
रिफाईंड डबल फिल्टर म्हणून यांत्रिक आणि रासायनिक प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलाचा स्वयंपाकात वापर करण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने घाण्यामधून काढलेले खाद्यतेल रोगप्रतिकारक असते. त्यातही लाकडी घाण्याला प्राधान्य देणाऱ्या अलीकडे सुचविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सल्ल्यामुळे शहरी भागातून पुन्हा एकदा लाकडी घाण्यातून चरक पद्धतीने काढलेल्या खाद्यतेलाला महत्व प्राप्त होवू लागले आहे. भारतात वापरासाठी लागणाऱ्या खाद्यतेलापैकी फक्त ३० टक्के उत्पादन भारतात होते. बाकी ७० टक्के उत्पादन हे आयात करावे लागते. रिफाईंड तेल उत्पादित करणाऱ्या विदेशी कंपन्या भारतीय बाजारपेठेत घुसल्या ते याच कारणाने. याशिवाय नगदी पिकांचे उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांच्या धोरणाने तेल बियांचे उत्पादन घेणारे हंगामी धोरण घसरले. आजही भारतात सूर्यफूल, तीळ, मोहरी, सरकी, सोयाबीन, करडीचे हंगामी पीक घेण्यापेक्षा द्राक्ष, ऊसाची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने खाद्यतेलाच्या बाजारात रिफाईंड तेल उत्पादित करणाऱ्या कंपन्यांना आयती बाजारपेठ मिळाली. उच्च तापमानावर रासायनिक प्रक्रिया केलेले रिफाईंड तेल खावून आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा ‘ओल्ड इज गोल्ड’ म्हणत आता घाण्यातून काढलेले तेलच स्वयंपाकात वापरण्याचा सल्ला फॅमिली डॉक्टर देवू लागल्याने शहरी भागातून सिंगल फेज इलेक्ट्रिक मोटर वर चालणारे ‘लाकडी घाणे’ पुन्हा दिसू लागले आहेत.

लाकडी घाण्यावर खाद्यतेल गाळप करण्याची पद्धत भारतात खूप जुनी आहे. असं म्हणतात की साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी चीन आणि जपानमध्ये खाद्यतेलाचा शोध लागला. त्यापूर्वी कदाचित अप्रगत माणूस कच्चं अन्न किंवा भाजलेले अन्न खात असावा. चवदार अन्नपदार्थ खाण्याचे जेंव्हा माणसाला कळले असेल कदाचित खाद्यतेलाचा खरा जन्मदिवस तोच असावा. थोडक्यात भारतातील अन्नपदार्थात खाद्यतेलाचा शिरकाव हा देखील त्याच काळातील असावा असं मानायला हरकत नसावी. जुन्याकाळात बैलाच्या साहाय्याने चालविला जाणारा लाकडी घाणा प्रचलित होता. त्यानंतर यंत्रयुगात यांत्रिक उपकरणांचा वापर सुरू झाला. बलुतेदारी पद्धत रूढ असलेल्या भारतीय समाजात व्यवसाय देखील जातीव्यवस्थेवर आधारित असल्याने तेल उत्पादन व विक्री करणारा समाज हा ‘तेली’ समाज म्हणून ओळखला जावू लागला. गावगाड्याप्रमाणे गावातील गरजा भागविणारी यंत्रणा म्हणजेच बाजारपेठ समजल्या जात होती. त्यानुसार प्रत्येक गावात लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यवसायात गुंतलेले व्यावसायिक असेच चित्र होते. आपल्याच गावातील लोकांना उत्पादने विकायची या व्यवहारात उत्पादनांच्या गुणवत्तेपेक्षाही उत्पादन निर्मिती व विक्री करणाऱ्या बद्दलचा विश्वास बघितला जायचा. गुणात्मक आणि संख्यात्मक वाढीचा व्यवहार प्रचलित झाल्यानंतर ‘घाण्यातील तेल’ या संकल्पनेला तडा गेला.

जुळे सोलापुरात नव्याने लाकडी घाण्यावर तेल उत्पादन आणि विक्री करणारे समर्थ ऑईलचे अनंत यशवंत कुलकर्णी हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी हा व्यवसाय निवडला आहे. अनंत कुलकर्णी यांच्या मते लाकडी घाणा म्हणजे ज्या घाण्यामध्ये तेल काढताना फक्त लाकडाचा वापर होतो. ज्यामुळे तेल निघण्याची क्रिया ही अतिशय कमी तापमानात होते, त्यामुळे याला कोल्ड प्रेस ऑईल असे सुद्धा म्हणतात. आधुनिक यंत्रावर तयार करण्यात येणाऱ्या तेलासाठी उच्च तापमानाची स्टीम वापरली जाते ज्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होतात. त्यात अनेक रसायने जसे फॉस्पेरिक ऍसिड, कॉस्टिक सोडा, हायड्रोजन वापरले जाते. ज्यामुळे तेल अधिक चमकदार, पारदर्शक आणि पातळ होते. एकप्रकारे तेलाचे ब्लिचिंग केले जाते. परंतु हीच रसायने आपल्या शरीराला हानिकारक ठरतात. लाकडी घाण्यावर तेल काढताना अगदी नगण्य अशी उष्णता निर्माण होते. त्यामुळे तेलातील नैसर्गिक तत्वे जपली जातात. जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि पोषक घटकांनी युक्त असे तेल मिळते. फक्त रिफाईंड तेलापेक्षा लाकडी घाण्यातील तेलाचा दर जास्त आहे. साधारणतः तीन किलो शेंगदाण्याचे एक किलो तेल मिळते. त्यामुळे हे तेल सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तीनशे रुपये किलो दराने मिळते. त्यामुळे रोजच्या खाण्यात या तेलाचा वापर करणारा एक विशिष्ट वर्ग तयार झालाय. म्हणूनच शहरीभागात श्रीमंत वर्गात लाकडी घाण्याचे तेल हा नवा ट्रेण्ड सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तेल गाळल्यानंतर तेलबीयांचा जो चोथा तयार होतो, ज्याला पेंड म्हणतात. ही पेंड पशुआहार म्हणून उपयोगात येत असल्याने लाकडी घाणा चालविणाऱ्या चालकाला पेंड विकून जो पैसा मिळतो तोच त्याचा या व्यवसायातील नफा समजल्या जातो.
ग्रामीण भागात अजूनही लाकडी घाण्याचा व्यवसाय तग धरुन आहे तो केवळ पशुखाद्य म्हणून पेंड विक्री होत असल्याने मात्र शहरातील तेल घाण्यातील पेंड शहरात पशुधन नसल्याने कमी भागात शहरा नजीकच्या खेडेगावातून कमी दराने विकावी लागते. तरीही शहरात केवळ ट्रेण्ड आणि बदलती जीवनशैली म्हणून लाकडी घाणे मोठ्या संख्येने सुरू झालेले दिसत आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा