मोदींच्या पक्षाला ‘यश’ नेमके कुणामुळे मिळतेय ?

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीला ‘यश’ नेमके कुणामुळे मिळतेय ? हा प्रश्न आता सर्वच विरोधी पक्षांबरोबरच राजकीय आकडेमोड तज्ज्ञांना पडला आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतून घवघवीत यश मिळविलेल्या भाजपाला त्यावेळी मोदी लाटेमुळे सत्ता मिळाली असा निष्कर्ष काढला गेला होता. तर २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या ‘यशा’मध्ये सातत्य राखल्या गेल्याने मोदी लाट अजून ओसरली नाही, असा निष्कर्ष माध्यमांनी आणि राजकीय अभ्यासकांनी (राजकीय आकडेमोड तज्ज्ञ) काढला होता. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायत निवडणुकांमधून भाजपाला मिळालेले यश पाहता मोदी लाट ओसरायला लागलीय असे वाटत असतानाच फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत पंजाब वगळता उर्वरित चार राज्यात भाजपाने उसळी मारत सत्ता हस्तगत केल्यामुळे मोदींच्या पक्षाला ‘यश’ नेमके कुणामुळे मिळतेय ? या गूढ प्रश्नाची उकल होणे आवश्यक बनले आहे. पराभवाचे चिंतन करणाऱ्या काँग्रेस पक्षात राजीनामे घेण्याचे आणि मागण्याचे ‘नाट्य’ सुरू झाले आहे. काँग्रेसच्या पराभवातून त्यांनी जनाधार गमावला हे सिद्ध होत असले तरी भाजपाने फार मोठा जनाधार मिळवला असेही म्हणता येत नाही. १३७ वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसची जी काही वाताहत होतेय ती पक्षाकडे प्रभावशाली नेतृत्व नसल्यामुळे होतेय. याउलट जगात प्रभावशाली नेतृत्व म्हणून चर्चेत आलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचा चेहरा बनलेले असताना भाजपाला देशात मात्र प्रादेशिक पक्ष दमछाक करायला लावत आहेत.

भारतीय जनता जनार्दनाची एक मोठी गम्मत आहे. अगदी स्थानिक पातळी पासून ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना प्रत्येक निवडणुकीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका निवडणुकात तो स्थानिक आघाड्यांना महत्व देतो. तर विधानसभा सारख्या निवडणुकात तो प्रादेशिक पक्षाला झुकते माप देतो. मात्र लोकसभेच्यावेळी मात्र राष्ट्रीय पक्षांकडे मतदारांचा अधिक कल असतो. भारतातील मतदारांची ही मानसिकता पाहिली तर राष्ट्रीय पक्षांना स्थानिक पातळीवरील राजकारणात पकड मिळवायची गरज वाटत नाही. तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांबरोबर लढत द्यावी लागते किंवा त्यांना सोबत घ्यावे लागते. देशात सध्या काँग्रेस आणि भाजपा हे दोनच प्रमुख राष्ट्रीय पक्ष गणले जातात. एक-दोन राज्यात आपले उमेदवार निवडून आणत राष्ट्रीय पक्ष म्हणून कागदोपत्री मान्यता मिळवणारे राजकीय पक्ष हे आघाड्यांच्या राजकारणात गुंतलेले असतात. या सर्व पार्श्वभूमीवर शहरी भागातील पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपाच्या देशातील २९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे प्रगतीपुस्तक तपासले तर केवळ १० राज्यांच्या विधानासभांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. सिक्कीम, मिझोराम आणि तामिळनाडूच्या विधानासभांमध्ये भाजपाला अजून भोपळा देखील फोडता आलेला नाही. आंध्रप्रदेश मध्ये १७५ पैकी ४ जागा, केरळमध्ये १४० पैकी १, पंजाबमध्ये ११७ पैकी ३ जागा, तेलंगणात ११९ पैकी ५, पश्चिम बंगाल मध्ये २९४ पैकी ७७ जागा, दिल्लीत ७० पैकी ८ जागा, ओरिसात १४७ पैकी १० जागा आणि नागालँड मध्ये ६० पैकी १२ जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपाचे युतीचे सरकार आहे तिथे म्हणजे मेघालयात ६० पैकी २, बिहारमध्ये २४३ पैकी ५३, जम्मू आणि काश्मीर मध्ये ८७ पैकी २५, गोव्यात ४० पैकी २० जागा भाजपाकडे आहेत. खूप बारकाईने बघितले तर देशातील एकूण ४१३९ विधानसभा जागांपैकी भाजपाकडे १५१६ जागा आहेत. त्यापैकी ९५० जागा ह्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या सहा राज्यातील आहेत. अगदी टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाले तर भाजपा ६६ टक्के जागांवर पराभूत झालेला आहे. म्हणजेच ३४ टक्के मार्क मिळवून गुणवत्ता यादीत पहिला आल्यासारखे झाले आहे. आता या आकडेवारीत एखादी चुकभुल असू शकते. पण मतितार्थ एकच आहे.

