Are we serious about ‘Play Zones’ for young children…?
As our generation, increasingly self-centered with advanced technology, dreams of a more comfortable life, it is time to ask ourselves how aware we are of the holistic development of our next generation. We spend millions on fully equipped flats. By booking an apartment in a much-discussed complex by renowned builders, complete with car parking and all amenities, we gain prestige in society. But do these apartments have ‘Play Zones’ for young children..? We never consider this. Without a place for children to play, how will their physical and intellectual development occur…? We are forcing children to live like prisoners in the confines of luxurious flats.
अद्ययावत तंत्रज्ञानाने स्वकेंद्रित झालेली आपली पिढी अधिक सुखासीन जगण्याची स्वप्ने पहात असताना आपण आपल्या पुढच्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी किती जागरूक आहोत…? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे. सर्व सुविधांयुक्त फ्लॅटसाठी आपण लाखों रुपये मोजतो. नावाजलेल्या बिल्डर्सच्या बहुचर्चित अपार्टमेंटमध्ये कार पार्किंगसह सर्व सुविधा असलेला फ्लॅट बुक करून समाजात प्रतिष्ठा मिळवतो. पण त्या अपार्टमेंटमध्ये लहान मुलांच्या ‘प्ले झोन’ची सुविधा आहे का…? हे आपण कधीच विचारात घेत नाही. लहान मुलांना खेळायलाच जागा मिळाली नाही तर त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास कसा होणार..? आलिशान फ्लॅट्सच्या बराकीत आपण मुलांना कैद्याचं जीवन जगायला भाग पाडतोय.

माझ्या उच्चपदस्थ मित्राने त्याच्या अपार्टमेंटमध्ये अगदी काल-परवा घडलेला किस्सा सांगितला. त्यांच्या सुसज्ज अश्या टोलेजंग अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांची एक तातडीची बैठक झाली. त्या बहुचर्चित उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये राहणारे सर्वच फ्लॅटधारक हे अर्थातच आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. आपल्या शेजारी कोण राहतोय ? हे विचारण्याची देखील त्यांना सवड नाहीय. इतके ते स्वकेंद्रित आहेत. अशा अपार्टमेंट मधील सभासदांनी वेळात वेळ काढून तातडीची बैठक बोलावली म्हणजे काहीतरी गंभीर विषय असणार. रविवार असल्याने झाडून सगळे बैठकीला उपस्थित होते. तर बैठकीमध्ये एका ज्येष्ठ सदस्याने विषय मांडला…. आपल्या अपार्टमेंटमधील लहान मुलांचे बिल्डिंगमधील खेळणे थांबवा….त्यांच्या खेळण्याचा, गोंगाटाचा त्रास होतोय. शिवाय खिडक्यांची तावदाने फुटण्याचा धोका किंवा अपघाताचा देखील धोका निर्माण होवू शकतो. बैठकीत काहीकाळ शांतता पसरली. कारण खेळणारी मुले त्यांचीच होती. मुलांना खेळू न देण्याचा निर्णय कसा घेणार..? त्या अपार्टमेंटमध्ये ग्राऊंडफ्लोअरला प्रत्येक फ्लॅटधारकासाठी कार पार्किंगला जागा आहे. पण लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही.

ही समस्या फक्त एखाद्या शहराची किंवा महानगराची नाही. विकासाच्या आकर्षणापोटी वेगाने सुखासीन होवू पाहणाऱ्या समाजाच्या मानसिकतेची आहे. जगभरात ऑक्टोपस सारख्या अक्राळविक्राळ पद्धतीने पसरणाऱ्या शहरांची ही समस्या आहे. शहरे बेफाम गतीने वाढू लागली आहेत. उपजीविकेसाठी येवून इथेच स्थायिक होवू पाहणाऱ्या प्रत्येकाला इथे स्वतःच्या हक्काचे घर हवे. तेच त्याच्या आयुष्याचे स्वप्न बनले आहे. त्यामुळे शहरात मोकळ्या जागा नष्ट झाल्यात. बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आलेत. ‘दिसली रिकामी जागा की बांध इमारत’ या एकाच व्यावसायिक धोरणातून बिल्डर लॉबीमध्ये जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा सुरू आहे. अश्या वातावरणात ‘मागेल तेव्हढा दाम’ मोजून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचीच धावाधाव सुरू आहे. परसदार आणि अंगणाशिवाय घर म्हणजे एखाद्या गलितगात्र विधवेने पुन्हा आशाळभूतपणे सजविलेला संसार. पण स्वप्नपूर्तीसाठी अशी घरे देखील बिल्डरांच्या आश्वासनांवर आणि फसव्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. सुविधांची आश्वासने फक्त घर विक्रीचा व्यवहार पूर्ण होईपर्यंतच असतात. एकदा का संपूर्ण अपार्टमेंट फ्लॅटधारकांनी गजबजलेले की मग बिल्डर ‘पौर्णिमेच्या चंद्रासारखा’ उगवायला सुरू होतो. मग फ्लॅटधारकांनाच आपल्या मूलभूत सुविधांच्या देखभाली आणि दुरुस्तीसाठी नगर व्यवस्थापनाबरोबर संघर्ष करावा लागतो.

फ्लॅट विकताना बिल्डरने देवू केलेल्या सोयी-सुविधा ह्या मृगजळासारख्या असतात. भविष्यकाळात कोणत्या सुविधा आपल्या उपयोगी पडणाऱ्या आहेत. याबरोबरच जोडलेल्या कोणत्या अटी जाचक ठरणाऱ्या आहेत याचा दूरगामी परिणाम फ्लॅट खरेदी करताना दिसत नसतो. आता जर लहान मुलांसाठी बाहेर मैदान उपलब्ध नसेल, अपार्टमेंटमध्ये ‘प्ले झोन’ नसेल तर ती मुले खेळणार कुठे ? घरात बसून बैठे खेळ खेळल्याने मुलांची शारीरिक वाढ कशी होईल…? त्यांच्यातील संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण कसे विकसित होतील.…? त्यांचं बालपण अधिक निरोगी आणि आरोग्यदायी कसे राहील…? ज्यांची मुले मोठी झालीत कदाचित त्यांच्यासमोर आज हा प्रश्न तीव्रता निर्माण करणारा नसेल पण काही वर्षात नातवंडे येणार आहेत. तेंव्हा हा प्रश्न भेडसावेल. विलासी जगण्याच्या नादात आपण पुढच्या पिढीचे जगणे अधिक अवघड करून तर टाकत नाही ना…! अपार्टमेंट संस्कृतीमध्ये रुळू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला एकदा विचारून पहावा…!

:-मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा