काही ठिकाणं आपल्याला चुंबकीय शक्तीने खेचतात..!

We always leave our village and visit different villages and cities on different occasions. Some times for work and sometimes for sightseeing, our coming and going to certain places is increased. Especially if we visit the village of our dear relatives at least once in a year. Many such villages are engraved in our brains. As if these villages become our own villages. Some of the places there are linked to us forever by a different bond.

आपण आपला गाव सोडून नेहमीच वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांना-शहरांना भेटी देत असतो. कधी कामानिमित्त तर कधी भ्रमंतीनिमित्त काही ठराविक ठिकाणी आपलं येणं-जाणं वाढलेलं असतं. विशेषतः आपल्याला प्रिय असणाऱ्या नातेवाईकांच्या गावाला तर वर्षातून एकदा का होईना आपली भेट ठरलेली असतेच. अशी अनेक गावे आपलीच गावे बनून जातात. तिथल्या काही जागा तर आपल्याशी वेगळ्याच ऋणानुबंधाने कायमच्या जोडल्या जातात.

आता तुम्ही म्हणाल २०४० सालापर्यंत माणूस चंद्रावर रहायला जायची स्वप्नं बघू लागलाय अशा कालखंडात तुम्ही आपल्या आजूबाजूच्या ठिकाणांचं ‘स्थानमहात्म्य’ काय घेवून बसलात….खरंय तुमचं, पण चंद्रावर पाऊल ठेवायची ओढ ही पण एक चुंबकीय शक्तीच म्हंटली पाहिजे ना ! इतर प्राणिजीवांसारखंच मनुष्यप्राणी देखील ‘भटका’च आहे. फक्त संवेदना आणि बुद्धीचा वापर करणारा माणूस असल्याने प्रत्येक गोष्टीशी तो भावनाशीलतेनेच जोडल्या जात असतो. एखादं ओसाड माळरान असावं आणि त्याच्या माथ्यावर बरोबर मध्यभागी एखादं घनदाट डेरेदार वृक्ष असावा. त्याच्या सावलीच्या ओढीने सूर्य डोक्यावर घेऊन माळरानातील ‘कुसळ’ तुडवत जाण्याचा मोह कुणालाही होईल. मग अशा एखाद्या डेरेदार झाडाखाली विश्रांती घेतलेल्या व्यक्तीला ते उजाड माळरान देखील आवडीचे ठिकाण बनून गेले तर त्यात नवल कसले ? भ्रमंतीला ठरवून कधी निघायचंच नसतं. सगळं कसं अचानक जुळून यायला हवं. मग बघा अपरिचित ठिकाणं देखील तुमच्याशी अगदी परिचित होतील. तिथली माणसंच नाहीतर निर्जीव दगड, भिंती, वास्तू, डोंगर-दऱ्या, निरव आणि भयाण शांतता देखील तुमच्याशी हितगुज करू लागेल. खरं म्हणजे भ्रमंतीला सोबतीला कुणी घ्यायचंच नसतं. आपण टोळक्याने जी भ्रमंती करतो ना त्याला सभ्य भाषेत सहल किंवा टूर म्हणतात. त्यावेळी आपल्या सोबत असणारा घोळकाच कलकल करत असतो. मग त्या अपरिचित जागा-ठिकाणं आपल्याशी परिचित होतच नाहीत. एकदा स्वतःला विसरून भटक्या बनलं की मग निसर्गाचा जिवंतपणा अनुभवायला मिळतो.

मुंबईत राहणाऱ्याला गर्दीचं आणि उसळणाऱ्या लाटांचं अजिबात कौतुक नसतं. त्यांच्या उश्या-पायथ्याला समुद्र आणि जमिनीवर माणसांचा पूर आहे. पण मुंबई बाहेर राहणाऱ्याला या गोष्टींचं कौतुक आणि ओढ असतेच ना. आयुष्यात एकदा तरी समुद्राच्या लाटा अन लोकलमधली गर्दी अंगावर घ्यावी, जरा गर्दीत धक्के खावेत, घुसमटून घ्यावं अशी रग प्रत्येकात असतेच ना ! त्यासाठी एकदा तरी मुंबई बघायला जातोच ना आपण. त्यामुळं मला वाटतं की स्थान महात्म्यापेक्षाही आपल्याला वाटत असलेले आकर्षण त्या ठिकाणाला आपल्यासाठी ‘स्पेशल’ बनवत असते. मला अजूनही लहान मुलांसारखं प्रवासात खिडकीची जागा पकडून प्रवास करण्यात इंटरेस्ट आहे. धावत्या गाडीच्या खिडकीतून आपल्याला मागे पडणारे आपले गाव सुद्धा अगदी एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर रेखाटलेले गाव वाटते. मला तर अशी चित्रातली गावं शोधण्याचा छंदच आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही विलोभनीयच असतात. पण आपल्या गावचा सूर्योदय आणि सूर्यास्त आपल्याला का बरं आवडत असावा..? केलाय कधी विचार..? दुसरीकडचा बघायला मिळाला तरी त्याचं फक्त अप्रूप असतं. सूर्योदय आणि सूर्यास्त बघणं यापेक्षा तुम्ही ज्या ठिकाणावरून पाहताय ते ठिकाण तुमच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो, म्हणून तर इतर ठिकाणचे अप्रूप असले तरी चुंबकीय आकर्षण आपल्या परिचित ठिकाणचे असते. यावर खूप काही सांगण्यासारखं आहे, पण लिखाण थांबवतो कारण तुम्ही आता सांगितलं पाहिजे….तुम्हाला आकर्षित करणारी, खेचून घेणारी ठिकाणं कोणती ते. लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा..😊😊

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)