शेठजी-भटजींचा पक्ष, शहरी मतदारांचा पक्ष म्हणून कायम हिणवल्या गेलेल्या भाजपाने केंद्रात सत्ता ताब्यात घेण्याचा असा कोणता फॉर्म्युला तयार केला, याकडे आता बघितले पाहिजे. एक मतामुळे भाजपाचे अटलबिहारी वाजपेयींचे सरकार कोसळले होते. त्यावेळी अटलजींनी व्होट ऑफ कॉन्फिडन्सला सामोरे जाताना संसदेत जे भाषण केले होते, त्याचा भारतीय जनमाणसांवर जो काही परिणाम झाला होता त्याच्याच सहानुभूतीच्या लाटेवर प्रथमतः भाजपा स्वार झालेली होती. ही पार्श्वभूमी तयार झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या आयटी सेलने ज्यांना पुढे ‘थिंक टँक’ असे संबोधण्यात आले. तर या थिंक टँकने सोशल मीडियाचा ताबा घेतला. वर्षानुवर्षे निवडणुकीत पारंपारिक पद्धतीने मतदारांना हाताळणाऱ्या काँग्रेसी विरोधकांना (देशात विरोधक म्हणून एकजूट झालेले बहुतांश पक्ष हे काँग्रेसच्याच वळचणीचे आहेत) भाजपाच्या या ‘थिंक टँक’च्या एकसारख्या सुरू असलेल्या माऱ्यापुढे टिकाव धरता आला नाही. सोशल मीडियावर आपली डिजिटल टेक्नॉलॉजीयुक्त ‘वॉर रुम’ चालविणाऱ्या मोदींच्या थिंक टँकने विरोधकांना आजही हेल्पलेस केले आहे हेच दिसून येते. बुद्धिवंतांच्या फळीमध्ये देखील हीच गांगरलेली अवस्था आज दिसून येते. देशात गांधीवादी, समाजवादी, डाव्यांची पुरोगामीवादी आणि हिंदुत्ववादी या विचारसरणी मध्ये विभागल्या गेलेल्या बुद्धिवंतांमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे बुद्धिवंत हे हिंदुत्वाची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा हे ठसविण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. इतर विचारधारा आणि त्या अंगीकृत करणाऱ्या पक्षांच्या राजकीय विचारधारा ठसविणारा बुद्धिवंत वर्ग ‘पेडगाव’ला रहायला गेलाय. अर्थात विजनवासात गेलाय असंच म्हणावं लागतंय. सध्यातरी भाजपाची विचारधारा ही मोदींच्या थिंक टँकची आईडीयालॉजी आहे. जगभरात जी मोदींची प्रतिमा प्रभावशाली बनविण्यात या थिंक टँकला यश मिळाले आहे. तसे यश विरोधकांना प्रशांत भूषण सारखे व्यावसायिक रणनीती तज्ज्ञ आयात करून मिळणार नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होवून देखील मैदानात लंगडे घोडे दामटण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधी पक्षाच्या तोंडात माती जाताना दिसते आहे. आता तर मोदीनंतर भाजपाचा घोडदौडीचा वेग मंदावेल या भाकड विश्वासावर रेंगाळत बसणारे विरोधक निवडणुकी अगोदरच पराभवाच्या मानसिकतेमध्ये दिसतात. हे फारच शोचनीय आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

6

)

  1. Sunil Gurav

    फारच अभ्यासपूर्ण लेख मित्रा…👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      मित्रा प्रतिक्रिया पोहोचली ब्लॉगवर 🙏🙏🙏

      Liked by 1 person

  2. मुकुंद हिंगणे

    जास्तीत जास्त वाचकांनी ब्लॉगवर प्रतिक्रिया नोंदविणे आवश्यक…. त्यासाठीच सबस्क्राईब व फॉलो करा.🙏🙏🙏

    Liked by 1 person

  3. anjali jangale

    Contact mi plz..

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      ओके

      Liked by 1 person

    2. मुकुंद हिंगणे

      8806188375

      Liked by 1 person