When we tackle obstacles, we find hidden reserves of courage and resilience we did not know we had. And it is only when we are faced with failure down realise that these resources were always there with in us. We only need find them and move on with our lives.
:- A. P. J. Abdul Kalam.
जेंव्हा आपण अडथळ्यांचा सामना करतो तेंव्हा आपल्याला धैर्य आणि लावचिकतेचे छुपे साठे आपल्यामध्येच असल्याचे दिसून येतात. जे आपल्याला माहीत नव्हते आणि जेंव्हा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो तेंव्हाच आपल्याला हे समजते की, ही संसाधने आपल्यामध्ये नेहमीच होती. आपण फक्त त्यांना शोधून आपल्या जीवनात पुढे जाणे आवश्यक आहे.

स्वतःला सिद्ध करताना आपली नेहमीच अडचण होत असते. कारण आपण आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांना पूर्णपणे ओळखलेले नसते. एकदा का आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांशी आपण पूर्ण परिचित झालो की मग कुठल्याही आव्हानांशी सामना करायला आपण समर्थ असतो. आपल्या इंद्रियांशी जोडलेल्या सर्वप्रकारच्या क्षमता ह्यांचे आपण दोन प्रकारात वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे सुप्तावस्थेतील क्षमता आणि दुसरी म्हणजे निद्रिस्थावस्थेतील क्षमता ह्या दोन प्रकारात मोडणाऱ्या क्षमता मनुष्यप्राण्याला कवचकुंडलासारख्या जन्मजात (इनबिल्ट) मिळालेल्या असतात. ज्यांना ह्या क्षमतांचा वर्गीकरणानुसार नुसता परिचयचं नाही तर त्या क्षमतांचा नेमका कधी आणि कसा वापर करायचा ? हे माहिती होते असा माणूस आलेल्या संकटावर मात करत यशस्वी होतो. ज्यांना स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांचा पूर्ण परिचय झालेला नसतो किंवा त्याचा नेमका कधी आणि कसा वापर करायचा हे माहीत झालेले नसते, अशी माणसे समोर आलेल्या संकटांना सामोरे जाण्यापूर्वीच गर्भगळीत होतात. परिणामी अशी माणसे जीवनात ‘यशस्वी’ होवू शकत नाहीत.

कितीही गुंतागुंतीचा, जटिल आणि तणाव वाढविणारा प्रसंग असला तरी त्यावेळी जो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवीत शांत आणि निर्विकार राहू शकतो त्याचे अर्धेअधिक प्रश्न सुटलेले असतात. एकदा का तणाव निर्माण करणाऱ्या प्रश्नातून तुमची सुटका झाली की मग नुकसानदायक घटनांची तीव्रता आपोआप कमी होते. मग राहतो प्रश्न तो वेळेचा अपव्यय आणि निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे रेंगाळलेली मनःस्थिती या दोन्हीवरही ताबा मिळवीत स्थिती पूर्वपदावर आणता येते. होणारे नुकसान अटळ असले तरी कमीतकमी नुकसान हा पेलवणारा मार्ग हाताळता येतो. अर्थात अचानक उद्भवलेल्या स्थितीत गोंधळ निर्माण होवू न देता शांततेने प्रसंग हाताळण्याचा प्रयत्न करणे हे आपल्याच हाती असते.

समाजरचनेत वावरताना माणसाने स्वतः भोवती विविध सुरक्षा वलयांची निर्मिती केली आहे. या वलयांमध्ये त्याला सुरक्षित असल्याची अनुभूती मिळत असल्यानेच तो या वलयांच्या बाहेर पडू इच्छित नाही. जात-धर्म हे समाजरचनेने घालून दिलेली सुरक्षा वलये आहेत. संस्कारक्षम समाजरचना हीच कोणत्याही धर्माची प्रमुख मांडणी आहे. म्हणजेच जन्मबरोबरच चिटकून येणारी जात आणि धर्म ही अपरिहार्य वलये असली तरी जगण्यासाठी माणसाला तेव्हढेच पुरेसे नाही. संस्कारक्षम माणूस म्हणून जगताना त्याला त्यासाठी नेमून दिलेले किंवा वाट्याला आलेले कर्म हे करावेच लागते. माणूस जगला तर धर्माचे अस्तित्व राहणार आहे. त्यामुळेच जगण्यासाठी जे ‘कर्म’ करावे लागते त्यापेक्षा मोठा कोणताच ‘धर्म’ नाही. आणि ‘कष्टा’ पेक्षा कोणतेच मोठे कर्म नाही. हे कर्म करताना जे काही अडथळे आणि पेच-प्रसंग समोर उभे राहतात, त्यावर मात करण्यासाठी माणसाला उसणवारीची शक्ती उपयोगी पडत नसते. तर ती शक्ती त्याच्यामध्येच जन्मजात असते. शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व मिळालेल्या जीवाला आपण ‘स्पेशल’ म्हणतो. पण अशी स्पेशल माणसेही आपल्या अपंगत्वावर मात करीत जन्मजात मिळालेल्या क्षमतांचा वापर करीत ते अडथळ्यांनी खच्चून भरलेल्या आपल्या आयुष्याचा रथ योग्य मार्गावर आणत त्याला गती देत यशस्वी देखील होतात. जर विकलांग व्यक्ती ही गोष्ट करू शकतात तर मग सुदृढ माणूस का करणार नाही…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा