

उच्च शिक्षणासाठी, व्यवसाय किंवा नोकरीसाठी, डॉलरच्या कमाईसाठी विदेशात स्थलांतरित होण्याच्या भारतीयांच्या स्वप्नांना कोविड 19 महामारीमुळे चांगलाच ब्रेक लागला असं म्हणता येईल. संयुक्त अरब अमिराती, दुबई, कुवैत, अमेरिका, लंडन, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशातून चांगला पैसा कमावून भारतात परत यायचं. हे स्वप्न पाहणारे आजही अनेक भारतीय तरुण-तरुणी गेल्या दोन वर्षांपासून ‘कधी एकदा सुरळीत होतंय या संधीची वाट पहात बसले आहेत. फार स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळातील विलायतेला जाण्याच्या गप्पा सांगण्यात काहीच अर्थ नाही. साधं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय मधून प्लम्बरचा कोर्स केलेला विद्यार्थीसुद्धा आखातात नोकरी मिळते म्हणून धडपडायचा. त्यात त्याला यश सुद्धा मिळायचे. मग काहीवर्षे तिथे नोकरी करून बक्कळ पैसा साठवून तो परत मायदेशी परतायचा. १९८० पासून सुरू झालेला हा ट्रेंड अगदी २०१५ पर्यंत आपली क्रेझ टिकवून होता. आपण आपला देश प्रगतीपथावर आहे असं म्हणतो, विविध नव्या क्षेत्राची दारे खुली झाली आहेत. काम करणाऱ्याला या देशात खूप काम आहे असं म्हणतात. मग भारतातून परदेशात स्थलांतरित होण्याचे प्रमाण का वाढतेय ? याचा मात्र सखोल विचार आणि त्यावर पर्याय निर्माण करण्याची मूव्हमेंट कुणीच चालवत नाही. या देशात लोकशाही आणि मुक्तस्वातंत्र्य नांदत आहे. त्यामुळे परदेशी स्थलांतरित होण्याच्या कुणाच्या स्वप्नांना अडथळा निर्माण करणे गैर असले तरी तुमची मायभूमीला जास्त गरज आहे, इथेच पोषक वातावरणात तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा ! असं सरकार ठामपणे का सांगू शकत नाही ?

भारत हा देशचं मुळात स्थलांतरितांचे (migreat people) आश्रयस्थान असलेला देश आहे. अगदी मानव वसाहत करून राहू लागला त्याकाळापासूनचा म्हणजेच प्राचीन काळाचा इतिहास तपासून पाहिला तरी हे लक्षात येते. आर्य-अनार्य हा वाद देखील त्यातूनच आलेला आहे. भारतीयांनी आक्रमण करून कुठलाही भूप्रदेश बळकावत तिथे आपली संस्कृती वसविली नाही. ज्या आशियायी देशात भारतीय संस्कृतीचे अवशेष सापडतात ते देश पूर्वी भारताचेच भाग होते. म्हणजेच भारतीयांचा स्थलांतर (migreat) होण्याचा फार प्राचीन इतिहास नाही. मात्र स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर भारताला फाळणीच्या रूपाने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले हा इतिहास आहे. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीतून भारतात सर्वात मोठे पहिले स्थलांतर झाले असं आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्यानंतर मात्र शिक्षण, उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने भारतीयांचे युरोपीय देशांमधून स्थलांतर सुरू झाले. विदेशात आपली पुढची पिढी शिकतेय…पैसा कमावतेय हे भारतीय मानसिकतेमधून प्रतिष्ठेचे लक्षण बनले. स्वातंत्र्यानंतर मूलभूत सुविधा, शिक्षण आणि रोजगार या प्रमुख मुद्द्यांवरच स्थलांतर होवू लागले. याला भारत सरकार देखील रोखू शकले नाही. अर्थात विकासाच्या वाटेवर निघालेल्या कोणत्याही देशात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत तर त्या देशातून मोठ्या प्रमाणावर समूहाने स्थलांतर होत असते. भारताला शेजारील देश पाकिस्तान, नेपाळ, चीन, श्रीलंका, बांगलादेश या देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न डोकेदुखीचा बनला आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांचा देखील बोजवारा उडत असतो. अश्या क्रियेला आपण अतिक्रमित स्थलांतर म्हणूयात. भारतात येणारे स्थलांतरित लोंढे हे आता भारताच्या वाढत्या लोकसंख्येचा ‘बॉम्ब’ बनले आहेत. याउलट ज्या देशांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशिक्षित वाढत्या मनुष्यबळाची गरज असते असे देश अश्या प्रशिक्षित मनुष्यबळाला स्थलांतर करण्यासाठी प्रलोभने देत प्रवृत्त करत असतात. ही प्रलोभनेच स्थलांतरित समूहाची प्रतिष्ठा बनत जाते. १९७० पासूनच जगातल्या अश्या अनेक देशांतून भारतीय प्रशिक्षित मनुष्यबळाचे स्थलांतर प्रलोभनाच्या आधारे व्हायला सुरुवात झालेली दिसते. आधी स्वतःच्या गावात कमाईचे साधन मिळत नाही म्हणून शहराकडे स्थलांतर करणारे मनुष्यबळ देशाच्या सीमारेषा ओलांडून गेला तरी आपण त्याला ‘प्रतिष्ठा’च समजत राहिलो. आज याच प्रतिष्ठित स्थलांतरितांचा (NRI) परत भारतात येण्याचा प्रश्न जटिल बनतोय.

आखाती देशांमध्ये जेंव्हा यादवी युद्धे सुरू झाली, तेंव्हा पहिल्यांदा स्थलांतरित भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातून बरेचजण मायदेशी परतले. मात्र पुन्हा पैसा कमावण्याच्या उद्देशाने स्थलांतर करण्याचे स्वप्न बळावत गेले. त्याला कारणीभूत इथे रोजगार निर्मितीवर सरकारचे कोणतेच नियंत्रण नसणे हे जसे प्रमुख कारण आहे तसेच प्रतिष्ठेचे लक्षण आणि उच्चशिक्षणाचे लटकते स्वप्न ही देखील प्रमुख कारणे आहेत. आपले देशी शिक्षणंच विदेशी शिक्षणाचे स्वप्न दाखवणारे आहे. त्यामुळेच मोठ्याप्रमाणात Brain Drain व्हायला लागला आहे. हीच स्थलांतरित होणारी भारतीय बुद्धिमत्ता भारताच्या प्रगतीसाठी खर्ची घातली तर निदान आपल्या मातृभूमीची सेवा केल्याचे मरणोत्तर सुख मिळेल. आता गेल्या काही वर्षात साथीच्या रोगांचे संक्रमण विमानसेवेमुळे झपाट्याने होत असल्याचे संशोधन पुढे आल्याने नव्याने उत्पन्न होणाऱ्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सरकार आपली विमानसेवा काहीकाळासाठी स्थगित करते. मायदेशी भेटायला येणारे हे एनआरआय त्याचे वाहक बनतात हेच कोरोना महामारीतून पुढे आले आणि २०१९ पासून विदेशात स्थलांतरित होण्याचे आकर्षण काही काळासाठी का होईना कमी झाले आहे असे वाटते. अर्थात विमानसेवा पूर्ववत झाली की पुन्हा हे स्थलांतर सुरूच राहील. अजूनही शिक्षण आणि रोजगार या विषयावर आपण खूप प्रगतीपथावर आहोत असे म्हणता येणार नाही.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.