



गेल्या दशकापासून सोलापुरातील वैद्यकीय उपचारसेवा क्षेत्रात कमालीचे बदल घडत असून अद्ययावत यंत्रणेसह सर्वसुविधांयुक्त अनेक हॉस्पिटल्स रुग्णसेवेत कार्यमग्न झालेली दिसत आहेत. भौगोलिक दृष्ट्या सोलापूर शहर हे पश्चिम महाराष्ट्रात असले तरी मराठवाडासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच वैद्यकीय उपचारासाठी महाराष्ट्रासह शेजारच्या तीनही राज्यातील रुग्ण सोलापुरात उपचार घेण्याला प्राधान्य देतात. रस्ते महामार्गासह रेल्वेने जोडलेल्या सोलापूरचे दळण-वळण अधिक गतिमान व्हावयाचे असेल तर राजकीय अनास्थेमुळे प्रलंबित असणारी विमानसेवा जर सुरू झाली तर खऱ्या अर्थाने सोलापूरचे वैद्यकीय क्षेत्र हे ‘मेडिकल हब’ म्हणून आकाराला येईल यात शंका नाही. इथले प्रख्यात शल्यचिकित्सक, हृदयरोग तज्ज्ञ, स्पेशालिस्ट आणि उपचारसेवेचा दर्जा पाहता कित्येकवेळा विदेशातील डॉक्टर्स सोलापुरात उपचार घेण्यासाठी रुग्णांना सुचवितात. केवळ विमानसेवा अभावी विदेशातील तज्ज्ञ सोलापुरात येवून रुग्णांना उपचारसेवा देवू शकत नाहीत. ही एकमेव उणीव दूर झाली तर खऱ्या अर्थाने सोलापूर शहर हे ‘मेडिकल हब’ म्हणून प्रकाशात येईल.
सोलापूरचा ‘मेडिकल हब’ हा विषय पुन्हा चर्चेत आणण्याचे कारण देखील संयुक्तिक असेच आहे. वरील व्हिडीओ क्लिप आपण पाहिली असेल. आता त्याविषयावर सविस्तर माहिती मिळाली की मग सोलापूरच्या मेडिकल हबचा विषय चर्चेत का आणायचा याचा खुलासा होईल. रायगड जिल्ह्यातील बोडली मांडवा (ता.-मुरुड जंजिरा) येथील व्यवसायाने रिक्षाचालक असलेले इक्बाल हमदुले यांच्या पत्नी असिया इक्बाल हमदुले यांना ‘पेम्पिगास व्हलगरीस’ नावाची त्वचेची समस्या खूप दिवसांपासून होती. त्यावर सर्वप्रकारचे औषधे आणि उपचार त्या नियमितपणे घेत होत्या. मात्र ही समस्या वाढतच गेली. पेम्पिगास म्हणजे काय ? तर पेम्पिगास ही एक ऑटोम्युनिन डिसऑर्डर आहे. जिथे व्यक्तीची स्वतःची रोग प्रतिकार प्रणाली निरोगी त्वचेच्या पेशींवर हल्ला करते. हा एक दुर्मिळ आजारांपैकी एक आजार आहे. ज्यामध्ये त्वचेवर फोड येतात. हा संभाव्यता घातक असू शकतो. हा संक्रमक आजार नाही म्हणूनच तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे प्रसारित होत नाही. याचा कोणत्याही वयोगटावर प्रभाव होवू शकतो. यातूनच असिया हमदुले यांना ऑस्टियो आर्थ्रायटीस हा हळूहळू प्रगतिशील होणारा एक सांध्याचा रोग जडला. ज्यामुळे सांधे वेदनादायक आणि कडक होवू लागतात. यामध्ये त्यांची डावी मांडी खुब्यापर्यंत प्रभावित झाली होती. त्यातच कोरोनाकाळात त्यांना ‘अव्हस्कुलर नेक्रोसिस’ (avascular necrosis) हा आजार जडला. यामध्ये हिप्सच्या (Hips) ज्वाइंट्सना (Joints) रक्तपुरवठा पोहोचत नसल्याने हाडांच्या ऊती (Bone Tissue) मृत होतात. कोविड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळी बुरशी (Black Fungus), पांढरी बुरशी (white fungus), म्युकर मायकोसिस होण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे अव्हस्कुलर नेक्रोसिस देखील होत असल्याचे समोर आले आहे. याकरिता असिया हमदुले यांना टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी सुचविण्यात आली होती. रिक्षाचालक असलेल्या इक्बाल हमदुले यांना ही शस्त्रक्रिया मुंबई-पुण्यातील हॉस्पिटलमध्ये करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. याबाबत त्यांचे नातेवाईक असलेले अमेरिकेतील डॉ. हमजा यांच्याकडे त्यांनी सल्ला मागितला असता त्यांनी सोलापुरातील ऑर्थ्रोपेडीक सर्जन डॉ. असित चिडगुपकर यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सोलापूरमध्ये हमदुले कुटुंबाचे कुणीही नातेवाईक नसताना, सोलापूरशी परिचित नसताना इक्बाल हमदुले यांनी डॉ. असित चिडगुपकर यांच्याशी संपर्क साधून सोलापुरलाच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. असित यांनी इक्बाल हमदुले यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यल्प दरात ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. अवघ्या तीन दिवसात पेशंट नुसताच उभा राहिला नाही तर चालू लागला.

ही अगदीच आठवडा पूर्वीची घटना आहे. यापूर्वीही सोलापुरातील अनेक डॉक्टरांनी अतिशय क्लिष्ट अश्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. अनेकदा विदेशी डॉक्टरांनी सोलापूरच्या हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या शिफारशी केलेल्या आहेत. अद्ययावत यंत्रणा आणि सोयीसुविधा असलेल्या हॉस्पिटलमधून कित्येक दुर्लभ अश्या आजारांवर मात करीत रुग्णांना आजारमुक्त करणारी सोलापूरची वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय क्षेत्र हे अधिकृत रित्या ‘मेडिकल हब’ म्हणून जेंव्हा घोषित होईल तेंव्हाच सोलापूरचा नावलौकिक खऱ्या अर्थाने साता समुद्रापल्याड जाईल असे मत मांडणारे डॉ. असित चिडगुपकर हे एक त्यापैकीच बोलके उदाहरण आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा