When do corporate companies give their employees the boot….?
When hiring for a job, educational qualifications, prior experience, comprehension skills and positivity are evaluated. Despite this, corporate management often shows staff the door citing performance reasons. What exactly do corporate companies expect from their employees…? If an employee lacks the capability to complete quality work on time, is the management showing sympathy or favoritism during the 6 to 10 rounds of interviews…? Or is the selection process is reliable, then is the boss failing to extract quality work from employees according to their abilities…? Does the same rule apply to the position of a boss in corporate culture ……?
जॉबवर घेतानाच शैक्षणिक अहर्ता, पुर्वानुभव, आकलनशक्ती, सकारात्मकता तपासून नियुक्ती केल्यानंतर देखील परफॉर्मन्सच्या कारणावरून स्टाफला घरचा रस्ता दाखविणाऱ्या कार्पोरेट व्यवस्थापनाला आपल्या कर्मचाऱ्यांकडून नेमकं काय हवं असतं….? जर गुणवत्तेचं काम वेळेत पूर्ण करण्याची त्याच्यामध्ये कुवतच नसेल तर व्यवस्थापन त्याला मुलाखतीच्या किमान ६ ते १० फेऱ्यातून निवडताना सहानुभूती किंवा मर्जी दाखवत असते का….? किंवा निवडीची प्रक्रियाच चुकीची आहे का….? जर निवड प्रक्रिया विश्वासार्ह आहे, तर मग कर्मचाऱ्यांच्या कुवतीनुसार त्याच्याकडून गुणवत्तेचे काम करून घेण्यात त्यांचा बॉस कमी पडतो का…? मग कार्पोरेट कल्चरमध्ये बॉस या पदासाठी देखील हाच नियम लागू आहे का….?

काल कार्पोरेट कल्चरमध्ये वृत्तपत्र समूहात काम करणाऱ्या मित्रांनी प्रमोशन मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ हॉटेलमध्ये जंगी पार्टीचे आयोजन केले होते. अर्थात पार्टीचे निमंत्रण असल्याने त्यांच्या जल्लोषात सामील होण्याची संधी मिळाली. रोज सकाळपासून ‘टार्गेट आणि अचिव्हमेंट’च्या केमिकल इक्वेशनमध्ये ‘परफॉर्मन्स’चा कायम तणावात रिझल्ट शोधणाऱ्या माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पहायला मिळाला. काहींना प्रमोशन तर काहींना इन्क्रीमेंट मिळाल्याने काही वेळासाठी का होईना सगळेच एका टेबलावर समान पातळीवर आल्याचा मला भास झाला. अर्थात दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होताना तेव्हढीच ‘निर्व्याजता’ आपण दाखवायची असते, या पार्टीच्या नियमानुसार मी खुशीत असलो तरी एक प्रश्न सतावत होताच……प्रेशर पॉलिसीमध्ये काम करवून घेणाऱ्या कार्पोरेट व्यवस्थापनाला आपल्या स्टाफबद्दलची आत्मीयता कोणत्या पातळीवरची असते…? कारण रोजच्या असाईनमेंट पूर्ण करताना ‘डू ऑर डाय’चा मूलमंत्र जपणाऱ्या कार्पोरेट मॅनेजमेंटला आपल्या स्टाफचे प्रमोशन किंवा इन्क्रीमेंट करताना खरंच काही भावनिक मूल्ये असतात का..? कारण प्रमोशन किंवा इन्क्रीमेंटचे लॉलीपॉप वर्ष-दोन वर्षातून द्यायचे असते पण ‘डू ऑर डाय’चा झब्बू रोजच देत असतात. मग कर्मचाऱ्याच्या पात्रतेचा आणि गुणवत्तेचा गौरव करणारे कार्पोरेट कल्चर त्याच कर्मचाऱ्याला कधीही-कोणत्याही क्षणी डच्चू देण्याची कारवाई का करत असावे…? थोडक्यात कार्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ‘डच्चू’ केंव्हा देतात…?

आकर्षक पॅकेज आणि पद प्रतिष्ठा मिळते म्हणून कार्पोरेट कंपन्यांमधून नोकरी मिळवण्यासाठी जेव्हढी इच्छूकांची चढाओढ असते. त्यापेक्षाही अधिक संख्या मिळालेली कार्पोरेट नोकरी टिकवण्यासाठी तणाव झेलत धडपडणाऱ्यांची असते. कामाचा तणाव हा शब्दप्रयोगच मुळात कार्पोरेट कल्चरसाठी निर्माण झाला असावा का…? असा प्रश्न मनात सहज तरळून जातो. मुळात आपण भारतीय अगोदर मालकशाही मग सहकारी तत्त्वावरील खासगी नोकऱ्यातून पुढे लिमिटेड कंपन्यांच्या पठडीत नोकऱ्यांमध्ये स्थिरावलेल्या पिढ्यांचे प्रतिनिधी आहोत. त्यामुळे आता कार्पोरेट कल्चरमध्ये स्थिरावायला आपल्याला जड जाते. मालकधार्जिन्या व्यवस्थापनात ‘जमेल तेव्हढे काम आणि देतील तेव्हढा पगार’ हे सूत्र असते. मालकाची मर्जी संपादन केली तर ‘बरकत’ नाहीतर ‘ठेविले मालक तैसेचि रहावे’ ही स्थितप्रज्ञाची स्थिती अंगिकारावी लागते. सहकारी तत्त्वावरील उद्योग व्यवसायात मुळातच कुणाच्या तरी शिफारशीने नोकरी मिळवावी लागते. त्यात पुन्हा वर्चस्ववादी नेतृत्वाच्या इशाऱ्यावर काम आणि प्रगती अवलंबून असते. लिमिटेड कंपन्यांच्या धोरणात कर्मचाऱ्यांच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न व्यवस्थापन आपल्या पद्धतीने (लिमिटेड) सोडवीत असल्याने ती नोकरी देखील स्थिरता देणारी नसते. कार्पोरेट कल्चरमधील नोकरी देखील स्थिरतेच्या मुद्द्यावर लिमिटेड कंपन्यांमधील नोकरी सारखीच असते. फक्त इथे महत्वाचा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कल्पकतेला (उत्पादनसंदर्भात) अमर्याद स्वातंत्र्य असते. इथे शिफारशीपेक्षा प्रत्यक्ष गुणवत्तेला महत्व दिले जाते. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे इथले ‘तणाव व्यवस्थापन’ झेलणारा कर्मचारीच कार्पोरेट कल्चरमध्ये टिकू शकतो. इथे टिकण्याचा ‘परफॉर्मन्स’ हा जरी परवलीचा शब्द असला तरी तो फक्त ‘चॉकलेट’ म्हणून चघळण्याचा तुकडा असतो. परफॉर्मन्समध्ये जरी तुम्ही गडबडला तरी देखील कार्पोरेट व्यवस्थापन तुम्हाला ‘तणावपूर्ण’ स्थितीत संधी देत असते. तुम्ही जितके अस्थिर असाल तेव्हढे तुम्ही तुमच्या स्थिरतेसाठी धडपडाल हाच कार्पोरेटचा ‘फंडा’ असतो. त्यामुळे ‘परफॉर्मन्स’चा बडगा जरी मानेवर असला तरी केवळ या एका कारणाने कार्पोरेट कंपनी कधीच आपल्या कर्मचाऱ्याचा ‘बळी’ घेत नाही. पण जर तुम्ही मर्यादित स्वप्नांमध्ये ‘कम्फर्ट झोन’ शोधत असाल तर मात्र कार्पोरेट व्यवस्थापनाला असा कर्मचारी ठेवण्यात काडीचाही इंटरेस्ट नसतो. म्हणूनच कार्पोरेट कल्चरमध्ये टिकायचे असेल तर ‘कम्फर्ट झोन’मध्ये जाण्याचा कधीच विचार करू नकात…. कारण स्वतःला मर्यादित आणि सुरक्षित करू पाहणारा कर्मचारी हा कंपनीच्या उत्पादनाला आणि विस्ताराच्या धोरणाला मर्यादित मानसिकतेमधून पाहतो, हाच कार्पोरेट कंपन्यांना सर्वात मोठा धोका वाटतो. त्यामुळेच अश्या कर्मचाऱ्यांना कार्पोरेट कंपन्या घराचा रस्ता दाखवतात.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा