‘प्रॉब्लेम’ मलाच का सतावतो..?

I am surrounded by problems every morning from sunrise to sunset. Until one problem is solved, another problem arises. This is not my only complaint, but it is more or less on everyone’s tongue. It is as if destiny has given us the responsibility to solve all the problems in the world. Or we are born for it. But if you think that the problems that bother you every day are basically new opportunities for you, then you will never be afraid of the coming problems.

मला रोज सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळे पर्यंत समस्यांनीच घेरलेले असते. एक प्रॉब्लेम सोडवत नाही तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम समोर उभा असतो. ही माझ्या एकट्याची तक्रार नाही, तर कमीअधिक प्रमाणात सर्वच जणांच्या जिभेवर ही तक्रार कायम रेंगाळत असते. जणूकाही जगातील सर्व प्रश्न सोडवायची जबाबदारी नियतीने आपल्यावरच टाकली आहे किंवा त्याच्यासाठीच आपला जन्म झाला आहे. पण तुम्हाला रोज सतावणारे प्रॉब्लेम हे मुळात तुमच्यासाठी नवी संधी घेवून आलेले असतात असा विचार केला तर..? येणाऱ्या प्रॉब्लेमची कधीच भीती वाटणार नाही.

सुख-सुविधा वाढल्या की माणसाचं जगणं बऱ्यापैकी ऐसपैस होऊन जाते. अशावेळी रोजच्या जगण्यात थोडीशी जरी अडचण निर्माण झाली की लगेचच आपण आपल्या विरोधातील व्यक्तीच्या नावाने ‘खडे’ फोडायला सुरुवात करतो. आलेला हा अडचणीचा प्रसंग हस्तेपरहस्ते ‘त्यानेच’ आपल्यासमोर उभा केला आहे यावर आपला ठाम विश्वास असतो. आपल्या शेजारचा भुक्कड देश (नाव घ्यायला देखील भुक्कड वाटतं) त्यांच्याकडे काहीही घडलं किंवा त्यांना कोणत्याही कार्यात अपयश आले की सरळ-सरळ ‘ये भारत की साजिश है…ये रॉ का काम है’ अशी ओरड करतो. शेजाराच्याचा हा गुण काही प्रमाणात आपल्याला देखील चिकटला आहे, असं म्हणायला हरकत नाही. मी खूप सरळमार्गी आहे, अशीच आपल्या मनाची समजूत असते. किंबहुना हेच आपण इतरांच्या मनावर बिंबविण्याचा आटोकाट प्रयत्न सदोदित करत असतो. या प्रयत्नांतच आपण बऱ्याच वेळा सरळमार्गी वागण्याच्या प्रयत्नात आपल्याच भोवती समस्या उभ्या करत असतो. अशावेळी कुणी जर आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी आपण त्याला आपल्या विरोधकांचा ‘हस्तक’ समजायला लागतो. एकूणच परमेश्वराने या पृथ्वीतलावर ज्या काही ‘समस्या’ शिल्लक ठेवल्या आहेत, त्या फक्त आपल्या स्वागतासाठीच ठेवल्या आहेत हीच आपली मानसिकता असते. फक्त अडचणीच्या वेळी ज्याचा आपण धावा करतो त्यालाच म्हणजेच थेट परमेश्वरालाच दूषणे द्यायला आपली हिम्मत होत नसते. मग आपण आपला संशय विरोधकांवर व्यक्त करायला लागतो. बरं एखादा विरोधक त्रास देणारा असेलच तर त्याची पूर्वकल्पना आपल्याला असते. शिवाय तो कोणत्या प्रकारचा आणि कुवतीचा त्रास देवू शकतो याचाही आपल्याला अंदाज असतो. तरीपण आपला ‘कांगावेखोर’ स्वभाव आपल्याला गप्प बसू देत नाही.

आपल्या अवतीभवतीचा समाज हा तसाच असणार आहे जसा तो असायला हवा. शेवटी आपल्या सारखेच विविध गुणवैशिष्ट्ये आणि स्वभाव असणारे एकत्र आले की समाज तयार होतो. मग आपल्याला येणारी व्यक्तिगत पातळीवरची संकटं ही समाजघटकांमधून आली असा कांगावा करण्यात काय अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीचा जर आपण नकारात्मक पद्धतीनेच विचार करणार असुत तर मग रोजच्या जगण्यातील अडथळे कमी होण्याऐवजी वाढलेलेच आपल्याला दिसतील. शेवटी तुम्ही तुमच्या आयुष्याकडे किती सकारात्मकतेने पाहता यावरच तुमची सुखदुःखं अवलंबून असतात. याबाबतीत आणखी एक तक्रार कायम असते. मी कायम ‘पॉझिटिव्ह’ आहे हो !…समोरचाच माझ्याबाबतीत ‘निगेटिव्ह’ असेल तर…? आता या शंकेचे देखील दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तो व्यक्ती आपल्याबाबतीत कायम ‘निगेटिव्हच’ आहे हा आपला ठाम ग्रह झालेला असतो. दुसरं म्हणजे आपण त्याच्याबाबतीत कायम ‘निगेटिव्हच’ विचार करत असतो. अशावेळी दोन्ही प्रकारात तुम्ही समोरच्या व्यक्तीबाबत ‘पॉझिटिव्ह’ आहात हे कधीच स्पष्ट होत नाही. म्हणजेच फक्त स्वतःच्या समजापोटीच ‘पॉझिटिव्ह’ असणं म्हणजे आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणे असे होत नाही. तर इतरांकडे सकारात्मकतेने पाहणे म्हणजेच आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहणे हेच अभिप्रेत आहे. मग बघा तुमच्या समोर उभारलेल्या समस्या, दुःखे देखील तुम्हाला आयुष्याचा सार सांगणाऱ्या सुखद घटना वाटू लागतील.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)