देवाच्या मनात असेल तरच दर्शन घडते…!

Think back on your most memorable road trip.

If you decide to go for God ‘darshanam’ but if God does not want to give you ‘darshanam’, you face many obstacles even after planning properly. You do not get God darshana. On the otherhand, if God comes into your mind, you definitely see God without any planning. I am certainly not superstitious but I have experienced this. Twenty four years ago, the sight of Tirupati Balaji while traveling 2000 kilometers on a motor cycle with a friend was forever memorable. After that till today I have not been able to go to Tirupati. The thrill of traveling 150 kilometers through the Nalamalla forest in Andhra Pradesh, the forest where the terror activities of the notorious sandalwood smugglar Veerappan was at that time, became an exciting experience of a life time for me.

तुम्ही ठरवून देवदर्शनाला निघालात पण देवाची तुम्हाला दर्शन देण्याची अजिबात इच्छा नसेल तर तुम्हाला व्यवस्थित नियोजन करूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला देवदर्शन होत नाही.याउलट देवाच्या मनात आले तर, कोणत्याही नियोजनाशिवाय तुम्हाला देवाचे नक्कीच दर्शन होते. मी अंधश्रध्दाळू नक्कीच नाही पण हा अनुभव मी घेतलेला आहे. चोवीस वर्षांपूर्वी मित्रासोबत दोन हजार किलोमीटरची मोटारसायकलवर सफर करत तिरुपती बालाजीचे घडलेले दर्शन कायमस्वरूपी लक्षात राहणारे ठरले आहे. त्यानंतर आजतागायत मी तिरुपतीला जावू शकलेलो नाही. त्यावेळी कुख्यात चंदन तस्कर विरप्पनच्या दहशतीच्या कारवाया सुरू होत्या त्या आंध्रप्रदेशातील नलामल्ला जंगलातून दीडशे किलोमीटरचा प्रवास हा थरार माझ्यासाठी आयुष्यभराचा रोमांचक अनुभव ठरला.

१९९९ च्या डिसेंबर महिन्याच्या थंडीच्या दिवसात एकेदिवशी माझा मित्र महेंद्र विश्वनाथ कवचाळे (सध्या हा पुणे जिल्हा न्यायालय, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करतो) हा संध्याकाळच्या सुमारास माझ्या ऑफिसमध्ये पेढे घेवून आला. त्याकाळी मी दैनिक पुढारीच्या सोलापूर आवृत्तीसाठी काम पहात होतो. महेंद्र कवचाळे याने नवीन हिरोहोंडाची स्प्लेनडर बाईक खरेदी केली होती. पेढे दिल्यानंतर चहा घ्यायला म्हणून आम्ही बाईकवर कॅन्टीनकडे चक्कर मारली. त्यावेळी कशी आहे गाडी ? म्हणून महेंद्रने मला विचारले. त्यावर मी त्याला म्हणालो, एव्हढ्याशा चकरेतून गाडीबद्दल कसं काय सांगणार ? जरा शहराबाहेर फेरफटका मारायला हवा. महेंद्रने मला लगेचच विचारले उद्या या नव्या गाडीवर तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी चाललोय, येता का ? मी पण त्याला गमतीने हो म्हणालो. पण खरंच दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता महेंद्र आपल्या नव्या गाडीसह माझ्या दारात हजर….. मी पटकन आवरले, सौभाग्यवतीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत सांगितले, ‘फारतर हैदराबाद पर्यंत जावून येवू आम्ही’ पटकन सॅक मध्ये एक-दोन दिवसाचे कपडे कोंबले आणि निघालो. ऑफिसला रजेसाठी कळवायचं म्हणून माझ्या बॉसला गाठले. त्यांनीही कोणतीही कटकट न करता सुट्टीसाठी होकार दिला अन सोबत बालाजीच्या हुंडीत टाकण्यासाठी पन्नास रुपये माझ्या खिश्यात कोंबले. अश्या रीतीने भल्या सकाळी म्हणजे साडेसहा वाजता सोलापूर ते तिरुमला असा ९५० किलोमीटरचा प्रवास सुरु झाला.

सोलापूर ते हैदराबाद असा मोटारसायकल प्रवास सुरु झाला. बाईक महेंद्रच चालविणार होता कारण मला गिअरची बाईक चालवता येत नाही. त्यामुळे सावकाश मध्यमगतीने आमचा प्रवास सुरु झाला. कर्नाटकातील बसवकल्याण येथे जेवण करून पुढे करनुल हायवेने श्रीशैलमकडे प्रवास सुरु झाला. रात्री दहा वाजता एका गावात मुक्काम ठोकला. गावाचे नाव आता आठवत नाही. मग पुन्हा दुसऱ्यादिवशी पहाटे उठून स्नान करून श्रीशैलमकडे रवाना झालो. श्रीशैलमकडे जातानाच व्याघ्रप्रकल्प असलेल्या नलामल्ला जंगल लागले. हा प्रवास घनदाट जंगल आणि वळणावळणाच्या घाटांचा होता. एकतर अरुंद रस्ता त्यात जंगली प्राण्यांचा मुक्त वावर पुन्हा त्यात कुख्यात चंदन तस्कर विरप्पनच्या दहशतीच्या कारवायांचा उच्छाद त्यावेळी सुरू होता. आदल्याच दिवशी दोन पूल विरप्पनच्या टोळीने उडवले होते. थरारक आणि रोमांचक असा प्रवास सुरु होता. श्रीशैलमला जाईपर्यंत जवळपास साठ-सत्तर किलोमीटरचा हा प्रवास एका अनामिक भीतीने सुरू होता. एकतर विरप्पनची टोळी आपल्याला पकडेल किंवा मग जंगलात दबा धरून बसलेल्या वाघासाठी दुपारचे भोजन होवुत या विचाराने दोघांचीही चांगलीच तंतरलेली होती. त्यात वळणावळणाच्या त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडावरील माकडे काही अंतरापर्यंत आमचा पाठलाग करायची. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीशैलमच्या मल्लिकार्जुनाचा मनात एकसारखा धावा सुरू होता. शेवटी संध्याकाळी श्रीशैलम गाठले. तिथल्या सिध्देश्वर भक्त निवासात खोली मिळवून मुक्काम केला. पहाटे उठून नागार्जुन धरणाच्या बॅक वॉटर म्हणजे पाताळगंगेत डुबकी मारून मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले. अन्नम सारमचा पोटभर आस्वाद घेतला आणि तिरुपतीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. पुन्हा नलामल्लाचे ७५ किलोमीटर उतरणीचा घाट आणि जंगल पार करीत नंदयाल (माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा मतदारसंघ) मार्गे महानंदी या तिर्थस्थानी महानंदेश्वराचे दर्शन घेत तिरुमलाकडे रवाना झालो.

रात्री तिरुपतीला भक्त निवासात मुक्काम करून सकाळी पापविनाशम मध्ये स्नान केले. दर्शनपास घेतलेला होताच. दर्शन रांगेतून श्री बालाजीच्या पुढ्यात पोहोचायला एक तास लागला होता. डोळे भरून मूर्ती न्याहाळत दर्शन घेतले. काहीच मागितलं नाही. लोक बालाजीकडे मागण्यासाठी जातात. माझे मात्र ध्यानीमनी नसताना दर्शन घडले होते. काही ठरवूनच आलो नव्हतो मग मागणार काय..? त्यानेच तर महेंद्रच्या तोंडून गळ घालून मला बोलावून घेतले होते. यथासांग दर्शन घेत प्रसादाचे लाडू घेतले. भोजन करून तिरुमलाचा डोंगर उतरत परतीचा मार्ग धरला. करनुल मार्गे गुलबर्गा करत अक्कलकोटला आलो…स्वामी समर्थांचे दर्शन घेत सोलापूर गाठले. या घटनेला चोवीस वर्षे उलटलीत. पण हा प्रवास आजही मनात ताजा आहे. अधूनमधून महेंद्रचा फोन येत असतो….लेखक महाशय परत मोटारसायकलवर जायचं का तिरुपतीला ? मी पण त्याला प्लॅनिंग करू असं प्रत्युत्तर देतो. पण मला ठाऊक आहे देवाने कुठे बोलावलं आपल्याला….त्याच्या मनात असेल तरच तो बोलावणार..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे. सोलापूर.

मोबाईल क्रमांक :- 8806188375

Leave a reply to rituved उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. rituved

    खरय देवाच्या मनात असेल तर नक्कीच दश॔न मिळत

    Liked by 1 person

  2. Priti

    You are absolutely right if God wants then we can see Him 👌well shared

    Liked by 1 person

  3. jnzende

    अगदी खरं आहे

    Liked by 1 person