When I sit down to write, my mind often gets confused. We ‘ponder’ a subject in our mind and sit down to write to get it down on paper. But when you sit down to write, different movement’s start in your brain. Then we do not write the fixed topic. The letters on the paper have legs. The character’s who are ‘around us’ peek in to it and a new plot is created. This is how all the drama scripts I have written so far have been born.
लिखाण करायला बसलं की बऱ्याचवेळा मनाचा गोंधळ उडतो. आपण मनात एखाद्या विषयाचे ‘चिंतन-मनन’ करतो आणि झर्र्कन कागदावर उतरवून काढू म्हणून लिहायला बसतो. पण लिहायला बसल्यावर मेंदूत वेगळीच आंदोलने सुरू होतात. मग ठरलेला विषय आपण लिहितच नाही. कागदावर उमटणाऱ्या अक्षरांना पाय फुटतात. आपल्या ‘अवती-भवती’ असणाऱ्या व्यक्तिरेखा त्यात डोकावतात अन नवं कथानक तयार होतं. माझ्या आजवर लिहिलेल्या सर्व हस्तलिखित नाट्य संहितांचा जन्म हा असाच झाला आहे.

“दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्यांनी ओंजळीतल्या पाण्यावर अधिकार सांगायचा नसतो”….मीच लिहिलेल्या नव्या नाट्य संहितेतील हा संवाद तालमीमध्ये (रिहर्सलमध्ये) नटाच्या तोंडून ऐकताना माझ्या काळजात कुठं तरी ‘कालवाकालव’ झाली. मीच लिहिलेल्या संवादांवर मी ढसाढसा रडतोसुद्धा. गेल्या तीस वर्षांच्या नाट्य लेखनाच्या प्रवासातील यंदा ६२ व्या राज्य नाट्य स्पर्धेकरिता खास लिहिलेले “पाय टाकुनी जळात बसला” हे माझं बारावे दोन अंकी नाटक. तसं पहायला गेलं तर संख्यात्मक दृष्टीने लिखाणाची ‘पॅसेंजर’ गतीच म्हंटली पाहिजे. नाट्य लेखक म्हणवून घ्यायचं असेल तर इतक्या वर्षात संहितांची ‘चळत’ वाढायला हवी होती. पण ‘बुंदी’ पाडावी तसं नाट्य लेखन हातावेगळं करायला मी काही नाट्य’वस्ताद’ नाही. असो. नाटक लिहिणारा लेखक हा ‘भाषा पंडित’ अथवा ‘उच्चविद्याविभूषित’ असावा अशी काही पात्रता नक्कीच नसते. नाट्य रूपाने कागदावर उतरविणाऱ्या विचारांशी अन ‘त्या’ कथानकातील पात्रांशी तो ‘बेईमान’ नसावा. माझ्यालेखी नाटककार म्हणून लेखकाच्या अंगी एव्हढीच पात्रता असली तरी पुरेसे असते. म्हणूनच कथानक मांडताना जन्माला घातलेली पात्र ही त्याला वास्तव जगात कुठं ना कुठं भेटलेली असतात. म्हणूनच आपण त्याला वास्तववादी म्हणतो.

आता मी तुम्हाला नव्या नाटकाचं कथानकच सांगायला निघालोय असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आत्ता मी हा मोह टाळतोय. कारण प्रत्यक्ष पाहताना जे कथानक उलगडत जाते तो आनंद काही औरच असतो. खरं म्हणजे कथानक नवं मुळीच नसतं. नवी असतात ती आपल्यातूनच शोधलेली परिचित-अपरिचित पण हवीहवीशी वाटणारी पात्रं. भारतीय भाषांमधील दोनच कथानक ही मूलस्वरूपाची अशी आहेत. एक रामायण आणि दुसरं महाभारत. बाकी सर्व कथानके ही याच दोन महा नाट्यांच्या प्रतिआवृत्या आहेत असं मी तरी मानतो. म्हणूनच कथानकावर आपला दावा सांगण्यापेक्षा त्या कथानकानुसार रंगमंचावर येणाऱ्या पात्रांवर लेखकाने आपला अधिकार सांगावा या मताचा मी आहे. एव्हढा प्रामाणिकपणा तुमच्या अंगी असला की तुम्ही नाटक लिहायला कोणत्याही मुहूर्ताशिवाय प्रारंभ करू शकता. आणखी एक सांगायचं विसरलोच….नाटक लिहायला मुहूर्त नाही पण प्रेरणा मात्र नक्कीच लागते. “पाय टाकुनी जळात बसला” हे नवीन नाटक लिहिताना देखील अशाच त्रिमूर्तींची प्रेरणा कायम पाठीशी उभी होती. माझे सहयोगी मित्र दै.दिव्यमराठी सोलापूर आवृत्तीचे युनिट हेड नौशाद शेख आणि नव्यानेच प्रभावशाली मित्र बनलेले निवासी संपादक नितीन फलटणकर आणि तिसरा व्यक्ती म्हणजे दत्त उपासक रंगकर्मी रणधीर अभ्यंकर. अपघातात पाय गमावल्या नंतर अवघ्या चार महिन्यात कृत्रिम पायाच्या आधारे पुन्हा त्याच जोशात रंगमंचावर येवू पाहणारा हौशी रंगकर्मी रणधीर अभ्यंकर हा तर या नाटकासाठी प्रेरणेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मित्रवर्य नौशाद शेख आणि नितीन फलटणकर हे दोघे तर नाट्यलेखन पूर्ण करावे यासाठी खूप कच्छपी लागले होते. माझ्या या नव्या नाटकाच्या नायकाचे नाव देखील नितीन फलटणकर ठेवले आहे. हा निव्वळ योगायोग नाही. तर मैत्रीचा हा धागा अधिक घट्ट व्हावा यासाठी कायम स्मरण म्हणून मी मुख्य नायकाचे नामकरण केले आहे. नौशाद बाबतही माझ्या याच भावना आहेत. आगामी लेखनात ही व्यक्तिरेखा देखील उमटेल. शेवटी लेखकाला दररोज भेटणाऱ्या व्यक्तीच पात्र म्हणून त्याच्या कथानकात येत असतात. खूप महत्वाकांक्षी नसेल पण ‘आनंद’ देणारे लेखन झाल्याचे समाधान नक्कीच वाटते. आता नवागत आणि स्पर्धेतील अनुभवी कलावंत हे नाटक रंगमंचावर सादर करायला निघालेत. शेवटी राज्य नाट्य स्पर्धा ही सादरीकरणाची स्पर्धा असते. तेंव्हा नटेश्वराने त्यांची ही पूजा स्वीकारावी एव्हढीच माफक इच्छा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.