
पर्यटन स्थळे, निसर्गस्थळे आणि तिर्थस्थळांवर माणसां इतकीच गर्दी दिसते ती माकडांची. टोळ्या करून राहणाऱ्या माकडांमध्ये देखील माणसांप्रमाणे कुरबुरीचे रूपांतर टोळीयुद्धात (Gang War) मध्ये होत असते. बहुतेकवेळा माकडीणी मुळेच माकडांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी होत असते. इथेही माणसांप्रमाणेच त्यांच्यातील हाडवैराची सुरुवात समान दिसते. माकडे देखील आपल्या टोळीची हद्द ठरवतात. त्यांच्या टोळीत दुसऱ्या टोळीतील माकडाचा शिरकाव सहन केला जात नाही. किंवा ते देखील दुसऱ्या टोळीत शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. टोळीतील माकडीणीच्या सुरक्षेसाठी टोळीप्रमुख आणि टोळीतील इतर नर सदस्य सतत अवती-भवती सोबत रहात असतात. तर हे माकड पुराण सांगण्याचे कारण म्हणजे एक असेही गाव आहे जिथे पुरुषांच्या संख्ये एव्हढी माकडांची संख्या आहे. जिकडे-तिकडे माकडांचा मुक्त संचार असणाऱ्या या गावातील माकडांच्या टोळ्या देखील आहेत. आपआपल्या हद्दीतील हक्कावरून या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी देखील पडत असते. त्यांच्या संघर्षाची झळ कधी-कधी माणसांना देखील बसते. मात्र या गावातील गावकरी काळभैरवाचे सेवक समजून उच्छाद मांडणाऱ्या या माकडांना हुसकावून लावण्याचा कधी प्रयत्न देखील करत नाहीत.

काळभैरव-जोगेश्वरी मंदिर देवस्थानचे ट्रस्टी आणि ज्येष्ठ पुजारी चंद्रकांत रंगनाथ पुजारी हे वयाच्या ८७ व्या वर्षी देखील मंदिर कार्यात दिसतात. पुराण काळातील दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात असलेल्या सुवर्णपुरी अर्थात सोनारी या गावी काळभैरव-जोगेश्वरीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराचा हजाराहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. दंडकारण्यात तपश्चर्या करणाऱ्या तपस्वी-मुनिवर्यांना राक्षसांकडून त्रास होत होता. त्या राक्षसांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने काळभैरवाचा अवतार घेतला अशी आख्यायिका आहे. तर या काळभैरवाचे सेवक असलेले वानर म्हणजेच माकडं या सुवर्णपुरी अर्थात सोनारीमध्ये वास्तव्यास असतात. त्यालाही पुराणाचा आधार सांगितला जातो. सोनारी हे गाव बार्शी (जि-सोलापूर) पासून अवघ्या ४०-४५ किमी अंतरावर तर सोलापूरपासून ११५ किमी अंतरावर आहे. या पौराणिक संदर्भ असलेल्या गावाची लोकसंख्या साडेतीन हजाराच्या आसपास आहे. तर माकडांची संख्या दीड हजारावर आहे. म्हणजेच गावातील पुरुषांच्या संख्येइतकी माकडांची संख्या आहे. सोनारीला तिर्थक्षेत्राचा दर्जा असल्याने काळभैरव-जोगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेशातून भाविकांची गर्दी असते. श्रध्देपोटी भाविकांमध्ये या माकडांबाबत आकर्षण असल्याने मंदिर परिसर हा या माकडांचा उदर निर्वाहाचा केंद्रबिंदू आहे. प्रसाद म्हणून ठेवण्यात येणारी फळे, अन्नदानातील शिजलेले अन्न यावर या माकडांची गुजराण होत असते. मात्र हेच त्यांच्या टोळ्यातील ‘गँग वार’ भडकण्याचे देखील प्रमुख कारण आहे. गावात वावरणाऱ्या माकडांच्या टोळ्या आणि मंदिर परिसरात ठाण मांडून बसलेल्या माकडांची टोळी यामध्ये हा संघर्ष वारंवार पहायला मिळतो. बहुदा यांच्यात ‘रोटी-बेटी’ व्यवहार देखील होत नसावा. मंदिर परिसरातील मादी माकडाकडे गावात वावरणाऱ्या माकडाने नुसती नजर उचलून जरी पाहिले तरी दोन्ही टोळ्यांमध्ये ‘भडका’ उडतो असा ग्रामस्थांचा अनुभव आहे.

या माकडांच्या टोळ्यांचा गावकऱ्यांना किंवा भाविकांना भलेही उपद्रव होत असला तरी देखील श्रध्देला पात्र ठरलेल्या या माकडांसाठी आरोग्य-सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष धनंजयदादा सावंत यांनी विजेच्या पोलवरील उघड्या प्रवाही तारेला स्पर्श झाल्याने माकडांच्या होणाऱ्या मृत्यूकडे लक्ष वेधून माकडांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी कोटेड केबल टाकण्याच्या एक कोटी सतरा लाख रुपये खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. कोरोना काळ आणि सध्या जिल्हा परिषदेवर असलेल्या प्रशासकीय राजवटीमुळे हा विषय प्रलंबित असला तरी लवकरच या कामाला सुरुवात होईल. प्राणीमात्रांच्या सुरक्षेसाठी तरतूद करणारी उस्मानाबाद जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील बहुदा पहिली जिल्हा परिषद ठरेल.

सोनारी क्षेत्राचे आणखीन एक लक्षवेधून घेणारे वैशिष्ट्य म्हणजे गावातील ३०-४० तरुण मुलांनी गेल्या दहा वर्षांपासून भाविकांसाठी नेटाने सुरू केलेले अन्नछत्र. आता या अन्नछत्रामुळे भाविकांची महाप्रसादाची सोय झाली आहे. दानशूर व्यक्ती आणि भाविकांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या अन्नछत्र मंडळाच्या कार्याची व्याप्ती वाढत असून आता भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंडळाने स्वतःच्या मालकीची जमीन खरेदी केली असून तिथे सर्वसुविधायुक्त सभागृह लवकरच बांधण्यात येईल. या तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि सावंत परिवार खंबीरपणे उभा असल्याने अन्नछत्र मंडळाच्या कार्याने आता वेग घेतला आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा