ऐतिहासिक ओळख असलेल्या परांड्याचे टोमॅटो आम्लेट अन गुलाबजामुन

पुराणकाळात ‘परमधामनगर’, ‘प्रचंडपूर’ असा उल्लेख असलेले ‘परांडा’ हे गाव जवळपास दीडहजार वर्षांचा इतिहास मिरवणारे इतिहासकालीन गाव भुईकोट किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहामनी राजवटीत मुहंमद गवान या सरदाराने हा ३६ बुरुज असलेला प्रचंड असा भुईकोट किल्ला बांधला. कल्याणीच्या चालुक्यापासून दक्षिण भारतात स्थिरावलेल्या अनेक राजवटी अहमदनगरची निजामशाही, मुघल, काही वर्षे शहाजीराजे भोसले यांच्यामुळे विजापूरच्या आदिलशाहीत आणि सरतेशेवटी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत करमाळा येथील राजे रावरंभा निंबाळकर यांच्यामुळे हैद्राबादच्या निजामशाहीत समाविष्ट असणाऱ्या या भुईकोट किल्ल्याचा प्रामुख्याने सैन्य प्रशिक्षण, लष्करी रसद आणि महसुली केंद्र म्हणून वापर केल्याचे आढळते. राजवट कोणतीही असो परांड्याच्या किल्ल्याला महत्वाचे केंद्र समजल्या जात होते. हैदराबादच्या निजाम राजवटीत शेवटच्या टप्प्यात रझाकारांचे केंद्र बनलेला हा भुईकोट किल्ला स्वातंत्र्यानंतर मात्र दुर्लक्षित झाला. अलीकडे पंचवीस-तीस वर्षांपासून मात्र पडझड झालेला हा भुईकोट किल्ला मात्र इतिहास संशोधक आणि पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनला आहे. किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर इथल्या बाजारपेठेचे अर्थकारण सुरू झाले.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या जिलानी महमूदखां पठाण यांच्या मिलन हॉटेल अँड स्वीटमार्ट मधील टोमॅटो ऑम्लेट, गुलाबजामुन आणि कटवडा पर्यटकांना खुणावत असतो.

प्रत्येक गावाची, शहराची स्वतःची अशी खासियत किंवा स्वतंत्र ओळख असते. परंपरा,संस्कृती आणि ओळख प्रत्येक दशकात, शतकात आपल्या नावीन्यरूपात रूढ होत असते. त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृतीची देखील ओळख ठसवीत असते. उस्मानाबादचे ‘काला जामुन’, सोलापूरची ‘कडक भाकरी आणि शेंगाची चटणी’ ही जशी प्रसिद्ध आहे, अगदी तितकेच परांड्याचे ‘टोमॅटो ऑम्लेट आणि गुलाबजामुन’ प्रसिद्ध झाले आहे. भुईकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस जिलानी महमूदखां पठाण यांचे मिलन हॉटेल गेल्या तीस-बत्तीस वर्षांपासून खवैय्यांच्या खिदमतीमध्ये दाखल आहे. जिलानी पठाण यांचा पिढीजात हॉटेल व्यवसाय. वडील चहा कॅन्टीन चालवायचे. शंभरटक्के ग्रामिणबाज असलेल्या जिलानी पठाण यांच्या मिलन हॉटेलमध्ये देशी-विदेशी पर्यटक येत असले तरी या हॉटेलला अजिबात पंचतारांकित रुपडं त्यांनी दिलेलं नाही. मात्र पदार्थांची ‘लज्जत’ पंचतारांकित अनुभव देणारी असल्याने खवैय्यांना किल्ला पायी फिरून पाहण्याची तरतरी देणारी अशीच आहे. स्टीलच्या ताटात पसरलेले टोमॅटो ऑम्लेट सोबत गोडसर चवीच्या दह्याची वाटी अन तोंडाची चव बदलणाऱ्या दोन मोठे गुलाबजामुन असलेली डिश….दुपारच्या जेवणाची देखील आठवण होणार नाही असा ‘टंकी फुल्ल’ नाश्ता हे मिलन हॉटेलचे खास वैशिष्ट्य. रेसिपीबाबत विचारलं तर जिलानीभाई हसत-हसत खाण्याचा आग्रह धरतात. इतिहासकालीन ऐश्वर्य संपलेल्या शहरांना, गावांना अर्थकारणासाठीआता आपली नवी ओळख निर्माण करणे खूप गरजेचे आहे हे जिलानी पठाण सारखा ग्रामीण भागातील व्यावसायिक देखील ओळखून आहे. ऐतिहासिक श्रीमंती जावून दुष्काळाशी सामना करीत आपले अस्तित्व टिकवणाऱ्या परांड्याच्या बाजारपेठेत ग्रामीण ग्राहकांची आवड जोपासणारी मोठी कापडदुकाने देखील आहेत. त्यात आता ग्रामीण झणझणीत चवीची लज्जत वाढविणारी खाद्यसंस्कृती हीच आता अलीकडच्या काळात परांड्याची ओळख बनली आहे.

परांड्याचा भुईकोट किल्ला बघायला आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांना ग्रामीण आदरातिथ्यात पदार्थ खिलविणारे ‘मिलन हॉटेल’चे मालक जिलानी महमूदखां पठाण.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

4

)

  1. Rupali

    Waah!

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद रुपाली 🙏🙏🙏

      Liked by 1 person

  2. KK

    खुप छान 👌👌

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      आवडलं का आर्टिकल केकेजी…🙏🙏🙏

      Liked by 1 person