
तुम्ही प्रवासाला निघताना कितीही तयारी करा, घरून चार घास पोटात ढकलून निघा. पण प्रवासात भूक ही लागतेच. बाय रोड प्रवास करणार असाल तर ठराविक ठिकाणी तुमच्या खान-पानासाठी थांबता येतं. रेल्वेने प्रवास करणार असाल तर मात्र चंगळच . अगदी तासाभराचा प्रवास करणार असाल तरी थेट आपल्याला खेटून उभे रहात ‘इडली-वडा, सँडविच, भेळ’ असं किरट्या आवाजात ओरडणारा फेरीवाला पहिल्यांदा आपलं नुसतंच लक्ष वेधून घेतो. आपणही घरूनच खावून निघालेलो असतो. बाहेरचं काही खायचं नाही, असा मनाशी हिय्या करून सुद्धा आपली भीष्मप्रतिज्ञा मोडण्यासाठीच बहुदा रेल्वे विभागाने या फेरीवाल्यांना खाद्यपदार्थ विक्रीची परवानगी दिली असावी. भारतात कोणत्याही राज्यात प्रवासाला जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर रेल्वेच्या डब्यात कर्कश्य किरट्या आवाजात पदार्थांचे अपभ्रंशीत उच्चार तोंड वेडेवाकडे करीत उच्चारणारे हे फेरीवाले ‘एकाच चेहऱ्याचे आणि एकाच वेशभूषेचे’ वाटतात. रेल्वेत खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या या फेरीवाल्यांचे बहुदा एखादे ‘विद्यापीठ’ असावे. तिथूनच ते प्रशिक्षित होवून आले असावेत. त्यांची कळकट, मेणचट वेशभूषा आणि चर्या बघून देखील आपल्याला भूक लागते अन तो देईल तो पदार्थ आपण मिटक्या मारत का फस्त करतो..? या प्रश्नाचं उत्तर निदान मला तरी अद्याप मिळालेले नाही.

प्रवासाबद्दलच्या आपल्या उत्कंठेशी त्याला काहीही ‘देणे-घेणे’ नसते. एकतर तो आपल्या चेहऱ्यावरची ‘भूक’ किंवा आपला ‘हावरटपणा’ तो शोधत असतो. त्यात त्याची पीएचडी झालेली असते. तो बरोबर आपल्याला खेटून उभं रहातच तो आपल्याला गटवत असतो. धबधब्या खाली टीचभर कपड्यात कुणी आपल्याला पहात नाही अश्या अविर्भावातील नायिका जशी आपल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असते आणि आपण निर्मात्यांचा ‘बकरा’ असतो अगदी तसाच व्यवहार रेल्वेत देखील हे फेरीवाले घडवून आणतात. असं माझं ठाम मत झालेलं आहे. अर्धनग्न अवस्थेत आपल्या खमंग सुवासाने मन मोहित करणारे ते टोपलीतील उघडे-नागडे पदार्थ आपल्या ‘प्युअर हायजेनिक’ बुद्धीला पूर्णपणे बाधित करतात. मग हाऊसफुल्ल गर्दी खेचणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्या सारखं तो फेरीवाला फिलॉसॉफीकल आवाजात ‘जितम जितम’ म्हणून केकाटणारा दुर्योधन आपल्याला वाटायला लागतो. पण तो पर्यंत आपल्या इंद्रियांनी त्याच्या त्या उघड्या-नागड्या पदार्थांपुढे चक्क नांगी टाकलेली असते. मग तो फेरीवाला ब्लॅकने तिकीट विकल्या सारख्या भावात तो पदार्थ आपल्या नरड्यात कोंबायला सरसावलेला असतो. एकूणच खाण्याचा मोह न आवरता येणारा प्रवास सगळ्यांनाच मनापासून आवडत असतो. काही प्रवासातील ठिकाणे ही अश्या विशिष्ठ गुणधर्मामुळे प्रवाशांच्या आकर्षणाची ठिकाणे बनली आहेत. तर देशाची प्रमुख धमनी म्हणून उल्लेखल्या जाणारी भारतीय रेल्वे आणि त्यातील खाद्यपदार्थांची विक्री करणारे फेरीवाले हे जगाच्या पाठीवर एकमेवाद्वितीय असेच उदाहरण म्हणायला हवे. बोलत काय बसलोय आपण….पुढचं स्टेशन यायला लागलंय, आता फेरीवाल्यांचा एकच गलका वाढेल. मग काय खावू आणि काय नको असे होवून जाईल. तूर्त इथेच आवरतं घेतो…..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
:- 8806188375
Leave a reply to kekaderajesh उत्तर रद्द करा.