शेवट गोड व्हावा…हीच प्रत्येकाची इच्छा असते !

Everyone wishes for a sweet ending !

There is a very good saying that, broadly speaking, everyone’s story is the same,but the ending is different. This sentence, which conveys a lot, applies to everyone. While living our lives, we believe that we are very different from others. Each person lives a life that resembles the plot of a masala (entertaining) movie, with its successes and failures, bitter and sweet memories, and ups and downs of sorrow and joy. Despite this, the end of each person’s life is unique. In fact, it is the ending that determines how a person lived and what their life was like.

एक फार चांगलं सुभाषित आहे, ढोबळमानाने प्रत्येकाची कथा सारखीच असते, वेगळा असतो तो शेवट. खूप काही सांगून जाणारे हे वाक्य प्रत्येकालाच लागू होते. आपण आपलं आयुष्य जगताना इतरांपेक्षा फार वेगळे आहोत याच अविर्भावात जगत असतो. आयुष्यातील यश-अपयश, कडू-गोड आठवणी, दुःख आणि आनंदाचे चढ-उतार एखाद्या मसाला चित्रपटाच्या कथेला शोभेल असेच प्रत्येकजण जगत असतो. तरी देखील प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट वेगळाच असतो. खरं तर शेवट कसा झाला ? यावरच तो व्यक्ती कसा जगला, त्याचं आयुष्य कसं होतं ? हे ठरवल्या जातं.

मनुष्ययोनी नंतर पुढे काय ? हा प्रश्न माणसाला आयुष्य जगताना अनेकवेळा पडतो. तो आपल्यापरीने त्याचे उत्तर शोधण्याचा मृत्यूपर्यंत प्रयत्न करत असतो. हिंदू धर्मासह इतर धर्मातही स्वर्ग आणि नरक ह्या संकल्पना मांडल्या आहेत. मनुष्यरूपी आयुष्य जगताना तुम्ही केलेल्या वर्तनानुसार तुमच्या पाप-पुण्याचा हिशोब केला जातो. त्यानुसारच मृत्यूनंतर तुमचे स्थान नेमके स्वर्गात की नरकात हे ठरविल्या जाते. हा सिध्दांत सर्वच धर्मशास्त्रातून मांडला गेला आहे. नीती-अनीती, छळ-कपट, लोभ-परमार्थ, जय-पराजय, प्रपंच-विरक्ती या व अशा अनेक खाच-खळग्यातून आयुष्याचा मांडलेला समग्र प्रवास सर्वच धर्मग्रंथातून रूपक कथांच्या माध्यमातून मांडलेला आहे. हिंदू धर्मातील ‘महाभारत’ ही धर्मग्रंथासमान असलेली जीवनाचा सार सांगणारी महाकथा प्रत्येक हिंदूला  सत्य-असत्याच्या पलीकडे जावून देखील मान्य आहे. कारण ही महाकथा म्हणजे फक्त पुराणकालीन युद्धकथा नाही, तर कर्माला स्थान देत तुमच्या पुढील जन्माच्या प्रयोजनाचा संकेत देणारा तो एक आरसाच आहे. कौरव-पांडवामधील कुरुक्षेत्रावरील भीषण महायुद्ध म्हणजेच महाभारत नाही. तर युद्धातील रणकंदनानंतर युद्धपर्व समाप्ती नंतर पांडवांनी आपले जीवनकार्य संपले म्हणून जो ‘स्वर्गारोहणाचा’ प्रवास केला त्याचे वर्णन म्हणजे उत्तर महाभारत आहे. जसे कर्म कराल तसेच परमेश्वर फळ देतो हे सप्रमाणित करणारी संहिता म्हणजेच महाभारत आहे. एकूणच तुम्ही कसे जगत आहात, यापेक्षा तुमचा शेवट कसा असावा यावरच तुमची सार्थकता मानणारा हिंदुधर्मीय मृत्यूनंतर काय ? ही गूढता शोधतो. म्हणूनच जन्मापासून मृत्यूपर्यंत आलेल्या संघर्षाची कथा ही सर्वांची सारखीच समजण्याची त्याची मानसिकता शेवट कसा आहे ? इथपर्यंत येवून थांबते. निरीश्वरवादी माणूस कदाचित सुखाचा स्वाद घेत जगण्याला महत्व देत असेल. त्याच्यादृष्टीने पाप-पुण्य ह्या भाकड कल्पना असतील. तरीदेखील मृत्यूनंतर लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे ही त्याची लालसा असतेच. या लालसेपोटी का होईना तो काही प्रमाणात का होईना नकळतपणे परोपकार करतोच. अर्थात त्याने केलेल्या परोपकाराचे प्रमाण अधिक झाले, तर त्याच्या मृत्यूनंतर लोक तो स्वर्गात गेला असाच समज करून घेतात. तात्पर्य प्रत्येकाचा शेवट वेगळा असतोच. कथेला शेवट हवा म्हणून नव्हे तर आरंभ आणि पुढचा प्रवास कळावा म्हणूनच प्रत्येक कथेचा शेवट देखील असतोच……

:-मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)