Young Indians Show A Tendency To Quit Jobs….!
On one hand, the issue of unemployment has taken a severe form in the world’s largest democratic country, India, over the past 15 years. On the other hand, a large number of young Indians show a tendency to quit jobs easily. Many end up unemployed because the education they have received is different from the field they are passionate about, leading them to quit their current jobs in hopes of finding one in their preferred field. Additionally many seek jobs beyond their capabilities simply because of the attractive earning they offer. However, this daydreaming prevents them from making a significant effort to secure a job, resulting in unemployment for these young individuals as well.
एकीकडे भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीवादी देशात बेरोजगारीचा प्रश्न गेल्या १५ वर्षात उग्ररुप धारण केलेला दिसत असताना भारतीय तरुणांमध्ये जॉबसाठी मोठ्या प्रमाणात धरसोडवृत्ती दिसत आहे. मुळातच आपण घेतलेले शिक्षण आणि आपल्याला करिअर म्हणून आवडणारे क्षेत्र वेगवेगळे असल्यामुळे अनेकजण आहे तो ‘जॉब’ लाथाडून आवडीच्या क्षेत्रात जॉब मिळवण्याच्या प्रतीक्षेत बेरोजगार होतात. तर बऱ्याच जणांना आपल्या क्षमतेबाहेरचे काम हवे असते. ते केवळ त्यापासून मिळणाऱ्या आकर्षक ‘कमाई’मुळे. पण या स्वप्नरंजनामुळे ते ‘जॉब’ मिळविण्यासाठी विशेष धडपड करताना दिसत नाहीत. पर्यायाने असे तरुणही बेरोजगार होत आहेत.

सद्यस्थितीत भारतातील विचार केला तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE)च्या अहवालानुसार जून २०२४ पर्यंत इंडियाचा बेरोजगारीचा दर ९.२ टक्के इतका आहे. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया’च्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोरोना नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असली तरी पदवीधर बेरोजगारांची संख्या अद्याप १५ टक्क्यांच्या पातळीवर आहे. वेगवान आर्थिक विकास होवूनही २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ४२ टक्के पदवीधर बेरोजगार आहेत. अगदी २००८ ते २०२४ पर्यंत भारतातील बेरोजगारीच्या दराची यादी तपासली तर मोठी तफावत समोर येते. २००८ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर ५.४१ होता. तो २०१३ मध्ये ५.४२ टक्के एव्हढा झाला होता. म्हणजेच पाच वर्षात बेरोजगारीचा दर फक्त १ टक्क्याने वाढला होता. पण त्यानंतर आता जून २०२४ च्या अहवालानुसार हाच आकडा ९.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या १० वर्षांच्या काळात अनेक घटना घडल्यात ज्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झालेला आहे. ज्यामध्ये आर्थिक मंदीची लाट, कोरोना महामारी, जगातील युध्दसदृश्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती याबरोबरच भारतात नोटबंदीचा फसलेला प्रयोग ही जशी बेरोजगारीची संख्या वाढी मागची कारणे आहेत त्याचबरोबर बेरोजगार राहणाऱ्या भारतीय तरुणांची मानसिकता हा विषय देखील विचारात घेण्याइतपत मोठा आहे. विशेषतः पदवीधर किंवा शिक्षित तरुणांची अपेक्षा आणि स्वप्ने त्यांना मिळणारा ‘जॉब’ देखील करू न देणारी अशीच आहेत.

भारतीय तरुण ‘जॉब’ पेक्षा त्याच्या ग्लॅमरकडे जास्तप्रमाणात आकर्षित झालेला असतो. त्यामुळेच ‘जॉब’मुळे मिळणाऱ्या सुख-सुविधांचा लाभ त्याला नेहमीच विचलित करणारा ठरतो. कोणत्याही जॉबमध्ये सातत्य आणि अनुभव मिळतो त्यानंतरच तुम्हाला त्या जॉबच्या ग्लॅमरचा उपभोग घेण्याची संधी मिळत असते. हे जरी माहीत असले तरी भारतीय बेरोजगारांच्या ते अंगवळणी पडत नाही. थोडक्यात ‘कळतं पण वळत नाही’ अशी अवस्था झालेली असते. त्यामुळे मिळणारे काम सोडून न मिळणाऱ्या कामाच्या प्रतीक्षेत स्वप्नरंजन करण्यात भारतीय तरुण आपल्या आयुष्याचा महत्वाचा कालावधी वाया घालवतो. शिवाय शिक्षण घेत असतानाही त्याला भविष्यात नेमकं काय करायचं आहे ? याचे उत्तर सापडलेले नसते. मुळात भारतीय शिक्षण प्रणाली ही ‘ज्ञानवर्धक’ असली तरी ‘जॉब’ मिळवून देणारी खात्रीशीर प्रणाली नाही. आता व्यवसायभिमुख शिक्षण ही जशी प्रणाली विकसित केली जात आहे, तशीच भविष्यात रोजगाराभिमुख शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर द्यावा लागणार आहे. होय, व्यवसायभिमुख आणि रोजगाराभिमुख ह्या दोन वेगवेगळ्या प्रणाली आहेत.

सार्वजनिक विकासासाठी सरकारला जबाबदार धरणे हे एकवेळ योग्य आहे. पण तुम्ही तुमच्या व्यक्तिगत प्रगतीला देखील सरकारलाच जबाबदार धरणार असाल तर तुमचं कुठं तरी चुकत आहे. या देशात तुम्ही जन्म घेतलात म्हणून या देशावर सत्ता करणाऱ्या सरकारने तुम्हाला पोसायचे ही भूमिकाच मुळात चुकीची आहे. लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या आपल्या देशात सत्ताधारी राजकीय पक्षाच्या बरोबरीने विरोधी राजकीय पक्षांना महत्व आहे. केवळ सत्ता हस्तगत करायची यासाठी जर विरोधीपक्ष देशातील तरुणांना हाताशी धरून भ्रम निर्माण करणार असेल तर त्या लोकशाहीवादी देशातील बेरोजगारीची समस्या कधीच संपुष्टात येणार नाही. हे आपल्या इथल्या राजकीय पक्षांच्या ध्यानात आले तरी ते जोपर्यंत तरुणांना ठणकावून सांगणार नाहीत तोपर्यंत भारतीय तरुणांची ‘जॉब’साठीची धरसोडवृत्ती नियंत्रणात येणार नाही. ‘खाईन तर तुपाशी’ ही मानसिकता बेरोजगारी वाढविणारी आहे . हे आता कुणीतरी सांगण्यापेक्षा आपण अनुभवातून स्वीकारावे लागणार आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा