The late American author and counselor Wayne Walter Dyer said,” When I chased money, I didn’t have enough, but when I gave my life purpose and focused on giving to others all that came in to my life, I prospered.” These thoughts of Wayne Walter Dyer apply to everyone. It’s just that when it comes time to stop at a turning point in life and look back, we understand it’s meaning.
दिवंगत अमेरिकन लेखक आणि समुपदेशक वेन वॉल्टर डायर म्हणतो की, जेंव्हा मी पैश्याचा पाठलाग केला तेंव्हा माझ्याकडे ते पुरेसे नव्हते. पण जेंव्हा मी माझे जीवन उद्देशाने मिळवले आणि स्वतःला आणि माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व गोष्टी इतरांना देण्यावर लक्ष केंद्रित केले, तेंव्हा मी समृद्ध झालो. वेन वॉल्टर डायरचे हे विचार प्रत्येकाला लागू होतात. फक्त एव्हढेच आहे की आयुष्यात एका वळणावर थांबून मागे वळून पाहण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हा आपल्याला त्याचा अर्थ समजतो.

आपलं नेमकं होतं काय….आयुष्यात आपल्याला नेमकं करायचं काय आहे हे ठरवायला…..तशी समज यायलाच खूप उशीर झालेला असतो. आपल्याजवळ सर्वोत्तम काय आहे ? जे आपण इतरांना देवू शकतो, हे कळण्यातच निम्मं आयुष्य सरलेलं असतं. मग आयुष्याच्या मध्यावर आल्यानंतर आता उरलेलं आयुष्य सुखासमाधानात जावे या भाबड्या आशेवर परोपकारी बनण्याची धडपड आपण सुरू करतो. अडचणीत सापडलेल्या एखाद्याला आपण मदत करतो….पण कलात्मकतेने त्याचा डांगोरा पिटून आपण किती ‘परोपकारी’ आहोत हे दाखविण्याचा सदोदित प्रयत्न करत राहतो. यात जर आपली पंचाईत होतेय असं लक्षात आलं तर मदत मागणाऱ्या याचकावर आपण तोंडसुख घेतो. मग परोपकारी भावना गेली तेल लावत. मुळातच स्वतःभोवती फिरायला लावणारी शिक्षण पद्धती ही बालसुलभ वयातच आपण आपल्यावर लादून घेतलेली असते. शिकून मोठेपणी डॉक्टर-इंजिनिअर व्हायचं किंवा तू मोठा साहेब हो ! हा काढा आपल्याला स्तनपान सुटले की पाजायला सुरुवात केलेली असते. सतत हाच काढा पिल्याने मेंदूची वाढ या काढ्यातून मिळणाऱ्या स्पर्धात्मक व्हिटॅमिन्स मुळेच बहुदा होत असावी. ही व्हिटॅमिन्स ज्यांना कमी प्रमाणात मिळतात, अशांना आपण ‘मंदबुद्धी’चे समजतो. अशा लोकांचे एक तर शिक्षण अर्धवट होते आणि भांबावलेल्या अवस्थेतून नेमकं काय करायचं हे ठरवता येत नसल्याने परावलंबी आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. मुळात मनुष्यजन्म घेवून आपण फक्त जगण्याचाच (भोगण्याचा) विचार करत असतो. याला कारण आपल्या अवतीभवती जी यंत्रणा आपल्याला जगण्याचे आदेश देत असते. तीच आपलं जगणं ठरवत असते. त्यासाठीच तर शिक्षणपद्धतीची रचना केलेली असते. जो जितका जास्त शिकेल तेव्हढा तो गुणवत्ताधारक समजल्या जातो. यावरच त्याचं जगणं सुसह्य होत असतं. म्हणजेच भोगण्यासाठी जगायचं हेच सूत्र ग्राह्य धरले जाते. आता अशा स्थितीत आपण नेमकं काय करायचं हे कधी ठरवणार…?

जगण्यासाठी पैसा हवा की निव्वळ पैशासाठी जगणं हवं हे सूत्रच मुळात आपल्यासाठी आपण ठरवत नाही. त्यामुळे आयुष्याचे मूल्य ठरवताना आजकाल ते नोटांच्या गठ्ठ्यावर तोलले जाते. मग आपण जे काम करतो त्यातून आपली किती कमाई होते यावरच समाजातील आपले स्थान नक्की केले जाते. मग जर गैरमार्गाने पैसे कमावणारा समाजात आपले स्थान ‘सर्वश्रेष्ठ’ म्हणून पक्के करणार असेल तर दबावातून उच्चशिक्षित झालेल्या लोकांचा देखील तोच आदर्श ठरतो. मग शिक्षितांच्या आयुष्यात जगण्यासाठी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचे नक्की महत्व किती असणार..? जगण्यासाठी घेतले जाणारे शिक्षण आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी घेतले जाणारे शिक्षण वेगळे, असा फरक आपण नक्कीच करू शकतो. संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत गल्लीतून ‘पाणीपुरी’ ओरडत विकणारा भैय्या जर महिन्याला तीस-पस्तीस हजाराची उलाढाल करणार असेल तर डिग्रीचे भेंडोळे कमावून बाबूगिरी करणाऱ्या सुशिक्षितापेक्षा तो नक्कीच वरचढ ठरतो. शेवटी आपण जे काम करतोय त्यावर जर आपला विश्वास असेल तर आयुष्यात आपण यशस्वी झालो असं समजायला हरकत नाही.

अर्थात पुन्हा एकदा ‘यश’ कशाला म्हणायचे ? हा निर्माण होणारा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे सोडवायचा असतो. आपल्या सारख्या मध्यमवर्गीय भेदरट माणसांची ‘यशा’बद्दलची व्याख्या फार सोपी आहे. आपण आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या कुटुंबासोबत त्यासाठी जल्लोष साजरा करू शकतो त्यालाच आपण ‘यश’ समजतो. आपण जोपर्यंत ‘जल्लोषी’ असतो तोपर्यंतच आपल्याला ‘यशस्वी’ समजल्या जात असते. म्हणूनच सरतेशेवटी तुम्हाला यशस्वी म्हणून जगायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष अटळ आहे. आणि तुमच्या सहभागाशिवाय संघर्ष पण टिकू शकत नाही. तूर्त एव्हढेच…..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा