खरंच तुम्हाला निवृत्त व्हावंसं वाटतं का…?

Do you really want to retire…?

“Do you really want to retire ?” Or are people around you just waiting to forcibly ‘retire’ you, because of your advancing age ? Why do we feel this since of insecurity ? The age limit imposed at the workplace makes a person feel insecure from the age of 55. By the age of 58, the person mentally and physically starts accepting that they are getting old. Don’t you think this is a human-made disease ?.

“खरंच तुम्हाला निवृत्त व्हावंसं वाटतं का..?”, किंवा आपल्याच अवती-भवतीचे लोक केवळ आपलं वाढलेलं वय पाहून सक्तीने ‘निवृत्त’ करण्यासाठी टपून बसलेले आहेत का ? अशी आपल्याला असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी एक स्थिती का येत असावी ? केवळ कामकाजाच्या ठिकाणी वयोमर्यादेची घातलेली सीमा माणसाला वयाच्या ५५ व्या वर्षापासूनच असुरक्षित करते. वयाच्या ५८ व्या वर्षी तो माणूस मनाने आणि शरीरानेही आपण वृद्ध होत असल्याचे स्वीकारतो…..हा मनुष्यनिर्मित आजारचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का…?

भारतात काय किंवा जगभरात सगळीकडेच नोकरदारालाच ‘निवृत्ती’चा लगाम घातलेला आहे. म्हणजेच कोणताही नोकरदार जोपर्यंत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या काम करायला सक्षम आहे तोपर्यंतच त्याची नोकरी शाबूत असते. त्याचा त्याला महिन्याला मोबदला म्हणून ‘वेतन’ मिळत असते. सोबत तणाव आणि परिश्रमाचे वाढत्या वजनाचे ओझे सहन करण्यासाठी अलाऊन्स आणि आकर्षक इंसेंटिव्हचे पॅकेज दिलेले असते. शिवाय निवृत्तीवेळी ‘प्रॉव्हिडंट फंड’ नावाची आकर्षक धन राशी देवून त्याला वृद्धत्वाची तजवीज करण्यासाठी सल्ला देखील अतिशय जागरूकतेने दिला जातो. उपजीविकेसाठी महिन्याला ठराविक धनराशी ‘वेतन’स्वरूपात मिळते म्हणून ‘नोकरी’ला आयुष्यात प्राधान्य देणाऱ्या नोकरदारवर्गाचे पाव आयुष्य (वयाच्या पंचवीशीपर्यंत) हे शिक्षण आणि त्याला न्याय देणारी ‘नोकरी’ मिळविण्यात खर्च होते. भारतात तर कुटुंबप्रधान संस्कृतीला प्राधान्य आहे. म्हणजेच कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्या कुटुंबातील प्रमुख सदस्याला (स्त्री अथवा पुरुष) स्थिर आणि सुरक्षित ‘कमाई’साठी नोकरी हाच पर्याय निवडावा लागतो. वयाची तिशी ते चाळिशीपर्यंत त्याला नोकरीत कायम होण्याबरोबरच ‘बढती’च्या शर्यतीत व्यवस्थापन पळवत राहते. याकरिता त्याला स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे ‘टास्क’ दिले जातात. यातून वयाची चाळीशी ओलांडेपर्यंत ती व्यक्ती वाढता मानसिक तणाव आणि क्षमतेपेक्षा अधिक श्रमाने तो नोकरदार अकाली प्रौढत्वाकडे झुकलेला दिसतो. कार्पोरेट सेक्टरमध्ये त्याला ‘सिनिअर’ म्हटल्या जाते. म्हणजेच ‘तुमचे वय वाढत आहे’ याची आगाऊ सूचना दिली जाते.

देशातील सरकारी नोकरदार (आता त्यांच्याही पेन्शनवर गदा आली आहे) हे आजही नोकरदारवर्गात वरचढ समजले जातात. कारण सरकारी विभागातील वाढत्या ‘खाबूगिरी’चा मलिदा त्यांना कोणत्या न कोणत्या भेट स्वरूपात मिळत असतो. किंबहूना सरकारी नोकरी त्यासाठीच मिळवायची असते हा सर्वमान्य रिवाज आहे. अगदीच बोटावर मोजण्याइतके सरकारी नोकरदार मिळणाऱ्या महिन्याच्या वेतनावर ‘राष्ट्रसेवा’ म्हणून प्रामाणिकपणे नोकरी करत असतात. अर्थात ते फक्त ‘आदर्शवादाचा’ संसर्ग झालेले बाधित समजल्या जातात. इतरांना त्यांचा आदर्शवादाचा संसर्ग होवू नये याची दक्षता घेणारी यंत्रणा सज्ज असते. सरकारी नोकरदारवर्ग वगळता निमसरकारी, सहकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदारवर्गाचे नोकरीचे आयुष्य आणि निवृत्तीचे जीवन हे फारसे सुखकारक नसतेच. आता नोकरीशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा या देशातील एक मोठा वर्ग आहे. अन्नधान्य पिकवणारा शेतकरीवर्ग. त्याला कधीच ‘निवृत्ती’ नसते. त्याला वृद्धावस्थेतही अंगमेहनत आणि वाढता आर्थिक तणाव झेलत शेतीत राबावं लागतं. याबद्दल त्याची कसलीही तक्रार नसते. मात्र त्याने पिकवलेल्या अन्नधान्याला बाजारात रास्तभाव मिळावा एव्हढीच त्याची मागणी असते. त्याला कधी कुणी ‘निवृत्ती’चा आग्रह करत नाही. शेतीसाठी जर कमाल वयोमर्यादा मान्य झाली तर आपोआपच शेतकऱ्याची पुढची पिढी नोकरी मिळविण्यासाठी शहराकडे धावणार नाही.

या व्यतिरिक्तही अनेक अस्थायी स्वरूपाची क्षेत्रे आहेत. जिथे काम करण्यात लाखो लोक आयुष्य वेचतात. त्यांच्या नशिबी ‘सेवानिवृत्ती’ हा कधीच आयुष्याच्या संध्याकाळचा आरामदायी काळ होवू शकत नाही. कुशल कर्मचाऱ्याला किमान भविष्य निर्वाह निधी तरी मिळतो. अकुशल कर्मचाऱ्याच्या नशिबी ते देखील नसते. अशाही स्थितीत सेवानिवृत्ती सगळ्यांसाठीच अटळ असते. मग त्याला घाबरून का जायचं ? नक्कीच प्रपंचाचा गाडा तुटपुंज्या कमाईत ओढताना अनेक स्वप्ने अर्धवट राहिलेली असतात. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निवृत्तीनंतर वेळ तर भरपूर असतो पण खर्च करण्याची क्षमता…… तीच तर भीती वाटते. शिवाय वृद्धत्वाची सोबत करण्यासाठी येणारे आजारपण, त्यासाठी लागणारा पैसा कुठून मिळणार ? आयुष्यभर कर्ता व्यक्ती म्हणून कुटुंबात ताठ मानेने मिरवणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणी लाचारपण नको असते. म्हणूनच सर्वजण ‘निवृत्ती’ला घाबरतात. पण सेवाकालमर्यादेतून ‘निवृत्ती’ मिळाली म्हणजे सर्व काही संपले असा त्याचा अर्थ नसतो. उलट अर्थपूर्ण कार्यातून देखील ‘अर्थ’प्राप्ती करता येते. त्याला वयाची मर्यादा नसते. मला तर वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवसापासूनच आडून आडून विचारणा होवू लागली, मग आता पुढं काय करणार..? वयाची आणि अनुभवाची परिपक्वता ही बोलणाऱ्याच्या तोंडाला कुलूप लावण्यात व्यर्थ घालवण्यापेक्षा योग्य कार्यासाठी खर्च करणेच इष्ट आहे. उलट आयुष्यात जे करायचं राहून गेलंय ते करण्यासाठीची ही आयुष्याने दिलेली एक संधी आहे असंच मी समजतो. आणखी एक मनापासून अगदी खरं सांगतो….अनुभव आणि वयावर समाज आणि बाजारपेठ दोघेही विश्वास ठेवतात. म्हणून ‘जॉब’च तुम्हाला हुडकत तुमच्या दारात आल्याचा अनुभव तुम्हाला देखील येईल. शेवटी नाकात वारे शिरल्यासारखं धावणारा तरुण ससा दमून झाडाखाली डाराडूर झोपत असतो. एका गतीने अनुभवाच्या जोरावर शांतपणे पळणारा म्हातारा ‘कासव’ आयुष्याची शर्यत जिंकत असतो.

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)