Do you have any role model in your generation today ? If we ask such a question. It is like stumbling. Today, i am 57 years old, and I can count on my fingers the names that I would like to mention as role models of my generation. In other words, unfortunately we can say that my ‘generation’ has completely failed in creating ‘ideal’ in the society. Why should this happen…?
आज तुमच्या पिढीमधील तुमचा कुणी ‘आदर्श’ आहे का ? असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर अडखळल्या सारखं होतं. आज मी ५७ वर्षे वयाचा आहे. मला माझ्या पिढीतील आदर्श व्यक्ती म्हणून ज्यांचा उल्लेख करावासा वाटतो अशी बोटावर मोजण्याइतकीच नावे सांगता येतील. म्हणजेच समाजात ‘आदर्श’ निर्माण करण्यात माझी ‘पिढी’ सपशेल फेल गेली असं दुर्दैवाने आपण म्हणू शकतो. हे असं का व्हावं….?

सध्या सोशल मीडियावर व्यक्त केली जाणारी भाषा, सभ्यता आणि ज्ञान लालसेचे अगदीच मृत पातळीवर घसरलेले प्रमाण पाहता आमच्या पिढीतुन म्हणजेच साठीकडे झुकलेल्या पिढीमधून समाजाला सुसंस्कारित मार्गावरून नेणारा ‘आदर्शवाद’ जोपासला गेला नाही. हे स्पष्टच आहे आणि याची खंत देखील माझ्या पिढीला मरेपर्यंत राहील.(अर्थात ते भौतिक सुखाच्या स्वप्नरंजनामधून बाहेर पडणार असतील तर) १९६५ नंतर जन्मलेली पिढी ही खऱ्या अर्थाने सुखासीन काळात जन्मलेली पिढी म्हणून ओळखल्या जाते. आमच्या अगोदरच्या पिढ्या ह्या पारतंत्र्यात जन्माला आल्या होत्या. हे त्यांचे दुर्दैव असले तरीदेखील स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणारा राष्ट्रवाद त्यांच्या धमन्यांमधून सळसळत होता. संस्कृती, सभ्यता, राष्ट्रभक्ती, सन्मानजनक वागणूक याची भूक त्या पिढ्यांना होती, कारण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांचा जन्म झाल्याचा ‘आदर्शवाद’ त्यांच्यामध्ये जोपासला गेला होता. समाजाला दिशा देणारे आदर्शवादी महापुरुष असेच जन्माला येत नसतात. निसर्गाची प्रतिकुलता आणि मानवाची असहायता जेंव्हा अस्तित्व नष्ट होण्याच्या धोक्याच्या रेषेजवळ जाते तेंव्हाच आदर्शवादी जन्माला येतो. साठच्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात जन्मलेल्या पिढ्या ह्या सुख लोलुप का झाल्या ? हा प्रश्न मात्र आता सगळ्यांना सतावणार आहे.

पारतंत्र्यात जन्मलेल्या पिढ्यांसमोर स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय समोर ठेवण्यासाठी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे अनेक वीर, धर्मचिकित्सक, समाजचिकित्सक, सुधारणावादी अशी भली मोठी ‘आदर्शांची’ मांदियाळी होती. स्वातंत्र्यानंतर….ही आदर्शांची मांदियाळी भिंतीवरच्या तसबीरीमध्ये जावून अडकली. एकदाचे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे, आता आपण आपल्या देशात मुक्ततेचा, अभिव्यक्तीचा उपभोग घ्यायला मोकळे झालोत हा अभिनिवेश समाजाच्या अंगी आला का ? कदाचित स्वातंत्र्यानंतर फाळणीच्या पार्श्वभूमीवर एकसंध असणाऱ्या विचारधारेचे दोन प्रवाह तयार झाले. पुढे याच मुख्य दोन विचारधारेचे शकले उडून अनेक विचारप्रवाह निर्माण झाले. अनेक विचारप्रवाह ही स्थिती समाजासाठी तोपर्यंतच घातक नसते, जोपर्यंत एखादी विचारधारा अनुयायीत्व स्वीकारावे म्हणून अधिक जहाल आणि कर्मठ बनत नसते. लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या भारताला नेमका हाच धोका झाला. राष्ट्र उभारणीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्याच्या काळात आमच्या पिढीचा म्हणजेच १९६० नंतरच्या पिढीचा जन्म झाला. स्वातंत्र्य मिळविलेल्या आपल्या देशात रोजच्या जगण्याची लढाई खेळण्याचे चाकरमानी शिक्षण घेणाऱ्या आमच्या पिढीला भिंतीवरच्या तसबीरीत अडकलेले स्वातंत्र्य चळवळीतील ‘आदर्श’ नकोसे झाले. आम्हाला अधिक उग्रपणे आपल्या झोळीत भौतिक गरजा टाकणारी विचारधारा आणि तिचे वाहक आवडू लागले. तत्वज्ञ, विचारवंत, समाज चिकित्सक अशा तटस्थ महर्षींना बाजूला सारून जेंव्हा राजकीय क्षेत्रातील नेतृत्व ‘आदर्श’ बनू लागतात. तेंव्हा त्या देशात वैचारिक अनागोंदी सुरू आहे असं समजायला हरकत नसते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारधारा जेंव्हा राजकीय पक्षाची ओळख म्हणून रुजली तेंव्हा सगळ्यात पहिल्यांदा समाजाचा घात झाला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळ उभारली ती काळाची गरज होती. काँग्रेसला बळकटी दिली ती त्याच हेतूने. आपण मात्र त्यांना राजकीय देवत्व देवून बसलो. त्यांची धर्मचिकित्सा, समाजचिकित्सा, अहिंसावाद, तत्वज्ञ या आदर्शांची आपणच पायमल्ली केली. एकदा का महात्मा गांधींनाच राजकीय देवत्व दिले मग त्यानंतर प्रत्येक विचारधारेचे, जातीचे, धर्माचे राजकीय व्यासपीठावरील नेतेमंडळी आदर्शाचे मुखवटे घालू लागले. जाती-धर्मात विभागणी सोबत भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेला समाज आदर्शहीन आणि दिशाहीन होत गेला. राजकीय व्यक्तींबद्दल अधिक आक्रमक आणि कडवेपणा अंगिकारणाऱ्या नव्या पिढीसमोर आता राजकीय नेत्यांबरोबरच बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते ‘आदर्श’ आहेत. आता पुढे समाज कोणत्या वळणावर जाणार आहे ? त्याला दिशा दाखवायला हे आत्ताचे ‘आदर्श’ समर्थ ठरतील का ? याचे उत्तर काळच देईल. आमच्या पिढीला मात्र ही सल मरेपर्यंत राहील की आम्ही ‘आदर्श’ निर्माण करू शकलो नाहीत.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा