर नेतो की त्याच्या स्वयंपाक घरातील भांडी देखील आपल्या घरातील भांड्यापेक्षा वेगळी असू नयेत. किंबहुना तो जी वस्तू खरेदी करेल ती वस्तू लगेचच आपल्याकडेही हवीच. शेवटी ज्याच्याशी आपण बरोबरी करतोय त्याचा आवाका आणि आपला आवाका याची बरोबरी होतेय का ? हे तरी बघितले पाहिजे. मुळात बरोबरीच्या माणसांशी तुलना करण्यात आपल्याला कोणतेच स्वारस्य नसते. कारण त्यात जिंकल्याची कोणतीच भावना तयार होत नसते. आपल्यापेक्षा कमी आवाक्याचा असेल तर तो कधीच आपली बरोबरी करू शकत नसल्याची आपल्याला खात्री असते. त्यामुळे त्याच्याशी बरोबरी न करताच आपण जिंकलेलो असतो. मात्र आपल्यापेक्षा अधिक आवाका असणाऱ्याशी बरोबरी किंवा स्पर्धा करणं म्हणजे स्वतःला विजयी समजणं हे अधिक सुखावह असल्याने आपल्यापेक्षा अधिक आवाका असणाऱ्याशी नेहमी आपण स्पर्धा करतो. पण शेवटी दैव, नशीब, प्रारब्ध नावाची एक अदभूत-अलौकिक अशी शक्ती असते. तिचे अस्तित्व जर आपण मान्य करणार असू तर जेव्हढं आपल्या भाग्यात आहे तेव्हढंच आपल्याला मिळणार आहे यावर आपला विश्वास नक्कीच बसतो. किंबहुना जे आज आपल्याजवळ आहे ते आपल्या मनासारखे आहे हे स्वीकारण्याची देखील आपली मानसिकता तयार होते.

मुळातच समोर किती बलाढ्य संकट उभे राहिले आहे यावर आपला विजय किंवा पराजय अवलंबून नसतो. समोर बलाढ्य शक्ती जरी उभी ठाकली तरी तुम्ही तिचा सामना करून तिला पराभूत करू शकता मात्र त्यासाठी कणखर मनाची आवश्यकता असते. हे कणखर मन कुठल्या देवळात किंवा बाजारातील कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नाही. मन तर तुमच्या जवळच असते, फक्त त्याला कणखर बनवायचे असते. त्यासाठी कुठलीही मेडिकल थेरपी नाही तर एकाग्रता हीच मनाला कणखर बनवू शकते. याकरिता रोज सांजवेळी अंधारून येत असताना काही वेळ अगोदर स्वतःला एकाग्र अवस्थेत घेवून जा. यासाठी अगदी सहज आणि सोपा उपाय करता येवू शकतो. सांजवेळी घरातल्या खिडकीपाशी जावून बसा. सकाळची लगबग, धावपळ सगळी शिथिल झालेली जाणवेल. रस्त्यावरून घराकडे परतणारी गर्दी जरी वेगात असली तरी ती फक्त घरी जाण्याची ओढ मनात घेतलेली असते. त्यामुळे तिच्या वेगात तणाव नसतो. हीच मनातून शांत होण्याची एक चांगली वेळ आहे. बसताना फक्त अवयवांना शिथिल करू नकात तर सर्व इंद्रियांना देखील विचारमुक्त करा. मग बघा अपेक्षित परिणाम नक्की मिळेल. रात्रीचे जेवण घेतल्यावर नक्की तुम्हाला तणावमुक्त झोप लागेल. शेवटी आपल्या आयुष्यात तणाव निर्माण व्हायला आपणच कारणीभूत असतो. त्यामुळे तणावमुक्त होण्याचे उत्तर देखील आपल्याकडेच असते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा