It is not very difficult to write a subject if there is preparation. But if you want to write spontaneously on different topics everyday, it is often not suggested or you may get confused. In such a case, a topic for writing can also be found from the discussion among your like-minded friends. I always do this experiment. There is no such thing as a completely new topic. The points that come up during the group discussion reveal the differences of opinion of other’s. I would like to mention here that today’s topic also came out of such gossip
एखाद्या विषयाची तयारी असेल तर लिखाण करायला फार अवघड जात नाही. पण रोजच तुम्हाला जर उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या विषयांवर लिहायचं असेल तर मात्र बऱ्याचवेळा सुचत नाही किंवा तुमचा गोंधळ देखील उडू शकतो. अशावेळी आपल्या समविचारी मित्रांच्या घोळक्यात होणाऱ्या चर्चेतून देखील लिखाणासाठी एखादा विषय मिळू शकतो. असा प्रयोग मी नेहमी करतो. अगदी नवा विषय मिळेल असे काही नसते. समूहाने चर्चा करताना जे मुद्दे समोर येतात, त्यातून इतरांची मत-मतांतरे स्पष्ट होतात. आजचा विषय देखील अशा कट्ट्यावरच्या गप्पांमधूनच पुढे आला आहे, हे मला इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

भारतीय जनमानसात विरंगुळा म्हणून देखील चारजण एकत्र आल्यावर विवाहबाह्य संबंध आणि राजकारण या दोन विषयावर हमखास चर्चा घडते. हे दोन विषय भारतीयांच्या इतके आवडीचे आहेत. या दोन्ही विषयात एक समान धागा आहे. विश्वासघात. या दोन्हीही विषयांना काळ-वेळ नाही. त्रिकालाबाधित आहेत, म्हणूनच ते गॉसिपिंगसाठी ते नेहमीच ताजे विषय आहेत. सध्याचे भारतीय राजकारण हे आरोप-प्रत्यारोपाच्या राड्यात बरबटलेले असून असभ्यता आणि शिवराळ भाषेबरोबरच धार्मिक उन्माद आणि जातीगटांच्या प्राबल्याला चिथावणी देणारे असल्याने लोकचर्चेचा विषय बनले आहे. राजकारणात प्रस्थापित झालेले राजकारणी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या ‘राड्यात’ सर्वसामान्य माणूस हा फक्त ‘चुंबकीय’शक्तीने खेचलेला एक तुकडा म्हणून सहभागी असतो. जसं मतदानावेळी केवळ ‘मत’ देण्यापुरते त्याला लोकशाही प्रक्रियेत समाविष्ठ करून घेतले जाते अगदी तेव्हढेच या ‘राडा’ संस्कृतीत त्याचे स्थान असते. बाकी दररोज राजरोसपणे ‘नेते आणि त्यांचे बगलबच्चे’ यांचाच हैदोस सुरू असतो. मग दिवसरात्र राजकीय धुळवड खेळणाऱ्या या नेत्यांची ‘माती’ कोण करतं..? हाच आपल्या आजच्या लेखाचा विषय आहे.

आजकाल बहुतांश राजकीय पक्षांचे नेते हे त्यांच्या कार्यकर्तृत्वापेक्षा ‘वादंग’ माजवून आपली सवंग लोकप्रियता वाढवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘लाईक अन कमेंट’चा शॉवर अंगावर घेणाऱ्या या नेतेमंडळींना आभासी दुनियेतील पसंतीची आकडेवारी म्हणजे आपल्या लोकप्रियतेची ताकद वाटत असते. यामध्ये मतदार म्हणून दर पाच वर्षाला भूमिका बजावणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा किती वाटा असतो…? सोशल मीडियाचा मोठा कॅनव्हास स्वतःच्या डमी अकाऊंटने ताब्यात ठेवू पाहणाऱ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे अर्धवट तज्ञ असलेले नेत्यांचे पिठठू, चमचे, समर्थक (काय वाट्टेल ते) हे असल्या लोकप्रियतेचे फुगीर आकडे नेत्यांना दाखवून नेत्याची छाती फुगवत असतात. नेत्यांना सुखावणारे उद्योग करणारे हे समर्थक जोपर्यंत त्यांचा ‘मलिदा’ वाढीव आकारात मिळत राहतो तोपर्यंतच नेत्यांच्या पाठीशी आपली फसवी आभासी आकडेवारी घेवून उभे असतात. ज्या दिवशी नेता त्यांची गैरवाजवी कामे करण्यास नकार किंवा असमर्थता दर्शवितो तेंव्हा हेच ‘खंदे समर्थक’ विरोधकांच्या तंबूत दाखल होत आपल्या पूर्वाश्रमीच्या नेत्याची ‘माती’ करतात. भारतीय राजकारणात पदोपदी हे नाट्य दिसते. ‘मतदारांनी नाकारले’ हे लोकशाहीची थट्टा करणारे विधान यासाठी वापरले जाते. कारण मतपेटीद्वारे पराभूत करणे हे जरी सर्वसामान्य लोकांच्या हातात असले तरी देखील एव्हढ्या एका पराभवाने नेत्याच्या राजकीय आयुष्याचा शेवट होत नसतो. जेंव्हा टोळभैरव समर्थकांची गर्दी नेत्यापासून हटायला सुरू होते तेंव्हाच सत्तापिपासू बनलेल्या नेत्याचा शेवट जवळ यायला लागल्याचे संकेत मिळतात.

लोकशाहीमध्ये मतदार म्हणजेच सर्वसामान्य नागरिक हा राजा असतो ही ‘लिम्लेटची गोळी’ गेल्या ७२ वर्षांपासून चघळत राहिल्याने एकप्रकारचा ‘कैफ’ सर्वसामान्यांच्या मेंदूवर चढलेला दिसून येतो. आपल्या मतांमुळेच सत्तापालट होते हा भ्रम त्याचाच परिपाक आहे. मुळातच लोकशाहीच्या प्रक्रियेत केवळ मतदानापूरता सहभाग असणाऱ्या सर्वसामान्य मतदाराला मर्यादित अधिकार आणि सत्ताधीशाला अमर्याद अधिकार बहाल केलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर देखील मागच्या दरवाजाने प्रवेश करणारे सत्तालोभी नेते पुन्हा-पुन्हा अहिरावण-महिरावणासारखे जिवंत झालेले दिसतात. त्यांचा निर्णायक पराभव हा केवळ त्यांचा समर्थकच करू शकतो. कारण त्यालाच नेत्याच्या सत्तेपर्यंत जाण्याच्या सर्व चोरवाटा तोंडपाठ झालेल्या असतात. बाकी पैसे देऊन, आमिषे दाखवून शक्ती प्रदर्शनासाठी गोळा केलेली भाडोत्री गर्दी यात खरे मतदार किती असतात..? केवळ आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावायचा म्हणून ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने सोम्यापेक्षा गोम्या बरा म्हणून मतदार मतदान करतात. याचा अर्थ निवडलेले नेतृत्व सक्षम आहे असा होतो का ? आता हे उघड सत्य सर्वांनाच माहीत आहे. पण जोपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये फेरबदल होत नाहीत तोपर्यंत हे असेच चालत राहणार. संविधानामध्ये जर कालानुरूप आवश्यक ते फेरबदल केले जावू शकतात तर निवडणूक आयोग आणि प्रक्रियेत आवश्यक ते फेरबदल का केले जावू शकत नाहीत…? लोकशाही स्वीकारल्यापासून जी निवडप्रक्रिया राबविली जाते त्याची अनुभूती आपल्याजवळ आहे. आता खरंच जर लोकशाही अधिक सुदृढ आणि पारदर्शी हवी असेल तर निवड प्रक्रिया बदलायला हवी. केंद्रीभूत सत्तेत बांडगुळे पोसली जातात. खाबूगिरी वाढल्याने विकासदर मंदावतो. आता बदल हवा आहे, पण तो नेमका कसा हवा..? हीच संभ्रमावस्था आहे. हा संक्रमणाचा काळ संपेल तेंव्हाच लोकशाही खऱ्या अर्थाने सुदृढ होण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी मात्र कुणी रस्त्यावर आंदोलनासाठी उतरत नाही हेच तर खरं दुखणं आहे……..

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Gopanie Don उत्तर रद्द करा.