
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीने समाजसुधारक आणि सुधारणावादी पुढाऱ्यांना भारतीय समाजांतर्गत जातीयवाद, अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा समान हक्क या तीन आघाड्यांवर लढा द्यावा लागत होता. भारतीय समाजांतर्गतच जातीभेद आणि स्पृश्य-अस्पृश्यतेची भिंत असल्याचे पाहूनच वर्णद्वेषी ब्रिटिशांनी त्यांच्याकरिता सुरू केलेल्या हॉटेल्स मधून भारतीय वंशाच्या लोकांना प्रवेशासाठी मज्जाव करणारे बोर्ड हॉटेल बाहेर लावलेले असायचे. त्याचकाळात म्हणजेच १८९६ मध्ये सिनेसृष्टीचे जनक समजल्या जाणाऱ्या लुमायर बंधूंच्या पहिल्या सिनेमाचा शो मुंबईच्या वॉटसन हॉटेल मध्ये आयोजित केला होता. हा सिनेमा पहायची जमशेटजी टाटा यांची इच्छा होती. मात्र हॉटेलबाहेर टांगलेली पाटी दाखवून त्यांना प्रवेश नाकारला. सिनेमा बघायला मिळाला नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा भारतीयांना आणि कुत्र्यांना प्रवेशासाठी मनाई करणारा फलक पाहून दुःखी झालेल्या जमशेटजी टाटा यांनी पुढे १९०३ मध्ये भव्य आलिशान असे हॉटेल ताजमहाल बांधले आणि ते सर्वांसाठी खुले केले. गेट वे ऑफ इंडियाच्याही कैक वर्षे अगोदर हे हॉटेल बांधले गेले आहे हे विशेष. ब्रिटिशांच्या गुलामीत असतानाही भारतीय असण्याचा स्वाभिमान दाखविणारी ही घटना एकीकडे असतानाच भारतीय समाजात मात्र स्पृश्य-अस्पृश्य, मांसाहारी-शाकाहारी हा भेदाभेद अगदी टोकाला गेलेला होता. एकीकडे ब्रिटिशांसाठी असलेल्या हॉटेल्स, अधिकाऱ्यांच्या क्लबमधून भारतीयांना प्रवेश दिला जात नव्हता तर दुसरीकडे भारतीय हॉटेल्स, मंगलकार्यालयातून अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता. सोलापुरातील एका मोडकळीला आलेल्या मंगलकार्यालयाच्या जुनाट इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या दगडी चिऱ्यावर कोरलेल्या सूचना फलकावरील मजकूर अजूनही या भेदभावाच्या कडवट आठवणींची साक्ष देत मूकपणे उभा आहे.

सोलापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दत्तचौकात १९४३ मध्ये बांधलेल्या दिनकर मंगलकार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला दगडी चिऱ्यावर कोरलेली विनंतीवजा सूचना मंगलकार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या नजरेस पडेल अश्या ठिकाणी आजही स्पष्टपणे वाचता येते. त्या मजकुरातील ‘स्पृश्य हिंदू’ हे दोन शब्द काढून टाकण्याच्या प्रयत्नात थोडे अस्पष्ट झालेत मात्र उघड्या डोळ्यांनी वाचता येतील इतके ठळक आजही दिसतात. सोलापूर हे स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहरांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून गणल्या जात होते. याबरोबरच स्वातंत्र्याच्या आणि समाज सुधारणांच्या चळवळींचे महाराष्ट्रातील मुख्य केंद्र म्हणून सोलापूरची इतिहासातही नोंद आहे. भारतीय स्वातंत्र्य आधीच ब्रिटिशांच्या तावडीतून तीन दिवस सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून देणारा धगधगता जाज्वल्यपूर्ण इतिहास याच शहरातील चार स्वातंत्र्यसेनानींनी रचला. ब्रिटिशांनी त्यांना फासावर लटकावले. याच शहरात स्वातंत्र्याबरोबरच समाज सुधारणा आणि समतेसाठी जनजागृतीचा लढा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा सोलापूरशी सततचा संपर्क होता. अस्पृशांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून कर्नाटक सीमेलगत असलेल्या जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे महार वतन परिषद घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तर १९२१ ते १९४६ या काळात चार ते पाचवेळा सोलापूर शहर-जिल्ह्यात मुक्कामी दौरे झालेत. या अश्या सुधारणावादी वातावरणातही भेदभावाच्या भिंतींनी समाज विभागाला होता. सार्वजनिक ठिकाणी, लग्नकार्याच्या ठिकाणी शाकाहारी-मांसाहारी हा शब्दप्रयोग किंवा विभागणी आजही होते. ती केवळ ज्याच्या-त्याच्या आवडीप्रमाणे. आजही फक्त शाकाहारी किंवा फक्त मांसाहारी हॉटेल्स आहेत. याचबरोबर शाकाहारी-मांसाहारी भोजन मिळणाऱ्या हॉटेलमधून दोघेही एकमेकांच्या शेजारी ताटाला ताट लावून भोजना चा आनंद घेताना दिसतात. मात्र शाकाहारी स्पृश्य हिंदू असे वर्गीकरण आज अस्तित्वात नाही. ज्या काळी समाजात ‘स्पृश्य हिंदू’ आणि ‘अस्पृश्य हिंदू’ असे दोन तट पडले होते, त्याकाळची वेदनादायी आठवण जपणारा हा फलक वाटतो.

८० च्या दशकात हे मंगलकार्यालय कधीतरी बंद झाले. त्यानंतर या मंगलकार्यालयाचे प्रवेशद्वार कायमचेच बंद झाले. आता रस्त्याच्या बाजूने असणारे दुकानगाळे तेव्हढे सुरू आहेत. इमारत ७९ वर्षे जुनी असल्याने मोडकळीस आलेली दिसते. दुकानगाळेधारक आपआपल्या दुकानगाळ्यांची वरचेवर डागडुजी करीत असावेत इतकेच. मध्यवर्ती चौक असल्याने नेहमीच वर्दळीचा भाग म्हणून नजरेत भरणारी ही वास्तू आहे. स्वातंत्र्यानंतर धर्मांतर होईपर्यंत अस्पृश्यता पाळणाऱ्या या समाजाच्या मनातून भेदाभेद दूर व्हायला खूप काळ जावा लागला. आता निदान त्या वेदनांची आठवण करून देणाऱ्या खूणा तरी कायमच्या पुसल्या जाव्यात..! कारण समाजाला प्रेरणा देणाऱ्या चांगल्या स्मृतींचा इतिहास जतन करायचा असतो. त्यावरच पुढच्या पिढीचे भवितव्य असते.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा