‘स्मरण’ शोधायला गेलं की ‘विस्मरण’ हाती लागते…!

When you go to search for ‘memory’, ‘forgetting’ comes to hand…!

When you start searching the house for something specific, instead of finding what you were looking for, you often come across a forgotten ‘treasure’. This treasure instantly brings a flood of mixed emotions and takes you to the village of forgotten memories. If these memories are of your beloved but deceased ones, then…! This happens quite often. Everyone gets entangled in these ‘memories’. When you go looking for ‘recollection’, you end up finding ‘forgetfulness’. Why does this happen…?

एखादी वस्तू किंवा कागदपत्रे शोधायला म्हणून घरात शोधाशोध सुरू केली की नेमकी हवी ती वस्तू मिळण्यापेक्षा विस्मरणात गेलेला एखादा ‘खजिनाच’ तुमच्यासमोर येतो. क्षणार्धात संमिश्र भावना गडद करणारा तो खजिना तुम्हाला विस्मरणात गेलेल्या  आठवणींच्या गावात घेवून जातो. त्या आठवणी जर तुमच्या प्रिय पण दिवंगत व्यक्तींच्या असतील तर…..! हे असं बऱ्याचवेळा घडत असते.प्रत्येकजण या ‘आठवणींच्या’ पाशात अडकत असतो .’स्मरण’ शोधायला गेलं की ‘विस्मरण’ हाती लागते. हे असं का होत असावं….?

माझी आई कै. मधुवंती मधुकर हिंगणे हिचा ‘तंबोरा’ वादन करतानाचे १९७५ च्या सुमारास काढलेले हे कृष्ण-धवल छायाचित्र.

एक फार छान आणि साधे उदाहरण नेहमी सांगितले जाते, तुम्ही खोलीचे दरवाजे आणि खिडक्या घट्ट बंद करून घेतल्या तर खोलीत नक्कीच अंधाराचं साम्राज्य निर्माण होते. पण त्याचवेळी खोलीबाहेर सुर्यकिरणांमुळे स्वच्छ प्रकाशाचं अमर्याद साम्राज्य नांदत असते. तुम्ही खोलीचा दरवाजा आणि खिडक्या पडदे दूर सारून उघड्या केल्या तर बाहेरचा सूर्यप्रकाश आणि स्वच्छ मोकळी हवा खोलीभर पसरेल….प्रकाशाच्या साम्राज्याचे तुम्ही देखील वाटेकरी व्हाल. निमित्त कुठलेही असेना, तुम्ही जेंव्हा एखादी वस्तू, कागदपत्रे किंवा आठवण शोधण्यासाठी घरात अडगळीला (आत्ताच्या भाषेत स्टोअर रूममधील वापरात न येणाऱ्या वस्तू) पडलेला ढिगारा शोधकतेने उपसायला घेता, तेंव्हा धूळ खात बेवारसपणे इतस्ततः पसरलेल्या विस्मरणात जावू पाहणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्या हाताशी लागतात. त्यातून अनेक आठवणींना नक्कीच उजाळा मिळत असतो. विशेषतः तुमच्या प्रियजनांच्या संदर्भातील त्या गोष्टी असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या आठवणींनी भावनाविवश होता. खोलीतला अंधार नाहीसा करण्यासाठी जसं दारं-खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतात, अगदी तसंच तुमचं मन प्रफुल्लित आणि प्रकाशमान ठेवण्यासाठी मनातील अंधार हटविण्याची सक्त गरज असते. ही गरज काही अंशाने का होईना अडगळीच्या सामानात शोधा-शोध केली तर पूर्ण होवू शकते. खरं म्हणजे ही एक अटकळ समजा….किंवा हा मॅजिक गेम समजा !

माझी आई कुणी थोर विदुषी नव्हती. मध्यमवर्गीय नवऱ्याचा संसार निगुतीने करणारी सर्वसाधारण सोशिक गृहिणी होती. गायन-वादनाचे अंग असले तरी मुलांवर कलासक्त संस्कार व्हावेत आणि पतीच्या सुगम गायनाच्या कार्यक्रमांना साथ-संगत देता यावी एव्हढीच तिची धडपड असायची. त्याचबरोबर शिवणकाम आणि भरतकाम याची तिला विलक्षण गती होती. वडिलांच्या पडत्या काळात आमच्या कुटुंबाचे उदरभरण देखील तिने आपल्या शिवणकामाच्या जोरावर केले. अगदी डोळ्याच्या खाचा होईपर्यंत तिने हातातील सुई-दोरा सोडला नाही. तिला जावून आता तीन वर्षे झालीत. अजूनही घरात अस्पष्ट होवू पाहणाऱ्या तिच्या अस्तित्वाच्या खुणा अचानक गडद होवून समोर येतात. काल नको असलेल्या सामानाची अडगळीत रवानगी करताना तिने कधी तरी भरतकामासाठी काढलेल्या डिझाईन्सचे ट्रेस पेपर जीर्णवस्थेत सापडले. (बहुदा १९८० च्या दशकातील असावेत.) आमची मोठी बहीण कॉलेजमध्ये शिकत असताना बहुदा तिला भरतकाम यावे यासाठी आई आणि बहिणीने या डिझाईन्सचे संकलन केले असावे…नक्की सांगता येत नाही. पण रोजच्या जगण्यात ‘आई गं’ म्हणून आठवणारी आई अजूनही ‘अवती-भवती’ आहे, हा विचार उभारी देवून गेला.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)