According to Hindu religion, Ptrupaksha fortnight is from 29th September to 14th October. During this time, ancestors come from Yamaloka. As this period is considered inauspicious, no auspicious work, new purchases are made during this period. The ritual of offering Shradha to the ancestors who come home is important. But once this Pitrupaksha fortnight is over, preparations for Navratri start immediately. Therefore, house cleaning and painting work is done. Old utensils, household items that are stuk culture, which is on the way to total oblivion is polished again.
हिंदू धर्मशास्त्रानुसार काल दि. २९ सप्टेंबर पासून १४ ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष पंधरवडा आहे. याकाळात यमलोकातून पितरं येतात. हा काळ अशुभ मानला जात असल्याने याकाळात कोणतेही शुभकार्य, नवी खरेदी केली जात नाही. घरी येणाऱ्या पितरांचे श्राद्ध घालणे या धर्मक्रियेला महत्व असतं. पण हा पितृपक्ष पंधरवडा संपला की लगेचच नवरात्रीची तयारी सुरू होते. त्यामुळे घराची साफसफाई, रंगरंगोटीची कामे काढली जातात. अडगळीत पडलेली जुनी भांडी, संसारोपयोगी वस्तू पुन्हा घासूनपुसून लखलखीत केल्या जातात. एकूणच विस्मरणाकडे जात असलेली भारतीय संस्कृती पुन्हा घासूनपुसून लखलखीत केली जाते.

निवडणे-पाखडणे हे घरातल्या महिलावर्गाचे अत्यंत अंगमेहनतीचे आणि डोकेदुखी वाढविणारे काम अलीकडे जवळपास हद्दपार झाल्यात जमा आहे. मॉल आणि सुपर स्टोअरमधून स्वच्छ, निवडलेले किराणा सामान खरेदी करण्याकडे शहरी लोकांचा कल वाढल्याने शहरी भागातील घरांमधून सूप जवळपास गायब झाले आहेत. कित्येक घरांमधून मंगलकार्यप्रसंगी पूजेसाठी लागते म्हणून ‘सूप’ खरेदी केलेले असते. एकदा त्याचा वापर झाला की त्याची अडगळीच्या खोलीत रवानगी होते. पूर्वी शेतात पिकलेले धान्य शेतकरी तसेच घेऊन घरी यायचा. मग घरातील महिला धान्य चाळून घेणे, पाखडून, निवडून त्याचा वापर करायच्या. अजूनही ग्रामीण भागात कष्टकरी वर्गातून ही प्रथा सुरू आहे. पूर्वीच्या रूढी-परंपरा ह्या दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तूंशी देखील संस्काराचे नाते सांगणाऱ्या होत्या. आता पितृपक्ष पंधरवडा संपला की ग्रामीण भागात वेगवेगळ्या आकारातील सूप, दुरड्या, डाली, टोपले नव्याने खरेदी करून त्याला ऑईल पेंट लावून गच्चीवर वाळत ठेवलेले दिसतील.

रोजगारासाठी गावाकडची शेती दुसऱ्याच्या भरवश्यावर टाकून शहरात चाकरमानी म्हणून शहरी जीवन जगणारी गावाकडची माणसं आता पूर्णपणे बदलून गेलीत. त्यांचे राहणीमान, बोलणे, खाणे-पिणे सगळंच शहरी झालंय. गावाकडचा रांगडेपणा आता त्यांच्या वागण्यात दिसत नाही की खाण्यातला झणझणीतपणा नाहीसा होवून सपकपणा आलाय. घरातल्या ग्रामीण बाज दाखवणाऱ्या भांड्याकुंड्याची जागा आता स्टेनलेस स्टील आणि कॉपरबेस भांड्यांनी घेतलीय. शिजवलेले पदार्थ गरम रहावेत म्हणून आणि पोळ्या-भाकरीसाठी हॉट पॉट आलेत. मग बांबूच्या कामट्या पासून विणलेल्या दुरड्या, टोपल्या घरात कश्या राहतील. त्या बिचाऱ्या शहरात काही रमेनात. घरातली मालकीण जर तिला जवळ करणार नसेल तर दुरडीने जायचे कुठे ? ती काही शहरी होईना.

भारत हा कृषिप्रधान आणि खेड्यांचा देश आहे. ग्रामीण संस्कृती हीच भारताची खरी ओळख आहे असं संधी मिळेल तेंव्हा बोलणारा शहरी माणूस एरव्ही मात्र ग्रामीण संस्कृतीची हेटाळणी करायला, त्याला रानटी, मागासलेली जीवनसंस्कृती मानतो. उपलब्ध सुविधा आणि पाश्चात्य संस्कृतीची भुरळ पडलेला शहरी माणूस ग्रामीण संस्कृतीपासून खूप गेलाय. आपली नाळ अजून टिकून आहे हे दाखवण्यासाठी मात्र त्याने ग्रामीण संस्कृतीचा बाजार मांडला आहे. अलीकडे ढाबा संस्कृतीमध्ये ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा सेट उभारून खवैय्यांना ग्रामीण चवीचे पदार्थ खावू घालण्याचे दावे करत व्यवसाय करण्याकडेच अधिक कल दिसून येतो. फॅमिलीसह भोजनाचा आनंद घ्यायला आलेला ग्राहक आपल्या मुलांना दुरूनच खिलारी बैलांची जोडी, बैलगाडी दाखवतो. उभारलेल्या स्टॅच्यु कडे बोट दाखवून तो शेतकरी, ती शेतात राबणारी महिला असं मुलांना दाखवत सुखावतो. ग्रामीण संस्कृतीचा एव्हढाच आता संबंध उरलाय…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा