
क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ असून इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ असलेले क्रिकेट भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलॅन्ड, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंकासह आता आखातातील देशातही खेळला जातो. भारतात क्रिकेटची सुरुवात १७९७ च्या सुमारास झालेले उल्लेख सापडतात. क्रिकेटमध्ये मैदानावर निर्णय देण्यासाठी दोन पंच (अंपायर) ठेवण्याची प्रथा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये १८७७ मध्ये एका कसोटी सामन्यावेळी सुरू झाली. कोसस्टिक आणि करटीस रीड हे दोघे जगातील पहिले पंच ठरले. दोघेही ऑस्ट्रेलियाचे होते. पुढे क्रिकेट जसजसे लोकप्रिय होत गेले, तसतसे फलंदाज, गोलंदाज, कर्णधार, विकेटकीपर लोकप्रिय होत गेले. मात्र खेळाचा निर्णय देणारा पंच (अंपायर) हा मात्र त्यामानाने दुर्लक्षितच राहिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचे अंपायरिंग करणाऱ्या आजवरच्या अनेक अंपायरमध्ये डरेल हियर, डरेल हार्पर, सायमन टॅफेल, फ्रेंच चेष्टर, हेरॉल्ड डिकी बर्ड, स्टीव्हन डन, बिली बाऊंडेन, रुडी कार्टसन, डेव्हिड आर्चर्ड, स्टीव्ह बकनर, श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन, व्ही. के. रामास्वामी अशी श्रेयनामावली मोठी आहे. जेंव्हा आंतरराष्ट्रीय सामन्यातून आर्थिक उलाढाल वाढली त्यानंतर क्रिकेट हा खेळ श्रीमंत झाला. याबरोबरच क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू देखील अब्जोपती झाले. मात्र किती पंच (अंपायर) हे खेळातून अब्जोपती झाले ? जे निवृत्तीनंतर समाधानाचे आयुष्य जगत आहेत त्यांची एकतर आर्थिक परिस्थिती पूर्वीपासून चांगली आहे किंवा त्यांचे उत्पन्नाचे इतर स्रोत आहेत. ज्यांनी आयुष्यभर फक्त क्रिकेटचे पंच म्हणूनच कामगिरी केली ते निवृत्तीनंतर नेमके काय करीत आहेत ? याचा आपण कधी विचार केला आहे का ?




सोलापूर आणि क्रिकेटचे खूप दृढ असे नाते आहे. सोलापुरात जन्मलेले आणि हरिभाई देवकरण प्रशालेचे विद्यार्थी असलेले भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि मध्यमगती गोलंदाज पॉली उम्रीगर यांच्यापासून सोलापूर आणि क्रिकेटचे नाते दृढ होत गेले आहे. सलीम खान हा रणजीपटू देखील सोलापूरच्या क्रिकेटने दिला आहे. त्याचप्रमाणे अंपायर देखील दिले आहेत. त्यातीलच एक अंपायर सुनील नारायण ढोले आज वयाची सत्तरी ओलांडलेले आहेत. त्यांचे वडील नारायण ढोले यांचा भागवत चित्रमंदिराच्या आवारात ‘पे अँड पार्क’ तत्वावर वाहनतळ व्यवसाय आहे. महाविद्यालयीन वयातच त्यांनी सुनील यांना या व्यवसायात आणले. त्यामुळे पदवीचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागलेल्या सुनील यांनी क्रिकेट मात्र सोडले नाही. १९८७ पासून जिल्हास्तरीय क्रिकेटमधून नाव चमकविलेले सुनील ढोले हे २००२ मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेतल्या जाणारी पंच परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या सोबतच अनिरुद्ध दाते, विवेक महाजन, अनीश सहस्त्रबुद्धे, सोहेल मुन्शी, अक्षय शाह हे देखील ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर आजतागायत सोलापूरचा एकही क्रिकेटप्रेमी पंचाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे स्मरत नाही. आता या सहा पंचांपैकी अनीश सहस्त्रबुद्धे आणि सोहेल मुन्शी हे दोघेच मॅचमध्ये पंच म्हणून कामगिरी बजावताना अधिक दिसतात. तर २००२ मध्ये पंच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुनील ढोले यांनी अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यांमधून पंच म्हणून काम पाहिले. ३ नोव्हेंबर २००५ मध्ये पुणे येथे झालेल्या भारत-श्रीलंका वन डे मॅच साठी अंपायर म्हणून काम करण्याची संधी सुनील ढोले यांना मिळाली. २०१९ पर्यंत त्यांनी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय सामन्यांमधून पंच म्हणून काम पाहिले आहे. आयुष्यभर क्रिकेटचा ध्यास घेतलेल्या सुनील ढोले यांनी क्रिकेट पंच आणि वडिलांचा वाहनतळ व्यवसाय सांभाळणे ह्या दोनच गोष्टी केल्या आहेत.

पत्नी सौ. सुवर्णा आणि अमित व सुमित ही दोन मुले असा सुनील यांचा परिवार आहे. मोठा अमित हा अभियंता असून मुंबईत नोकरी करतो. तसेच सुमित देखील नोकरीला लागला आहे. क्रिकेटमुळे जगण्याला आकार मिळाल्याचे समाधान व्यक्त करणारे सुनील ढोले यांचे काहीच मागणे किंवा तक्रार नाही. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या काळात सर्व सिनेमागृहे बंद असल्याने वाहनतळ व्यवसाय देखील बंद ठेवावा लागला. त्यामुळे उपजीविकेचे अर्थकारण डगमगले. याकाळात जिल्हा क्रिकेट असोसिएशन किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून माजी खेळाडू आणि पंचांना साधी विचारणा देखील झाली नाही याचीच त्यांना खंत वाटते. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेंव्हा आर्थिकदृष्ट्या मजबूत नव्हती अश्याकाळात पंच म्हणून मिळणारे मानधन देखील आजच्या तुलनेत कमीच होते. जे मिळाले ते आपले नशीब असं समजणाऱ्या सुनील ढोले सारखे आणखी किती माजी खेळाडू-पंच असतील जे आपत्तीच्या काळात फक्त सहानुभूतीने चौकशीची अपेक्षा ठेवत असतील….!
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा