जागतिक शुभेच्छांचे धनी नरेंद्र दामोदर मोदी

भारताचे पंतप्रधान आणि जागतिक पातळीवर आपल्या कौशल्यपूर्ण नेतृत्वगुणाचा ठसा उमटविणारे नरेंद्र दामोदर मोदी यांचा दोनच दिवसांपूर्वी ७२ वा वाढदिवस साजरा झाला. म्हणाल तर हा प्रासंगिक किंवा नैमित्तिक लेख समजा. अर्थात राजकीय व्यक्तिमत्वाविषयी चार शब्द लिहावे हा विचार जरी मनात आला तरी तो तात्काळ झटकून टाकावा वाटतो असं एकूणच सामाजिक आरोग्य बिघडवून टाकणारं एकतर्फी मतप्रवाहाचं ‘कलुषित’ वातावरण झालेलं आहे. जरा एखाद्याविषयी चार शब्द चांगले लिहिले की लगेचच तुम्ही ‘त्या’ विचारसरणीचे आहात असा शिक्का तुमच्या कपाळावर मारल्या जातो. म्हणूनच मोदी यांचा वाढदिवस होवून चांगले दोन दिवस उलटून गेल्यानंतर हे प्रासंगिक लिहायला घेतले. या दोन दिवसात मोदीप्रेम आणि मोदीद्वेष दोन्हीही बघता आला. यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवणारी एक गोष्ट तुमच्याशी ‘शेअर’ करायला आवडेल. लहानपणी म्हणजेच शालेय जीवनात भाषा विषयाच्या परिक्षातून निबंधलेखन हा प्रकार मार्कंची ‘बुंदी’ पाडणारा असायचा. भलेही त्या भाषेच्या व्याकरणात तुम्ही कच्चे असाल, तरीदेखील निबंधामध्ये जास्तीतजास्त मार्क मिळवून सरासरी वाढविण्यासाठी निबंधलेखन हा प्रकार म्हणजे रामबाण उपाय ठरायचा. त्यामुळे निबंधलेखन आवडत नाही असं म्हणणारा ‘क्वचितच’ असायचा. बरं या निबंधलेखनासाठी देखील फार आवडते विषय निवडलेले असायचे. त्यातील एक विषय म्हणजे ‘माझा आवडता नेता’ किंवा ‘माझे आवडते पंतप्रधान’ हा असायचा. शिवाय निबंध लिहिताना तुम्ही किती उत्कटतेने लिहिला आहे, तो सर्वस्पर्शी आहे का ? हे तपासून मार्क दिले जायचे. कुणा व्यक्तीवर लिहिला आहे ? मग लिहिणारा त्या जातीचा, धर्माचा किंवा विचारधारेचा असावा असा समज पेपर तपासनीस करत नव्हते. आमचे आवडते चाचा नेहरू हा निबंध लिहिला म्हणून आम्ही कधी काँग्रेसी ठरलो नाही की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर निबंध लिहिला म्हणून कधी आम्हाला हिंदुत्ववादी किंवा संघोटे म्हणून वर्गात कुणी हिणवले नाही. अलीकडे मात्र राजकीय पक्ष आणि त्यांची बलुतेदारी करणाऱ्या तथाकथित सामाजिक संघटनांच्या संकुचित विचारधारांच्या कलुषित करणाऱ्या वाकयुद्धामुळे एकूण सामाजिक आरोग्यच बिघडू लागले आहे. म्हणूनच जागतिक शुभेच्छांचा धनी झालेल्या नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चार चांगले शब्द लिहायला देखील बळ एकवटावे लागत आहे. कदाचित ‘संघोटा’ किंवा ‘हिंदुत्ववादी’ म्हणून लगेचच कपाळावर शिक्का मारला जाईल याची शंका उगीचच अस्वस्थता वाढविते.

नुकत्याच दि. १५ आणि १६ सप्टेंबरला समरकंद येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीत भारताची भूमिका मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने समर्थन देणारे आशियायी देश बघितल्यानंतर मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. युरोपीय देश अगोदरच मोदी यांचा प्रभाव मान्य करताना आपण पाहिले आहेत. नेमके या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा जन्मदिवस आला. अपेक्षेप्रमाणे हा वाढदिवस देशात विविध उपक्रमांनी साजरा होणार हे ओघाने आलेच. भारतात या दिवशी लसीकरणाचा उच्चांक गाठला. दिवसभरात देशभरात अडीच कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्ट यंत्रणेला पूर्ण करता आले. ही आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एव्हढी आहे. ब्रिटिश माध्यमांसह सर्व युरोपीय देशांनी या वर्ल्ड रेकॉर्डचे स्वागत करत मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याबरोबरच सर्वात लक्षवेधी घटना म्हणजे मुस्लिम देशांमधून विशेषतः शेजारच्या पाकिस्तान सारख्या भारतविरोधी देशातूनही नरेंद्र मोदी यांना नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. दिवसभर पाकिस्तानच्या विविध चॅनल्सवर नागरिक मोदींना शुभेच्छा देत असल्याचे ‘लाईव्ह प्रोग्रॅम’ प्रसारित झाले. संयुक्त अरब अमिरात मधील दुबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘खालीज टाईम्स’ या वृत्तपत्राने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क पन्नास पानांची ‘विशेष पुरवणी’च प्रसिद्ध केली आहे.

मोदींच्या जागतिक प्रतिमेबाबत उहापोह करताना फार मागे जाण्याची काही गरज नाही. अगदी अलीकडच्या काळातील जागतिक पातळीवरील घटनांचा मागोवा घेतला तरी भारताची मध्यवर्ती भूमिका आणि त्याबरोबरच मोदींची शक्तिशाली बनत असलेली प्रतिमा हा विषय जागतिक स्तरावर माध्यमातून टॉक शोच्या माध्यमातून दरदिवशी कोणत्या न कोणत्या आंतरराष्ट्रीय चॅनल्सवर प्रदर्शित होत असतो. यातून मोदींच्या विरोधात आणि मोदींच्या बाजूने अशा दोन्हीही विचारप्रवाहांचे दर्शन होत असते. मग अफगाणिस्तानचे अंतर्गत यादवी युद्ध असो, कोरोना काळातील केलेले मदतकार्य असो, भारत-पाकिस्तान, भारत-चीन मधील सीमेवरच्या कारवाया असो, पश्चिम बंगाल, नेपाळ, श्रीलंका या देशांच्या सोबत असणारे संबंध असो, रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका, युद्धामुळे विस्थापितांच्या उद्भवलेल्या प्रश्नावर भारताची भूमिका असो, अमेरिका-चीनच्या तणावपूर्ण संबंधावर आशियात शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका असो यासर्व घडामोडीतून भारताची मजबूत प्रतिमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता पहावयास मिळते. स्व. इंदिरा गांधी यांच्या नंतर कणखर नेतृत्व म्हणून भारताबाहेरही जगभरात आपली प्रतिमा निर्माण करण्यात नरेंद्र मोदी हे कमालीचे यशस्वी झाल्याचेच समोर येते. काश्मीरमध्ये औद्योगिकता वाढीसाठी संयुक्त अरब अमिरात सारख्या तेल उत्पादित देशाला दिलेले निमंत्रण कदाचित त्यांच्या मोदी प्रेमाचे भरते म्हणून आपण त्यांच्याकडे एकवेळ कानाडोळा करू शकतो. पण इस्लामी कायदा लागू करण्याचा अट्टाहास धरणाऱ्या अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचे मोदीप्रेम हे आकलनाबाहेरचे वाटते. स्वातंत्र्यापासूनच क्रमांक एकचा दुश्मन देश अशी भावना बाळगणाऱ्या शेजारच्या पाकिस्तान देशातून भारताच्या पंतप्रधानांचा ‘हॅपी बर्थडे’ पाकी नागरिक समाज माध्यमातून साजरा करतात, तेंव्हा निश्चितच ही बाब अभिमानास्पद वाटते. इम्रान खान आणि शहाबाज शरीफ यांच्या दूरदृष्टीचा अभाव असणाऱ्या राजवटीमुळे अन्नाला महाग झालेल्या पाकिस्तानी नागरिकांचा रोष या मोदीप्रेमामागे असू शकतो. जगभरात मिळणारी वाढती लोकप्रियता खचितच अन्य कुणाला मिळाली असेल. म्हणूनच मोदी नंतर कोण ? ही नेतृत्वाची स्पर्धात्मक चर्चा फक्त भारतातच नाही तर जगभरात आत्तापासून सुरू आहे.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to rituved उत्तर रद्द करा.

Comments (

11

)

  1. smitahingne

    मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी निश्चित प्रभावशाली नेता आहेत.
    चांगला लेख.👍👌

    Liked by 1 person

  2. rituved

    मोदी नंतर कोण आणि तेंव्हा आम्ही कुठे , हा विचार करण्यासाठी खरच भाग पाडेल हा लेख…

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      खरंय मित्रा.

      Liked by 1 person

  3. Nilkanth Watte

    अतिशय सुरेख लेख,थोडक्यात परंतु सर्व कांही समाविष्ट व माहितीपूर्ण….

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद सर, 🙏🙏🙏

      Liked by 1 person

  4. aaliya sayyad

    Nice thought

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      Thank you 👍👍

      Liked by 1 person

  5. rajiv shete

    Really मोदी is great. मेरी उमर तुम्हे mil जाये.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      खरंय राजू सेठ….🙏🙏

      Liked by 1 person

  6. newsintercontinental.com

    समतोल लेख. मोदी वादग्रस्त असले तरी त्याच्याशी दस्तुरखुद्द मोदींना काहीही घेणेदेणे नाही. प्रखर देशभक्ती व जागतिक जाणीवा व मानवाच्या इतिहासाच्या तळाशी असलेली तत्वे अनेक ‘इझमस्’ isms like capitalism, mmarxism,socialism यांच्या मुळ तत्वांवरील व जनसामान्यांचे दैनंदिन जीवन, आधुनिक विज्ञान यांचा त्यांचा प्रचंड अभ्यास व तर्कशुद्ध, कठोर कर्तव्य पालन अंगिकारले असल्याने ‘जरतर’मधे ते कधी अडकताना दिसत नाहीत व असामान्य उर्जेने पुढे अग्रेसर होताना दिसतात. वाढदिनाच्या त्यांना शुभेच्छा आणि अजून सखोल लिखाणाची अपेक्षा व्यक्त करीत आपणास ही शुभेच्छा👍🙏

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      निश्चितच आपल्या अपेक्षा पूर्ण करताना समाज माध्यमांच्या मर्यादा आणि सत्यांश आणि तथ्यांश अतिशय विनम्रतेने आणि सभ्यतेने मांडण्याचा प्रयत्न आहे हे नमूद करावेसे वाटते.

      Liked by 1 person