
अगदीच खूप वर्षांनी नाही पण या कोरोना महामारीच्या प्रतिबंधामुळे तब्बल दोन वर्षांनी कल्याण-ठाण्याकडे जाण्याचा योग आला. रेल्वेने जा किंवा बाय रोड जा..घाटावरून उतरायचं म्हणजे लोणावळा-खंडाळा लागणारचं. अलीकडे कामानिमित्त देखील मुंबईकडे जायचं आकर्षण राहिलंय ते येता-जाता धावता का होईना लोणावळा-खंडाळ्याचा ‘थंडावा’ अंगावर घेता येतो. खिडकीत बसून डोंगर, कडे-कपाऱ्या न्याहाळता येतात. एरवी घाटी लोकांना पनवेल पर्यंतचीच हवा मानवते. जरा पुढे गेलं की, दमट वातावरणात खारवटलेल्या घामाने अंग अगदी चिपाडून जातं. माणसांची गर्दी कर्णकर्कश हॉर्न वाजवत रस्ता गच्च भरून निघालेली वाहने, महानगराच्या अंगाखांद्यावरून वळवळणाऱ्या माणसांनी गच्च भरलेल्या ट्रेन, लोकल…..शांत, सुस्त अन स्वस्थ आयुष्य जगणाऱ्या कुणालाही नकोसे वाटेल असेच मुंबईचे जगणे आहे. मुंबई कुणालाही आपल्या पोटात सामावून घेते, त्याला पोसते, नावलौकिक मिळवून देते, त्यामुळे रोज माणसांचे लोंढे मुंबईकडे धाव घेतात. अगदी अव्याहतपणे हे सुरूच आहे. या लोंढ्यांनी मुंबईचं, समुद्रकिनारपट्टीचं, खाड्यांचं सौंदर्य पार नाहीसं करून टाकलंय. कधीतरी याचा विस्फोट हा होणारच आहे. रोज मोडकळीला येणारे हे आयुष्य जगणाऱ्या मुंबईकरांना हा प्रश्न भेडसावत नसेल का ? तर मूळ विषय हा की, रोज मुंबईकडे धाव घेणाऱ्या माणसांच्या लोंढ्यांनी मुंबईचं सौंदर्य तर नष्ट केलंच आहे. त्याबरोबरच आजूबाजूच्या निसर्गाने नटलेल्या सौंदर्यस्थळांना देखील विद्रुप करण्याचा घाट घातला आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर निसर्ग, वनराईने नटलेल्या या लोणावळा-खंडाळ्याला थंड हवेचे ठिकाण म्हणून जगद्विख्यात केले ते ब्रिटिशांनीच यात दुमत नाही. मात्र त्याकाळचे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी १८७१ मध्ये लोणावळा-खंडाळा शोधले हे म्हणणे थोडे तर्कविसंगत वाटते. कारण मुंबई-पुणे रेल्वे सुरू झाली ते १८५७-५८च्या दरम्यान. त्याच्याही अगोदर घाटमाथ्यावरून उतरून मुंबईकडे जाण्याचा रस्ता एका मेंढपाळाने ब्रिटिशांना दाखविला होता अशी पण लोकवदंता आहे. असो, वनराईच्या कुशीत वसलेल्या या लोणावळा-खंडाळ्याला विश्रांतीचे ठिकाण समजणाऱ्या ब्रिटिशांमुळेच ते पर्यटनस्थळ झाले हे मात्र नक्की. हा झाला इतिहास… पण आज आपण काय पाहतोय ? थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटन स्थळ झालेल्या लोणावळा-खंडाळ्याचे अतिक्रमित होणाऱ्या आधुनिकीकरणाने पार अस्तित्वच धोक्यात येत आहे. डोंगर पोखरून दळणवळण सुलभ करणाऱ्या ब्रिटिशांनी गुलामांच्या देशात निसर्ग आणि विकास बघितला. पण आपण काय करतोय ? पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून सुख-सोयी उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित करत इमारती उभारून जंगलतोड करतोय. हे असंच सुरू राहिलं तर काही दिवसात सिमेंटचं जंगल झालेल्या सह्याद्रीच्या या डोंगररांगात निसर्ग लुप्त होऊन उघडे-बोडके, विद्रुप आणि भेसूर असे सह्याद्रीचे डोंगर भीतीदायक वाटू लागतील. निसर्गाला दफन केलेले पिरॅमिडच जणू….

सह्याद्रीच्या कुशीत फक्त निसर्गच दडलेला नाहीय. तर या प्रदेशाचा हजारो वर्षांचा इतिहास विराजमान आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्य उभारले. त्याची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर आहेत. पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली भूमाफिया त्या भग्न अवशेषांवर देखील टपून बसलेले आहेतच. निसर्ग आणि इतिहासाचे जतन आणि संवर्धन करायचे असेल तर शासनाला या भागात जमीन अधिग्रहणाचा विशेष कायदा करावा लागेल. या भागातील जमिनी सुरक्षित राहिल्या तरच निसर्ग आणि इतिहास सुरक्षित राहणार आहे. अन्यथा हे भूमाफिया सह्याद्रीला फोडून त्याचे केंव्हा माळरान बनवतील हे सांगता येणार नाही.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.