श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अविरत अन्नदानाचे महापर्व…!

Devotees of shri Swami Samarth, the Lord of infinite universe, come from all over the world to Akkalkot (District solapur, Maharashtra) for his darshan (divine sight). The number of devotees is increasing day by day. Along with swami’s darshan,devotees should also benefit from the Maha prasad (sacred food). To facilitate this, since 1988, the Shri Swami Samarth Annachatra Mandal Trust has initiated a great yagna ( sacrificial ritual ) of food donation. Under the guidance of the founder president, Janmejayraje Vijaysinhraje Bhosale, the food donation service continues uninterrupted. ‘Guru Purnima’ is the foundation day of the Shri Swami Samarth Annachatra Mandal. This year, the 37th anniversary of the Mandal is being celebrated with new resolutions.

अनंतकोटी ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांचे भक्त जगभरातून अक्कलकोट (जि.-सोलापूर,महाराष्ट्र) येथे दर्शनासाठी येत असतात. दिवसेंदिवस भक्तगणांच्या संख्येत वाढ होतच आहे. स्वामींच्या दर्शनाबरोबरच महाप्रसादाचा लाभ भक्तगणांना व्हावा याकरिता १९८८ पासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्यावतीने अन्नदानाचा महायज्ञ प्रज्वलित करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे  भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदानाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. गुरुपौर्णिमा हा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा स्थापना दिन आहे. यंदाचा ३७ वा वर्धापन दिन नव्या संकल्पांसह साजरा होत आहे.





अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.

स्वामी सेवेचा ध्यास आणि स्वामीदर्शनासाठी अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर १९८८ मध्ये जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प.पू. मोहन पुजारी, शामराव मोरे आणि आपल्या इतर सहकाऱ्यांच्या सहयोगाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या धर्मादाय न्यासाची मुहूर्तमेढ रोवली. जन्मेजयराजे महाराजांनी प्रथमतः ३ किलो तांदळाचा प्रसाद स्वामींना महानैवेद्य म्हणून दाखवला, भाविकांना महाप्रसाद दिला आणि अन्नछत्र मंडळाच्या अन्नदानाचा महायज्ञाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या धर्मादाय संस्थेची नोंदणी झाल्यानंतर , सार्वजनिक धर्मादाय न्यास अस्तित्वात आले. स्वामीभक्त कै. अंबुबाई सरदेशमुख या मातोश्रींनी उदार अंतःकरणाने वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत स्वतःच्या मालकी जागेत अन्नछत्र सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला अगदी लहान स्वरूपात हे कार्य सुरू होते. पुढे दिवसेंदिवस स्वामीभक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता, या धर्मादाय न्यासाने देवस्थानाच्या दक्षिण बाजूस कै. वीरभद्र कोळ्ळे यांच्या मालकीच्या जागेची रीतसर खरेदी करून त्या जागेवर नियोजनपूर्वक मोठे पत्राशेड उभारून १९९४ मध्ये अन्नछत्राचा कार्य विस्तार केला. सध्याचे अन्नछत्र प्रशस्त आणि वातानुकूलित आहे. अनेक स्वामी भक्तांनी या पुण्यकार्यात सढळ हस्ते देणग्या दिल्या. देणग्यांचा ओघ वाढतच गेला आणि आजही तो सुरू आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस १५ ते २० हजाराहून अधिक स्वामीभक्त महाप्रसादाचा लाभ घेवून तृप्त होतात. उत्तम नियोजन, भक्तांच्या गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन , महाप्रसादासाठी गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा व भाजीपाल्याचा वापर करण्याची दक्षता घेतली जाते. तसेच सर्व गुणवत्ता मानकांची काळजीपूर्वक अंमलबजावणी ही केली जाते. तसेच वॉटर सॉफ्टनरच्या माध्यमातून भक्तांना क्षार विरहित व आर.ओ. (RO)चे पिण्याचे पाणी दिले जाते. अन्नछत्र मंडळाच्या दैनंदिन कार्यात ३०० सेवेकरी असून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालतो. परगावच्या स्वामीभक्तांच्या निवासाच्यादृष्टीने यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी, गणेश मंदिर यात्री थांबा या निवासी इमारती बांधल्या असून यामध्ये स्वामीभक्तांना सोयी-सुविधा देवू केल्या आहेत. या विविध यात्री निवासस्थानातून जवळपास अडीच ते तीन हजार भाविकांची उत्तमप्रकारे निवास व्यवस्था केली जाते. सद्यस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या परिसरात प्रशस्त आणि भव्य असे ४ एकरातील वाहनतळ, वाहनतळ शेड तसेच २७० के.व्ही.क्षमतेचे सोलर प्रोजेक्ट कार्यान्वित आहे.

नव्याने बांधण्यात येत असलेले नियोजित महाप्रसादगृह.

अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती लक्षणीय संख्या पाहता भविष्यकाळात सध्याचे अन्नछत्र मंडळाचे प्रसादालय अपुरे पडू शकते, म्हणून मंडळाने नियोजित पाच मजली महाप्रसादगृहाची वास्तू उभारण्याचा संकल्प यंदा २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सिद्धीस जात आहे. ही पाच मजली वास्तू भव्य आणि मंदिरसदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरसफुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटी सुंदर, रेखीव आणि भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

अन्नछत्र मंडळाचा आशावाद अमोलराजे जन्मेजयराजे भोसले.

गेली ३६ वर्षे अन्नछत्रमंडळाच्या माध्यमातून अविरतपणे अन्नदानाचे अग्निहोत्र सुरू ठेवणाऱ्या जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आता अमोलराजे देखील स्वामीकार्यात समर्पित झाले आहेत. अन्नछत्राच्या स्वामीकार्यासाठी एक-एक माणूस जोडत माणसांचा महासागर करणाऱ्या जन्मेजयराजे महाराजांचे कुशल व्यवस्थापनाचे बारकावे अमोलराजे यांच्या शिस्त आणि नियोजनबद्ध कार्यातून दिसत असल्याने अन्नछत्र मंडळाच्या अन्नदानाच्या अग्निहोत्रामध्ये समर्पित होणाऱ्या समिधांचा अखंडित स्रोत असाच सुरू राहील. स्वामींचा ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा वरदमंत्र या कार्याच्या पाठीशी सदैव राहील.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

0

)