If you ask a devout or religious person whether they believe in reincarnation, they will say yes. But if you ask the same question to an atheist or someone who critically examines religion, they will say that reincarnation is pure nonsense. Furthermore, there are many differing opinions about whether human life is given only once. Therefore, just as there are scholars who advocate living life to the fullest while you are alive, there are also religious scholars who propose doing charitable and virtuous deeds to ensure that the next birth is also in human form.
देवभोळ्या माणसाला किंवा धार्मिकवृत्तीच्या माणसाला जर विचारले की तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का ? तर तो हो म्हणेल. पण हेच तुम्ही नास्तिक माणसाला किंवा धर्माची चिकित्सा करणाऱ्या माणसाला विचाराल तर तो, पुनर्जन्म म्हणजे निव्वळ थोतांड आहे असंच म्हणेल. बरं, मनुष्यजन्म हा एकदाच मिळतो याबद्दल देखील अनेकांची अनेक मते आहेत. त्यामुळे आत्ता जिवंत आहे तोपर्यंत मनमुराद जगावे असा ऐहिक वाद सांगणारे जसे विद्वान भेटतात तसेच पुढचा जन्म पुन्हा मनुष्ययोनीतुन मिळावा म्हणून परोपकार आणि पुण्यशील कार्य करण्याचे तत्व मांडणारे धर्मपंडित देखील भेटतात.

सनातन हिंदुधर्माच्या ग्रंथ-उपनिषदांमधून ‘पुनर्जन्म’ ही संकल्पना मांडली आहे. ८४ लक्ष योनीचा फेरा एका आत्म्याला पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच त्याला ‘मोक्षगती’ प्राप्त होते. या ८४ लाख योनीफेऱ्यात चार लाख योनीफेऱ्या ह्या मनुष्यजन्माच्या आहेत. म्हणजेच एक आत्मा किंवा एक जीव मृत्यूनंतर चार लाखवेळा मनुष्यजन्म घेवू शकतो. याचाच अर्थ त्याचा पुनर्जन्म होतो. तो देखील एकदा नव्हे तर चार लाख वेळा. श्री विष्णू पुराणामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे.

श्री विष्णू पुराणात संस्कृत भाषेत ८४ योनीफेऱ्यांची मांडणी केली आहे.
जलजा नवलक्षाणि स्थावरा लक्षविंशति
कृमया रुद्रसंख्याका: पक्षिणा दशलक्षकम ।
त्रिशलक्षाणि पशव: चातुर्लक्षाणि मानवा: ।।
जलजा नवलक्षाणि म्हणजे ९ लाख वेळा जलचर म्हणून जन्म, स्थावरा लक्षविंशती म्हणजे २० लाखवेळा वृक्ष-वेली रुपात जन्म, कृमया रुद्रसंख्यका म्हणजे ११ लाखवेळा कृमी-कीटकांच्या रुपात जन्म, पक्षिणा दशलक्षकम म्हणजे १० लाखवेळा पक्षी रुपात जन्म, तर त्रिशलक्षाणि पशव: म्हणजे ३० लाखवेळा पशु रुपात जन्म आणि चतुर्लक्षाणि मानवा: म्हणजे ४ लाखवेळा मनुष्य रुपात जन्म….असा हा एका आत्म्याचा ८४ लक्ष योनीचा जन्म-मृत्यू आणि पुनर्जन्माच्या प्रवास आहे. आता तुम्ही म्हणाल की चला आपण या संकल्पनेवर देखील विश्वास ठेवूया. पण मग एकाच जन्मात पुन्हा पुन्हा आदर्शवादी वागण्याचे धर्मबंधन कश्यासाठी ? कारण एक नाही तब्बल चार लाखवेळा मनुष्यजन्म मिळणार आहे. तर याचं फार क्लिष्ट उत्तर न शोधता सध्या जे जगणं सुरू आहे ते अधिक सुंदर करण्यासाठी इतर जीवांचे सहकार्य लागते, ते मिळवण्यासाठी परोपकारी आणि क्षमाशील वृत्तीने जगलात तर तुम्ही तुमच्या आयुष्या बरोबरच इतरांचे आयुष्यदेखील संपन्न करू शकता. एव्हढाच साधा सरळ विचार स्वीकारला तर मग धर्मसंहिते प्रमाणे तुमचा ८४ लक्ष योनीफेऱ्या आणि पुनर्जन्म ह्यावर देखील विश्वास बसेल.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा