You start getting even a little bit of success, in whatever form it may be…. There is an immediate difference in the behavior and speech of the people around you, who are close to you. ‘what now, don’t forget us’ statements are heard sometimes with admiration and sometimes with derision. In general, those who are already in contact with you are taking care that you do not forget the situation. Although the new changes are pleasant, you also never allow the previous situation to be forgotten. Because it is a measuring stick that shows how far you have come in a hard life.
तुम्हाला थोडं जरी यश मिळायला लागलं, मग ते कोणत्याही स्वरूपात असो….तुमच्या अवतीभवती असणाऱ्या, तुमच्याशी सख्य असणाऱ्या माणसांच्या वागण्या-बोलण्यात लगेच फरक पडतो. ‘आता काय, ऐश आहे तुमची. आम्हाला विसरू नका बरं का !’ अशी विधाने कधी कौतुकाने तर कधी उपरोधीकपणे तुम्हाला ऐकवली जातात. एकूणच तुम्हाला परिस्थितीचं विस्मरण होवू नये याची दक्षता तुमच्या आधीच तुमच्या संपर्कात असणारे घेत असतात. नवे बदल सुखावह असले तरी तुम्हीही कधी आधीच्या परिस्थितीचं स्वतःला विस्मरण होवू देत नसता. कारण कष्टप्रद आयुष्याचा किती मार्ग तुम्ही चालून आलात हे दर्शविणारी तीच एक मोजपट्टी असते.

माझ्यासारखे असंख्य लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात फक्त ‘संघर्ष’च आहे. बहुदा आमच्या सारख्या दुर्बल आणि लक्ष वेधून घेण्याची कला अवगत नसणाऱ्या लोकांच्या भाळी जन्मल्यावरच सटवाईने विदाऊट कमिशन ‘संघर्षांचं’ भाकीत कोरलं असावं. जाणता होईपर्यंतचे आयुष्य हे सगळ्यांचेच खुशालीचे असते. खरा प्रॉब्लेम पुढेच असतो. जेंव्हा कुटुंबाची जबाबदारी अंगावर पेलण्याची वेळ येते तेंव्हा आमच्यासारखे कमनशिबी लोक नेहमीच ‘कर्मदरिद्री’ म्हणून परिस्थितीकडून हिणवल्या जात असतात. ब्रह्मदेवाकडे जेंव्हा ‘नशिबाचं दान’ मागायला गेलो तेंव्हा आम्ही लोक ‘चाळणी’ घेवून गेलो होतो, असाही एक लोकप्रवाद सांगितला जातो. माणूस म्हणून जन्म घेताना गरज नाही की तुम्ही नवकोट नारायणाच्या पोटीच जन्म घ्यावा. अगदीच शूरवीर, पराक्रमी किंवा कर्तृत्ववानाच्या पोटी जरी जन्म मिळाला नाही तरी चालतो. जन्म कुणाच्याही पोटी असुद्या फक्त सटवाईने ‘कर्मदरिद्री’ असा गोल शिक्का कपाळी मारलेला नसावा. नाहीतर मग तुमची आयुष्यभराची ‘होरपळ’ ठरलेलीच आहे. जर सटवाईने लिहिले की आयुष्यभर ह्याची आदळआपट झाली तरी उत्तरार्ध चांगला असेल….तरच आमच्या सारख्यांना मनुष्यजन्म घेतल्याची सार्थकता लाभते. बाकी आपल्या मनगटात आपले भविष्य असते वगैरे सुभाषित-सुविचार म्हणून ठीक असतात. असं जर रडगाणं कुणी गायलं तर खुशाल समजा की तो एकलकोंडा तर आहेच त्याचबरोबर माणसांत मिसळत नसल्याने त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. शेवटी कर्माचे गणित खूप सिम्पल असते….करा चांगले तर होईल चांगले अर्थात पेराल तसेच उगवेल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा