
गेल्या सात दिवसांपासून देशातील सर्वात प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सत्ताकारणाच्या पटावर एव्हढे अनिश्चीततेचे वातावरण आणि संशयाचे वांझोटे ढग जमा झाले आहेत. एकूणच सत्तेतील महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीने आता सत्ताच उलथवून टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडियामधून दिवसरात्र यावरच चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता घडून गेलेल्या घटनांवर तपशीलवार बोलण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. आघाडीतील उर्वरित दोन पक्ष, एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरा भारतीय काँग्रेस या दोन्ही पक्षांबरोबर असलेली आघाडी तोडावी आणि ज्यांच्या सोबतीने निवडणूक लढविली आणि मते मिळविली अश्या भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युती करीत सत्तेवर स्थानापन्न व्हावे या आग्रही भूमिकेपोटी शिवसेनेतीलच एक गट आपल्याच पक्ष प्रमुखाला अडचणीत आणत सत्तेचे नवे समीकरण मांडायला निघाला आहे. आता न्यायालयीन लढाईवर उतरलेल्या या बंडाळीतून नेमके काय निष्पन्न होईल ? हे पुढे दिसून येईल. मात्र या सत्तांतरच्या खेळामुळे सुदृढ समजल्या जाणाऱ्या लोकशाहीचे आणि घटनात्मक तरतुदींचे लक्तरे वेशीला टांगल्याचेच घृणास्पद चित्र सध्या दिसत आहे. एकूणच सत्तेसाठी शिवसेना आणि बंड करणारा शिवसेनेचाच एक गट यांच्यातील चिखलफेक आणि दुय्यम दर्जाच्या असांस्कृतीक, असभ्यतेचे दर्शन रोज मतदारांना घडत आहे. नेमके याच काळात मौसमी पावसाने नेहमीप्रमाणे हुलकावणी दिली आहे. नुसतेच आकाशात ढग जमा होतात, आता धुमशान पाऊस पडेल म्हंटलं तर उगी ‘मुतरा’ पाऊस पडून जातोय. ना धड अंग भिजतंय, ना जमीन भिजतेय. एकीकडे पेरण्या खोळंबलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय तर दुसरीकडे सत्तांतराचे नाट्य अडखळलेले आहे त्यामुळे सत्तासूर हवालदिल झालेले आहेत.
नुसतंच आभाळ गच्च भरून येतंय. यंदा तर अवकाळी पाऊस पण जोरदार झाला नाही. वेधशाळेने सरासरी इतका पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला असला तरी हवामान खात्याच्या अंदाजावर भारतात शेती केली जात नाही. प्रत्यक्ष पाऊस पडला, जमीन भिजली तरच शेतकरी पेरणीचे धाडस करू शकेल. एरव्हीचे ठीक पण गेल्या दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या संकटाने पेकाट मोडलेला शेतकरी दुबार पेरणीची ‘रिस्क’ घ्यायला तयार नाही. बाजारात खत, बी-बियाणे याचा साठा मुबलक आणि योग्य दरात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. नेमकं याच काळात सरकार आपल्या बुडाखालची खुर्ची निसटेल म्हणून धडपडू लागले आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची ‘आषाढी वारी’ जवळ आली आहे. गेल्या दोन वर्षात वारी करता आली नाही म्हणून लाखो भाविक वारीच्या तयारीला लागले आहेत. सरकार मात्र सत्तेच्या वारीसाठी तयारी करतानाचे चित्र दिसत आहे. कोणाचं काय चुकतंय ? पावसाची गरज असताना नुसताच गडगडाट आणि ढगाळ वातावरणामुळे निव्वळ वाम्बाळलेले आकाश दिसतंय…चुकतंय कुणाचं ? निसर्गाचं की भरवश्यावर बसलेल्या शेतकऱ्याचं ? तर सत्ता टिकविण्यासाठी तोंडाळपणा करून टोमणे मारण्यात आपले गाभूळलेपण दाखविणाऱ्या राज्य सरकारचं की बंडाळी माजविणाऱ्या स्वकीयांचं ? चुकतंय कुणाचं ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा