At some point in life, we make a mistake. We try hard to forget both that ‘mistake’ and the ‘damage’ we have suffered from it. But the world doesn’t let us forget that. Even after our death, the world of the same thing constitutes an ‘event’. I am now of the firm opinion that this must have happened in the case of ‘Ravana’. Vijayadashami (Dussehara) was celebrated with a bang yesterday. The ‘Ravans’ in ‘society’ are a bit ‘frightened’ on this day. Because the event of ‘Ravan Dahana’ is thronged by the supporters of Lord Ramachandra, so are the supporters of brother ‘Bibhishana’ and wife ‘Mandodari’.
आयुष्यात कधीतरी आपल्या हातून मस्तीत एखादी चूक होते. ती ‘चूक’ आणि त्यापासून सहन करावे लागलेले ‘नुकसान’ दोन्हीही गोष्टी आपण विसरायचा आटोकाट प्रयत्न करतो. पण जग आपल्याला ती गोष्ट विसरू देत नाही. अगदी आपल्या मृत्यूपश्चातही त्या गोष्टीचा जग मात्र ‘इव्हेंट’ बनवतं. रावणाच्या बाबतीत हेच झालं असावं, असं माझं ठाम मत झालंय. काल विजयादशमी (दसरा) अगदी धडाक्यात साजरा झाला. गल्लोगल्लीतील ‘रावण’ या दिवशी जरा ‘धास्तावलेलेच’ असतात. कारण ‘रावण दहना’च्या इव्हेंटला प्रभू रामचंद्रांचे समर्थक जसे गर्दी करतात, तसेच बंधू ‘बिभीषण’ आणि पत्नी ‘मंदोदरी’च्या समर्थकांनी देखील गर्दी केलेली असते.

काल संध्याकाळी रावण दहनाच्या कार्यक्रमाला जायचं का हे विचारणारा माझ्या एका मुस्लिम मित्राचा फोन आला होता. अर्थात हे विचारण्यामागे त्याची जिज्ञासा फक्त रावण दहनाविषयीच नसावी हे माझ्या लगेचच लक्षात आले होते. मुळातच ‘रावण दहन’ असा कुठलाच धार्मिक विधी नाही. मग दसऱ्याच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी ‘रावण दहन’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर का होतोय ? दक्षिण भारतात तर रावणाला पुराणकाळातील श्रेष्ठ योद्धा आणि देव मानतात. मग मध्य आणि उत्तर भारतात त्याला खल प्रवृत्तीचे प्रतीक का मानल्या जाते ? प्रभू रामचंद्र यांची जन्मभूमी असलेली अयोध्या ही उत्तरेत आहे. त्यामुळे श्री प्रभू रामचंद्र यांना भारताच्या मध्य आणि उत्तर भारतात आराध्य दैवत आणि श्रध्देचे प्रतीक मानतात. उत्तरभारतात रामकथेवर आधारित ‘रामलीला’च्या सादरीकरणाचा शेवट हा राम-रावण यांच्या युद्धावर केला जातो. प्रभू रामचंद्रांनी रावणाशी युद्ध करून त्याला पराभूत करीत त्याचा वध केला. त्यानंतर विजयी प्रभू राम बंधू लक्ष्मण, सितामातासह अयोध्येला परतात. तो दिवस विजयादशमी. म्हणून नवरात्र काळात उत्तरेत ‘रामलीला’चे ठिकठिकाणी आयोजन केल्या जाते. दृश्य आणि संवादात्मक सादरीकरणाद्वारे परिणामकारकता साधताना ‘रावण वधा’च्या नाट्यमय सादरीकरणाने रामलीलाचा समारोप केला जावू लागला. रोमांच उभे करणारे राम-रावण युद्ध आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शविणारा परिणाम साधताना रामायणातील ‘रावण’ ही व्यक्तिरेखा ‘खलनायक’ केंव्हा झाली हे दस्तुरखुद्द रावणाला देखील कळाले नाही.

