Describe one positive change you have made in your life.
Today I have come and stopped at the boundary of the maximum age limit for employment. That means reached the 58th year. At least in India, 58 is generally considered as the retirement age. But that’s why we stop our work a little ? In the end, the battle of the survival continues till the end ! But this age definitely makes you ‘isolated’. At that time, you definitely remember a positive change you have made in your life. This has happened to me too. I have increased my listening power. Become a quiet listener rather than a reactionary. So my journey till date has been ‘pleasant’.
नोकरीच्या कमाल वयोमर्यादेच्या सीमारेषेवर आज मी येवून थांबलो आहे. म्हणजेच ५८ व्या वर्षात येवून पोहोचलो आहे. निदान भारतात तरी सर्वसाधारणपणे ५८ हे निवृत्तीचे वय समजले जाते. पण म्हणून आपण आपले काम थोडीच थांबवत असतो. शेवटी जगण्याची लढाई ही जीवात जीव असेपर्यंत सुरूच असते की ! पण हे वय तुम्हाला नक्कीच ‘आयसोलेटेड’ करणारे असेच असते. अशावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या एखाद्या सकारात्मक बदलाची तुम्हाला नक्कीच आठवण येत असते. माझ्याही बाबतीत हे घडले आहे. मी माझी ऐकण्याची शक्ती वाढविली आहे. प्रतिक्रियावादी बनण्यापेक्षा शांतपणे इतरांचे ऐकून घेणारा श्रोता बनलो आहे. त्यामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास ‘सुखद’ झाला आहे.

सकारात्मक व्हा, अशी हाकाटी आपण दिवसातून किमान वीस-पंचवीस वेळा तरी ऐकत असतो. पण सकारात्मकता म्हणजे नेमकं आहे तरी काय ? प्रत्येक गोष्ट कधीतरी आपल्या मनाप्रमाणे होईल हा आशावाद बाळगून राखलेला किंवा अंगिकारलेला संयम म्हणजे सकारात्मकता समजायचं की आपल्या अपेक्षा बाजूला ठेवून इतरांच्या भल्याचा विचार अंमलात आणायचा याला सकारात्मकता म्हणायचं ? हा प्रश्न मला गेल्या काही वर्षांपासून सतावतोय. विशेषतः सकारात्मकता हा शब्द जेंव्हा करिअर मार्गदर्शनाच्या क्षेत्रात परवलीचा शब्द बनला तेंव्हापासून या शब्दाची व्याप्ती खऱ्या अर्थाने समजायला लागली. आपण आपल्याला माहीत असलेली एखादी ‘सत्य’ गोष्ट जेंव्हा पोटतिडकीने मांडत असतो. तेंव्हा ती ‘सत्याची’ एकच बाजू असते. सत्याची दुसरी बाजू आपल्याला माहीत नसते. किंवा आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. त्यामुळे आपल्या पोटतिडकीने बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडत नाही. किंवा ते देखील तुम्हाला मध्येच थांबवून ‘सत्याची’ त्यांना माहीत असलेली दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही ऐकण्यापेक्षा बोलण्यात गुंतलेले असल्याने त्याठिकाणी संवादाच्या ऐवजी विसंवाद होतो. आपलं कुणीच ऐकत नाही या चिंतेने तुम्ही त्रस्त होता याबरोबरच तुमची चिडचिड देखील वाढते. पण यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. याउलट तुमचा वेळ आणि शक्ती खर्च होते. विसंवादामुळे तुम्ही तुमच्याभोवती मित्रांपेक्षा शत्रू गोळा करता. हा अनुभव मी तरुण वयापासून घेतला आहे. आपलं नेमकं काय चुकतंय ? हेच समजायला खूप काळ जातो. याकाळात तुम्ही केवळ प्रतिक्रियावादी राहिल्याने इतरांपासून दुरावले जाता आणि तुमचे नुकसानही होते. अर्थात अनुभवाशिवाय चूक की बरोबर, सत्य-असत्य समजत नसते हे ही तितकेच ‘सत्य’ आहे. अनुभव हेच सर्वात मोठे विद्यापीठ आहे हेच खरे.

आपल्या सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणामुळे अनेकांना कळत नकळत दुखवल्याने आपण इतरांशी शत्रुत्वच निर्माण करत असतो. अशावेळी आपण आपल्या निर्भीडपणावर जाम खुश असतो. आपल्याच तोऱ्यात राहिल्याने आपल्या अवतीभवती जे दुखावलेले लोक असतात ते आपला पाणउतारा किंवा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसतात. त्यांच्या अशा वागण्यातील मूळ सल शोधून काढण्यापेक्षा झालेल्या अपमानाचा ‘बदला’ घ्यायचा म्हणून आपण पुन्हा त्यांचा अपमान करण्यासाठी भिडतो. त्यामुळे द्वेषाची ‘जखम’ बरी होण्यापेक्षा ती अधिक चिघळते. एकास एक असा जर तुमच्यावर कुणी चालून आला तर कदाचित तुम्ही त्याला थोपवू शकाल पण तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे तुम्ही एकाचवेळी अनेकांना दुखावत असल्याने त्यांना थोपविण्यात तुमची सगळी शक्ती खर्च होत असते. यामुळेच तुम्ही आयुष्यात जे तुम्हाला सहज शक्य असते ते यश मिळवायला देखील विलंब आणि किंमत मोजता. त्यामुळेच अपमानाचा ‘बदला’ घेण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयोग तुम्ही पुन्हा-पुन्हा करायला हवा.

फक्त इतरांना सतत बोलत राहणे म्हणजे संवाद साधणे असा निष्कर्ष मुळीच काढू नकात. आपण बोलण्यापेक्षा इतरांचे अधिक ‘ऐकण्यावर’ भर दिला पाहिजे. कारण व्यक्त होणे ही जशी आपली मानसिक भूक आहे तशीच ती इतरांची देखील आहे. आज सगळीकडे विसंवाद आणि शत्रुत्वाची भावना वाढली आहे ती केवळ आपण ‘ऐकणे’ ही क्रियाच विसरून चाललो आहोत म्हणूनच आहे. जर इतरांचे म्हणणे आपण नुसते ऐकून जरी घेतले तरी त्यांना आपल्याबद्दल जवळीकता वाटू लागते. अशावेळी मग आपण अतिशय भावनिकतेने त्याच्या विचारांवर अगदी सहजतेने साधक-बाधक चर्चा करू शकतो. यातून तो आपले म्हणणे देखील लक्षपूर्वक ऐकून त्यावर सकारात्मकतेने अंमल करायला उद्युक्त होतो. मला वाटतं सकारात्मकता याचा खरा अर्थ हाच असावा. सकारात्मकता निर्माण होण्यासाठी फक्त संस्कारक्षम वागणे आणि बोलणेच पुरेसे नसते. तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणे आवश्यक असते. अर्थात समजून घेणे ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असे नसते. त्यासाठी तुम्हाला ऐकण्याची शक्ती वाढवावी लागते. आज ११ एप्रिल मी माझा ५८ वा वाढदिवस साजरा करत असताना माझ्यामध्ये केलेला हा बदल तुम्हाला सांगतोय. अर्थात स्वतःमधील त्रुटी ह्या अनुभवांती बराच काळ गेल्यानंतर कळत असतात. परिपूर्ण कोणीच नसतो. जेंव्हा आपण आपल्यातील विसंगती, त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न सुरू करतो आपण आपले आयुष्य अधिक सुंदर आणि सुखद बनवत असतो. हाच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल असतो.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा