
शीर्षक वाचल्यावर तुम्ही नक्कीच गोंधळात पडला असाल,…एकतर तुटकतेने काहीतरी सुचविणारे हे वाक्य भारताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे असावे असे वाटत असेल. आजकाल अश्या स्लोगनचे फलक हे राजकीय विषयांसाठीच वापरले जातात. पण छायाचित्रात नीट बारकाईने पाहिले तर तो फलक तुम्हाला नक्कीच परिचित वाटत असावा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आयुष्यात एकदाही तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात गेला नाही असा एकही मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. अगदी बरोबर….आत्ता तुमची ट्युब पेटली असेल. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या बाजूला हा फलक श्रध्दाळू भाविकांची कायम गर्दी खेचताना दिसतो. काय आहे तिथं…? तर तुमच्या मनातील इच्छित स्वप्नांना कौल देणारा गोल गुळगुळीत दगड, नर्मदेतील शाळिग्राम म्हणा हवं तर….चिंतामणी म्हणतात त्याला. तर ह्या चमत्कारी दगड चिंतामणी पासून मिळालेला कौल समजून घेण्याची पध्दत म्हणजेच ‘ डावा नकार…उजवा होकार, स्थिर अनिश्चित प्रयत्नाने होईल ‘ हे भाकीत सांगणारा हा फलक आहे.

माझ्या शालेय वयापासून पाहतोय… चार आण्याचे (पंचवीस पैसे) नाणे चिंतामणीच्या मस्तकी लावून दोन्ही हात हलक्याने ठेवत मनात इच्छा पुटपुटली की चिंतामणी कौल देतो. अर्थात तो डाव्या बाजूला वळला तर नकार म्हणजे नाही. अन् उजव्या बाजूला वळला तर होकार. पण चिंतामणी स्थिर राहिला तर त्याकाळापुरते तुमचे इप्सित साध्य होण्यास अस्थिरता राहिल पण प्रयत्नाने तुम्हाला साध्य करता येईल, असे भाकीत समजले जाते. पुढे भाविकांना अनुभूती येत गेली अन् भाकीत सांगणाऱ्या चिंतामणीच्या जीवावर उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्या धारकाचे भाग्य फळफळले. चार आण्याचे पन्नास पैसे, पुढे रुपया, दोन रुपया, पाच रुपया आणि आता दहा रुपये (सर्व नाण्यांमध्ये). चिंतामणीला फक्त कॉइन चालतात, त्याशिवाय तो काही कौल देत नाही बरे ! जरी तुम्ही धारकाची नजर चुकवून काही चालबाजी केली (म्हणजे खोटा सिक्का वगैरे) तरी चिंतामणीला ते लक्षात येते अन् तो कौलच देत नाही. हाय की नाय गंमत…! त्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याचदा चिंतामणीला आपल्या आंदोलनाच्या जाळ्यात घेरण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या श्रध्देचा विषय असल्याने अंनिस वाल्यांना गप्प बसावं लागलं. आयुष्यात सामना करावा अशी अनेक प्रसंग, प्रश्ने अनुत्तरित राहतात. ती गूढता संपावी म्हणून तर माणूस श्रध्देने दगडात देखील पंचप्राण असल्याचे मान्य करतो. चिंता हरतो तो चिंतामणी….एक चिंतामणी प्रत्येकालाच हवा असतो.

आता हीच प्रोसेस भारतीय राजकीय पक्षांमध्ये अगदी पक्षधर्म म्हणून पाळताना दिसून येते. फरक फक्त इतकाच की तिथे गोल गुळगुळीत दगड आहे अन् इथे हाडामासांचा, तल्लख बुद्धीचा आणि बोलका पोपटराव असलेला चिंतामणी आहे. त्याची भूक पण मोठी आहे. त्यामुळे दहा रुपयाच्या एका नाण्यामध्ये त्याचे आणि त्याच्या मालकाचे पोट भरत नाही एव्हढेच. बाकी तो सत्ता आणि पक्षाच्या अस्तित्वाची भलीबुरी भाकिते रोज चॅनल समोर करत असतो. नेतृत्वासमोर कठीण प्रसंग असेल तर तो स्थिर राहतो. उजवीकडे वळत नाही की डावीकडे वळत नाही. मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून कौल मागणारा नेता काहीकाळ गप्प बसून योग्यवेळ येण्याची प्रयत्नपूर्वक वाट पहातो. नेता कितीही ताकदवर असू देत त्याला एका चिंतामणीची गरज असते. जो वेळोवेळी त्याला डावा – उजवा किंवा स्थिर राहणारा कौल देत असतो. भारतीय राजकारणात प्रत्येक राजकीय पक्षांना म्हणून तर हवे असतात असे चिंतामणी……

:- मुकुंद मधुकर हिंगणे
Leave a reply to Rupali उत्तर रद्द करा.