‘अफिलियन फेनोमेनन’ची सोशल मिडियावरची थंडी !

अफेलीयन फेनोमेनन (Aphelion Phenomenan) ही सौर मंडल मधील एक स्थिती आहे. अगदी समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचे तर पृथ्वी आणि सुर्यामधील अंतर वाढले तर ‘अफेलीयन फेनोमेनन’ ही स्थिती तयार होते. तर पृथ्वी आणि सुर्यातील अंतर कमी झाले तर ‘पेरिहेलिऑन’ (Perihelion) स्थिती तयार होते. वर्षातून एकदा अश्या स्थिती निर्माण होत असतात. या दोन्हीही स्थितीमध्ये सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराचा फरक तापमानावर काही अंशी फरक करणारा असू शकतो. या शक्यतेला धरूनच ‘अफेलिऑन फेनोमेनन’ या स्थितीमुळे पृथ्वी ही सूर्यापासून सुमारे १५२ दशलक्ष किलोमीटर दूर असल्याने पृथ्वीच्या तापमानात बदल होईल. या कॉस्मोलॉजिकल इव्हेंटमुळे दि. ४ जुलै ते दि. २२ ऑगस्ट २०२२ या काळात पृथ्वीवर थंड हवामान राहील. पृथ्वीवरील तापमान कमी झाल्यामुळे लोक आजारी पडतील. ‘ अफेलिऑन फेनोमेनन’मुळे फ्लू, खोकला, दम लागणे, श्वास घेण्यास अडचण होणे आदी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढेल, अशी भीती व्यक्त करणारी व्हायरल पोस्ट फेसबुक,व्हॉट्सअप, ट्विटरच्या माध्यमातून सध्या जगभर धुमाकूळ घालत आहे. कोविड-19 च्या महामारीमुळे दडपणाखाली आलेल्या जगाला आता ‘या’ व्हायरल पोस्टने काळजीत टाकले आहे. या स्थितीबद्दल नेमकी शास्त्रीय माहिती काय आहे याविषयी नासाच्या संशोधकांनी स्पष्टतेच्या पोस्ट आता सोशल मीडियावर पोस्ट करीत हा गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अफेलिऑन फेनोमेनन म्हणजे नेमके काय ? या स्थितीमुळे पृथ्वीवर काही विपरीत परिणाम होतात का ? याविषयी सविस्तर माहिती देत यामुळे निर्माण झालेल्या अनामिक भीतीपासून लोकांना जागृत करण्याचे काम संशोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत.

पृथ्वीसह सर्व सौर मंडळातील ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात असा शोध १७ व्या शतकात जोहान्स केपलर याने लावला. सुर्यमालेच्या या कक्षेत सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूला ‘उपसूर्य’ म्हणतात. तर सर्वात दूरच्या बिंदूला ‘अपसूर्य’ म्हणतात. पृथ्वीपासून सूर्याचे सरासरी अंतर सुमारे १४.९६ कोटी किलोमीटर आहे. ‘उपसूर्य’ स्थानाचे अंतर सुमारे १४.७ कोटी किलोमीटर आहे, तर ‘अपसूर्य’ स्थानाचे अंतर सुमारे १५.२ कोटी किलोमीटर आहे. म्हणजे सुमारे १.७ टक्के एव्हढा फरक आहे. मात्र या फरकाचा पृथ्वीवरील ऋतुमानाशी कोणताही संबंध नाही. पृथ्वीची कक्षा विषुववृत्तीय सपाटीपेक्षा २३.५ अंशाने झुकलेली आहे. त्यामुळे दक्षिणायन आणि उत्तरायण अश्या दोन घटना घडतात. जून ते ऑगस्ट साधारणपणे उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. तर डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हे उलट होते. म्हणजेच दक्षिण गोलार्धात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. म्हणजेच ‘अफेलिऑन’ किंवा ‘पेरिहेलिऑन’ स्थितीचा पृथ्वीच्या ऋतुमानाशी कोणताही संबंध नाही हे स्पष्ट होते. पृथ्वी सूर्याभोवती लंबगोलाकार फिरते त्यामुळे दोघांमधील अंतर दरक्षणाला बदलत असते. वर्षात एकदा साधारणतः जुलै महिन्यात ते सर्वात जास्त असते तर जानेवारी महिन्यात सर्वात कमी अंतर असते. दि. ४ जुलै २०२२ रोजी पृथ्वीचे सुर्यापासूनचे अंतर १५,२०,९८,४५५ किलोमीटर होते. यालाच ‘अफेलिऑन फेनोमेनन’ म्हणतात. २०२३ मध्ये ही स्थिती ७ जुलै रोजी असेल. तेंव्हा हे अंतर १५,२०,९३,२५१ किलोमीटर असेल. यामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत नगण्य असा फरक पडतो. म्हणूनच या काळात ‘कडाक्याची थंडी’ वगैरे काही पडणार नाही. २०२२ मध्ये दि. ४ जानेवारी रोजी सूर्य आणि पृथ्वी दरम्यान सर्वात कमी अंतर होते. ते १४,७१,०५,०५२ किलोमीटर एव्हढे होते. यालाच ‘पेरीहेलिऑन’असे म्हणतात. २०२३ मध्ये दि. ४ जानेवारीला हे अंतर १४,७०,९८,९२५ किलोमीटर एव्हढे असेल.

आजकाल व्हायरल इन्फेक्शनच्या साथींनी थैमान घातलेले आपण अनुभवत आहोत. अर्थात यापूर्वी कधी मानवाने अश्या साथीचा सामना केला नाही असे नाही. कोविडपूर्वीही अनेक साथीचा मानवाने मुकाबला केला आहे. मात्र माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानात प्रगती साधल्यानंतर गाफील राहिल्यानेच यावेळी कोविडच्या महामारीचा फटका मोठ्याप्रमाणात बसला. त्यात भर पडली ती सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या अर्धवट माहितीच्या पोस्टमुळे. भ्रमित करणाऱ्या अश्या पोस्ट नेहमीच नुकसानकारक ठरतात. विषाणूंच्या संक्रमनापेक्षा सोशल मीडियावरून होणाऱ्या भ्रमित संक्रमणाचा फटका मोठ्या प्रमाणात बसतोय. म्हणूनच हा विषय लिहायला घेतला. ‘अफेलिऑन फेनोमेनन’ संदर्भात पहिल्यांदा भ्रमित करणारी पोस्ट २३ जूनला फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाली होती. कॅमेरून मधून ही पोस्ट पहिल्यांदा झळकली. पुढे जगभर तिच्या भाषांतरीत आवृत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. सध्याच्या काळात ‘व्हायरल’ हा शब्दच काळजाचा ठोका चुकविणारा ठरला आहे. साध्या थंडी-तापाच्या साथीचा देखील जगाने धसका घेतला आहे म्हणून तर हा लेखन प्रपंच करावा लागतोय. पृथ्वी कधी सुर्या जवळ तर कधी दूर हा सौर मंडलातील उत्सव नेहमीच वर्षातून एकदा घडत असतो. त्याचा वातावरणावर काही अंशात्मक फरक होतही असेल. पण त्याची धास्ती घ्यावी एव्हढा परिणाम याअगोदर कधी झालेला दाखला मिळत नाही. तेंव्हा अश्या भ्रमित करणाऱ्या ‘पोस्ट’ पासून दूर राहिलेले केंव्हाही चांगलेच.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

5

)

  1. Rupali

    Gladly there were no such messages seen in this part of the world.

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      वैज्ञानिक विषय बहुदा जड वाटतात. सहजतेने त्यावर प्रतिक्रिया देता येत नसावी. हेच राजकीय अथवा मनोरंजनात्मक विषय असेल तर प्रतिक्रिया येतात हा आजवरचा अनुभव.

      Like

      1. Rupali

        Asel pan majha anubhav WP var marathi sathi khoob positive nahi. Tyapeksha FB var groups active astat kadachit tumhala tithe response changla milel.

        Liked by 1 person

      2. मुकुंद हिंगणे

        होय, fb वर रिस्पॉन्स चांगलाच मिळतो हे खरं आहे. पण fb वर आपल्या परिचित एकाच समूहाचे सर्कल तयार होते. ब्लॉगला एक मोठी संधी असते. तुम्ही तुमच्या परिचित समूहाशिवाय नवे फ्रेंड्स जोडू शकता. माझी इच्छा हीच आहे जे मराठी लोक व्यवसाय-नोकरी, कामानिमित्त इतर राज्यात किंवा देशात गेले आहेत त्यांना आपल्या भाषेत वाचायला, कनेक्ट व्हायला मिळावे. त्यासाठीच खटाटोप सुरू आहे. वेळ लागेल पण होईल. 🙏🙏🙏

        Like

    2. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद 🙏🙏🙏

      Like