ॲटीट्युड नको… इतरांबद्दल आदरभाव हवा

Never play with other people’s feeling’s, because you may win the game but the risk is that you will lose that person for life.

:- William shekespeare

जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर म्हणतो की, तुम्ही इतरांच्या भावनांशी कधी ही खेळू नका, कारण तुम्ही खेळ जिंकू शकाल पण धोका असा आहे की तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी गमवाल. भावभावनांच्या कल्लोळात स्वार्थ आणि संघर्षातून निर्माण होणारी शोकांतिका पंधराव्या-सोळाव्या शतकात शेक्सपिअरच्या साहित्य लेखनातून अत्यंत प्रभावीपणे आली. याचा अर्थ भारतात किंवा इतर देशात त्याच्या इतके प्रभावी लेखन कुणी केले नाही का ? हा ‘वाद’ इथे अपेक्षित नाही. आजकाल कुठल्याही विषयाचा उलगडा करताना त्यात गोंधळ उडवून देण्याकडे अधिक कल असतो. तर शेक्सपिअरने मांडलेले वरील ‘मत’ हे कालातीत आहे. चारशे-साडेचारशे वर्षानंतरही त्याचे हे मत आपल्याला प्रत्ययाला येते. म्हणूनच विषयाची सुरुवात करताना आंग्ल भाषीय नाटककार शेक्सपिअरच्या ‘कोट्स’चा संदर्भ घेतलाय.

नकारात्मक किंवा व्यंगात्मक वृत्तीच्या माणसांमध्ये पराकोटीची न्यूनगंडाची भावना बळकट झालेली असते. अशा व्यक्तीला केवळ नम्रतेने आणि प्रामाणिकपणे यास्थितीतून बरे करता येते. आपल्या ‘अवतीभवती’ अशी अनेक माणसे आपल्याला दिसतात. फार कश्याला आपण स्वतः देखील काही बाबतीत न्यूनगंडाची शिकार झालेलो असतो. मुळात न्यूनगंड असणे हा काही असाध्य रोग नाही की जो बराच होवू शकत नाही. त्यामुळे त्याविषयी अपराधीपणाची भावना ठेवणे गैर आहे. उलट अपराधीपणाची भावनाच आपल्यात असलेल्या न्यूनगंडाला बळकटी देते. आपल्याला समोरच्या व्यक्तीची कुठलीच गोष्ट मान्य नाही हा पवित्रा घेतच संवादाला सुरुवात केली जात असल्याने या संवादाचे सुसंवादामध्ये रूपांतर होण्याऐवजी त्याचे विसंवादामध्ये रूपांतर होत आहे. याचा परिणाम म्हणजे दोन समविचारांच्या व्यक्तिदेखील फारकाळ एकत्र राहू शकत नाहीत. याचा थेट परिणाम कुटुंब व्यवस्था आणि विवाह व्यवस्थेवर होवू लागला आहे. अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. जन्मभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेवून सुद्धा त्या फलद्रुप होतानाचे प्रमाण घटू लागले आहे. एकतर नकारात्मकता वाढीस लागल्याने त्याबरोबरच इतरांचे चांगले ते सुद्धा ऐकून घेण्याची मानसिकता राहिलेली नाही. आपल्याला जेव्हढी माहिती आहे तीच पूर्णसत्य आहे, त्यामध्ये अजून काही बदल नाहीत हा समज त्याच्या ‘इगो’मध्ये रुपांतरीत होतो. पुढे हाच ‘इगो’ गर्दीतही त्याला जेंव्हा एकाकी बनवतो त्यावेळी त्याच्यामध्ये न्यूनगंड वाढीस लागतो. बरं, अशा माणसाला न दुखावता त्याच्याशी सलगी ठेवावी असा विचार देखील बऱ्याचवेळा अंगलट येतो. कारण अशा इगोइस्टिक व्यक्तीचा ‘इगो’ गोंजारण्यामुळे तो अधिकच व्हायब्रन्ट होतो. ‘मीच बरोबर…माझंच खरं’ या त्याच्या समजुतीने तो अधिक आक्रमक आणि काहीवेळा हिंसक देखील बनतो. अशा व्यक्ती कधी ‘नॉर्मल’ होवू शकत नाहीत का ? तर होवू शकतात. पण त्यासाठी मेडिटेशन हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. वैद्यकीय भाषेत हा जरी आजार समजला जात असला आणि त्याचे कितीही प्रकार असले तरी हा आजार दोन-चार टॅबलेट खावून बरा होणारा नक्कीच नाही. त्याला मनःशांतीची खूप आवश्यकता असते.

स्वतःचं आयुष्य हे आपण कितीही व्यक्तिगत समजत असलो तरी ते सोबतीशिवाय सरत देखील नसते. अशावेळी आपल्या सोबत चालणाऱ्या व्यक्तीला आपण जर सतत उणिवा दाखवत त्याच्यासमोर कमतरतेचा आभास निर्माण करत असू किंवा ती व्यक्ती आपल्यापेक्षा काकणभर सरसच आहे या न्यूनगंडातून त्याला सारखे अपमानित करण्याचा आसुरी आनंद मिळविण्याचा प्रयत्न करत असू तर अशावेळी ती व्यक्ती दुरावण्याचीच अधिक शक्यता असते. आपण पर्वत किती चढलो हे जाणून घेण्यासाठी जसं एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर मागे वळून खोल दरीचा अदमास घेत असतो. त्यावर लगेच अंदाज येतो आता अजून किती चढायचं आहे. अगदी तसंच आयुष्याचं पण असतं….एका टप्प्यावर मागे वळून पाहिलं की आपल्याला कळतं की अजून किती मार्गक्रमण करायचं आहे. त्यामुळे चांगलं काहीतरी घडण्यासाठी जेव्हढी सकारात्मक स्पर्धा किंवा ईर्षा हवी तेव्हढीच ती अंगी बाणावी. आणि हो…शक्यतो तिचा वापर करूच नये पण करावा लागला तरी तो बाहेरच्या जगात करावा…..घरातल्या लोकांबरोबर ईर्षा नको. विषाणूंना मारण्यासाठी त्याच विषाणूंच्या एका जनरेशनला पुनर्स्थापित करतात. अगदी तसंच…!

यावर आपले मत नोंदवा

Comments (

1

)

  1. gosavimanik123

    मीपण चांगले नाही
    ✍️✍️👌👌

    Liked by 1 person