अलीकडच्या काळात विशेषतः अयोध्येच्या राम मंदिराचा वाद निकाली निघाल्यापासून प्रभू रामचंद्र हे क्षत्रिय आणि रावण हा ब्राह्मण होता. हा नवा प्रवाद आकाराला येत आहे. रामायणात आणि पुराणातही रावण हा शूर योद्धा होता या उल्लेखा बरोबरच कठोर तपश्चर्येद्वारे भगवान भोले शंकराला प्रसन्न करून घेणारा रावण हा विद्याभ्यासातही ‘पंडित’ होता हा उल्लेख येतो. त्याकाळी वेदाभ्यास हा ब्राह्मण व्यक्तीच करत होता. या समजापोटीच रावण हा पंडित म्हणजेच ब्राह्मण होता हे मत अगदी हातघाईला येत मांडले जाते. पण सतयुगातील घडलेल्या रामायण काळात आजचा हिंदू धर्म आणि ब्राह्मण जात होती का ? त्यावेळी सनातन धर्म किंवा वैदिक धर्म असलेल्या धर्माची चातुर्वण्य व्यवस्था जर आपण मान्य करणार असू तर त्या व्यवस्थेत तरी ब्राह्मण कुणाला म्हंटलंय ? ब्राह्मणांचा कुलपुरुष मानल्या जाणाऱ्या परशुरामाने हाती परशु घेवून अकरा वेळा क्षत्रियांचा संहार केला होता. मग परशुराम वर्णव्यवस्थेतील कोणत्या प्रकारचे ब्राह्मण होते ? मुळात पुराणकाळ-प्राचीन कालखंडाचा तौलनिक अभ्यास नसताना असे विषय मांडून सध्या अस्तित्वात असणाऱ्या ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा हा एक राजकीय खेळ सुरू झाला आहे.
रामायण घडलंच नव्हतं, अशी मांडणी करणारे विद्वान आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि करोडो रामभक्तांच्या आस्थेपुढे ‘नरम’ झालेले असले तरी पुरावे मागण्याची त्यांची मोहीम अधूनमधून उचंबळून येत असते. स्वतःच्या तीन पिढ्यांच्यावर ज्यांच्याजवळ कागदपत्रे नाहीत असे महाभाग रामायण काळाच्या अस्तित्वाचे पुरावे मागतात. भारतीय वेद-पुराणावर सर्वात जास्त शंका उपस्थित करणारे भारतीयच असतात हाच दैवदुर्विलास आहे. राम आणि रावण ह्या व्यक्तिरेखा सत्य आणि असत्याचे प्रतिकात्मक रूप म्हणून जरी पाहिल्या तरी आपल्या नजरेसमोर त्यांच्या मानवी रूपातील व्यक्तिरेखा स्पष्टपणे येतील. त्यामुळे रावण ब्राह्मण होता का ? किंवा वनवासात असतानाही प्रभू रामचंद्र दाढीधारी का नाहीत ? या टवाळखोरीला किती महत्व द्यायचं. मुद्दा हा आहे की रावण ही पूर्णतः खलप्रवृत्तीची व्यक्तिरेखा आहे की केवळ अहंकारापोटी हातून घडणाऱ्या चुकांमुळे भरकटणारे मानवीरूप आहे हे एकदा समजून घेतले की मग आपल्या मेंदूत लपून बसलेला रावण आपल्याला स्पष्ट दिसायला लागतो. आपण ‘रावण दहन’ ही संकल्पनाच इव्हेंट म्हणून स्वीकारली असल्याने जमा झालेल्या गर्दीत आपल्या मेंदूतील दडलेल्या रावणाबरोबरच गर्दीच्या मेंदूत दडलेले ‘रावण’ धास्तावलेले असतात. त्यांना आता प्रभू रामचंद्रांची भीती नाहीय. तर आपल्या भोवती आपले गुणगान करत फिरणाऱ्या आपल्याच हितसंबंधी लोकांच्या मेंदूत दडलेल्या ‘रावणा’ची भीती वाटत आहे. आता आपल्यात दडलेल्या रावणाला बंधू बिभीषणाच्या समर्थकांची आणि पत्नी मंदोदरीच्या समर्थकांची जास्त धास्ती वाटतेय. कारण गर्दीत आपल्या समर्थकांसह या दोघांचेही समर्थक आहेत हे आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत दडलेल्या रावणाचा वहीम आहे.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Girish Kulkarni उत्तर रद्द करा.