


एक तर वेधशाळेने सांगितल्या प्रमाणे वेळेवर पाऊस पडला असं कधीतरीच घडतं. नेमकं हे आर्टिकल लिहिताना आज मी हा सुखद अनुभव घेतोय. भारतीय वेधशाळेच्या या अद्ययावत बदलामुळे आपण खरंच अचूक झालो आहोत की काय ! असा उगीचच फील यायला लागलाय. एकतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून असनी चक्रीवादळाच्या संदर्भात येणाऱ्या बातम्या न्यूजऍप वर एकसारखा वाचतोय. आता एकतर ही चक्रीवादळे समुद्रात येतात. त्याचा आपल्याशी काय संबंध. माझ्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रात घाटावर राहणाऱ्या माणसाला ‘तलाव’ बघितला तरी अप्रूप वाटतं. माझ्यापासून अरबी समुद्र किमान पाचशे किलोमीटर अंतरावर तर बंगालचा उपसागर सातशे-आठशे किलोमीटर अंतरावर असेल. आता इतक्या दूरवर या चक्रीवादळाचे काय पडसाद उमटणार…? पण अलीकडे जगात घडणाऱ्या कुठल्याही घटनांशी आपला संबंध जोडण्याची सवय लागल्याने मोठ्या उत्सुकतेने यावेळी मी असनी चक्रीवादळाच्या पडसादाची वाट पहात बसलो होतो. नाही म्हणायला गेले दोन दिवस आकाशात ढग दाटून आल्याने उन्हाची दाहकता कमी झाली होती. फार मोठा जोराचा नसला तरी हलका पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने या ‘असनी’ चक्रीवादळाबद्दल जरा कौतुकच वाटू लागले होते.

आमचा सोलापूर जिल्हा तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात समाविष्ट झालेला भूभाग. अर्थात कोणत्याच बाबतीत पश्चिम महाराष्ट्राची विपुलता, नैसर्गिक संपन्नता, सुधारणा, विकास याचा लवलेश नसलेला हा जिल्हा. फक्त भौगोलिक आखणीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात समाविष्ट झालेला. एखाद्या शापित यक्षाचे राज्य असल्याप्रमाणे. इथं दोनच ऋतू. एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा कडक उन्हाळा…जेंव्हा निसर्गालाच कडक उष्मा सहन होत नाही, त्रासलेल्या अवस्थेत त्याच्या अश्रूंचा बांध फुटतो, तेंव्हा ज्या धारा बरसतात त्याला आम्ही पावसाळा म्हणतो. कधी कोकणात वातावरणात कमी दाबाचा पट्टा तयार झाला किंवा आंध्रप्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार झाला की हवामान खाते सांगते, पावसाळी वातावरण आहे, केंव्हाही पावसाच्या हलक्या सरी पडतील. हवामान खात्याच्या या अंदाजाला नेहमीच हुलकावणी देत ढग पुढच्या प्रदेशात निघून जातात. हा आमचा नेहमीचा अनुभव आहे. म्हणून तर ‘असनी’ चक्रीवादळाने आपला मार्ग बदलला आणि आंध्रप्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याची सूचना वेधशाळेने दिल्यावर आम्ही सोलापूरकरांनी फारसं मनावर घेतले नाही. पण ११-१२ मे या दोन दिवसात आकाशात ढगांनी पूर्ण सोलापूर जिल्ह्याला घेरलं की राव ! काही ठिकाणी ‘घाईची लागल्या सारखा’ संयम देखील सुटला ढगांचा. तिकडे आंध्रप्रदेशात ‘असनी’मुळे म्हणे श्रीकाकुलम येथे समुद्रकिनारी ‘सोन्याचा रथ’ सापडला. आता तो रथ कोणत्या देशातून आला ? त्यांना परत द्यायचा की आपल्या सरकारने ठेवून घ्यायला पाहिजे यावर सगळ्या पावसाळ्यात चर्चा झडतील. सोशल मीडियाच्या मुक्त विद्यापीठात यावर संशोधन होईल. पण त्यांचा फायदाच झाला की राव..!

पावसाळ्यात नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा हा ‘डिझास्टर मॅनेजमेंट’च्या अखत्यारीत असलेला विषय सोलापूरसाठी नक्कीच नाही यावर आता समस्त सोलापूरकरांचे देखील एकमत झालेले आहे. कारण सोलापुरात ‘पावसाळा’ हा हंगाम नसतोच मुळी. चुकून जरी टारगट मुलांसारखं वर्गाच्या भिंतींवर लघुशंकेचे चार शिंतोडे उडवावे असा ढगांनी आगाऊपणा केला तरी दुसऱ्या दिवशी आम्ही रस्त्यावर साचलेल्या पाण्यात ‘धुळवड’ साजरी करतो. पण आमच्या नगर प्रशासनाला नावं ठेवलेली आम्हाला जे आवडत नाही. जे आमच्या नियोजनात नाही त्याबद्दल निसर्गाने देखील आगाऊपणा केलेला आम्हाला चालत नाही. स्मार्ट सिटी म्हणून काही नियोजन असतं की नाही..? आता हे निसर्गाला सुद्धा कळायला हवं. बाकी ‘बशी’ सारख्या उथळ आणि पसरट असलेल्या सोलापूरला देखील समुद्र असायला पाहिजे होता….तेव्हढंच चक्रीवादळाच्या निमित्ताने का होईना ‘सोन्याचा रथ’ मिळाला असता….अन आम्ही काय तो परत दिला नसता बरं का…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to anjali jangale उत्तर रद्द करा.