काका-पुतण्याच्या संघर्षातील राजकीय बेरीज-वजाबाकी…!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार आणि त्यांचे पुतणे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातील ताज्या राजकीय संघर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्वच पणाला लागलेले असताना राज्यातले समस्त बोरूबहाद्दर आणि राजकीय निरीक्षक-अभ्यासक एखाद्या रमल ज्योतिषाप्रमाणे भाकिते वर्तविण्यात मग्न झालेली आहेत. महाराष्ट्राला पहिल्यांदाच काका-पुतण्याच्या राजकीय संघर्ष पहायला मिळतोय असे देखील नाही. केवळ शरदचंद्र पवार यांना त्यांच्या घरातूनच आव्हान दिल्या गेल्याने ‘पवार इज पॉवर’ या समिकरणाला पुसण्याची संधी आली आहे का ? याचा अंदाज बांधला जात आहे एव्हढंच. अलीकडच्या १८ वर्षांच्या काळातील काका- पुतण्याच्या राजकीय संघर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील तीन प्रमुख घटनांमध्ये कोण जिंकले आणि कोण हारले ? या व्यक्तिगत अहमिकेपेक्षाही महाराष्ट्राचे काही नुकसान झाले का ? राजकीय पटलावर नव्या राजकीय पक्षांच्या भाऊगर्दी शिवाय महाराष्ट्राच्या हाती काही लागले का ? याचा विचार करण्याची आज खरी गरज आहे.

काका-पुतण्याच्या संघर्षाची अलीकडच्या १८ वर्षाच्या काळातील पहिली घटना…..

अलीकडच्या काळात काका-पुतण्याचा पहिला सर्वात मोठा राजकीय संघर्ष महाराष्ट्राने पाहिला तो २००५ मध्ये. पुत्रप्रेमाचा राजकीय वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील हा वाद शिवसेनेच्या विभागणीपर्यंत ताणल्या गेला. महाराष्ट्रातच नाही तर देशात जे काही प्रादेशिक स्तरावरचे राजकीय पक्ष आहेत. त्यांचा राजकीय वारसा हा संस्थापकाच्या घरातूनच होतो. प्रादेशिक पार्टी ही त्या घराण्याची खासगी प्रॉपर्टी असते. त्यामुळे वरकरणी वैचारिक वारसा वगैरे मुद्दे हे फक्त भाषणबाजी पर्यंतच ठीक राहतात. ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’ ही कैफियत मांडणारी सालंकृत शब्दरचना पहिल्यांदा याच भांडणातून समोर आली. त्यानंतर ही वाक्यरचना पुढे कायम राहिली. प्रत्येक पुतण्याने आपल्या काकांशी संघर्ष करताना त्यांना विठ्ठलाची उपमा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री पांडुरंग हे राजकीय दैवत असल्याचा महाराष्ट्राला साक्षात्कार झाला. तर श्री पांडुरंगाची भक्ती करणारा भागवतधर्माची विचारधारा अंगिकारणारा वारकरी हा राजकीय कार्यकर्ता ठरला. त्यामुळे आपला काका विठ्ठल आणि त्याच्या अवती-भवती असलेले कोंडाळे म्हणजे बडवे असं सोपं समीकरण महाराष्ट्रात रूढ झालं. ठाकरे काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षातून शिवसेनेचा शक्तिपात होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष राजकीय पटलावर आला. राजकारणातील गर्दीला एक नवं व्यासपीठ मिळालं एव्हढा फायदा सोडला तर या संघर्षातून महाराष्ट्रासाठी कोणता राजकीय फायदा झाला ?

काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षात स्व. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे ही दुक्कल देखील चर्चेत राहिली.

शिवसेनेतील काका-पुतण्याचा राजकीय संघर्ष महाराष्ट्रातील जनतेला विस्मरणात नेत नाही तोवरच २००९-१० च्या दरम्यान महाराष्ट्रात सत्तेसाठी भक्कम पाय रोवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या संघर्षाचा चेहरा समजल्या गेलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या घरात काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा वणवा पेटला. कारण तेच राजकीय वारसा….इथेही विठ्ठल आणि बडव्यांची उपमा देत संघर्ष चव्हाट्यावर आणला गेला होता. इथे फरक एव्हढाच होता की भाजप हा एकतर प्रादेशिक पक्ष नव्हता आणि पक्षाच्या संस्थापकांपैकी एक अशी स्व. गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा तयार केली गेली नव्हती. मात्र शहरी आणि ब्राह्मणी नेतृत्वाचा पक्ष म्हणून चेहरा असलेल्या भाजपा हा पहिल्यांदा बहुजनांचा पक्ष म्हणून महाराष्ट्रात पुढे आणण्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचा खुबीने वापर केला होता. त्यामुळेच मुंडे घराण्यातील काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षात महाराष्ट्रात काही राजकीय उलथापालथ होईल का ? याची त्यावेळी राजकीय अभ्यासकांची मतमतांतरे सुरूच होती. पण स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात शड्डू ठोकत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या कबिल्यात जाऊन बसले. त्यामुळे समर्थक कार्यकर्त्यांचे स्थलांतर एव्हढीच काय ती खळखळ या काका-पुतण्याच्या संघर्षातून महाराष्ट्रा समोर आली. नाही म्हणायला स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वैचारिक वारसा म्हणत ‘परळी’ हा मतदारसंघ मुंडे घराण्याचा गड म्हणून पुढे आला. महाराष्ट्राला हे काही नवीन नाही. लोकांनी स्वीकारलेल्या नेत्याच्या पुढच्या पिढीसाठी मतदारसंघ ही बापकमाईची संपत्तीच असते. त्यामुळे त्यावरील कायदेशीर हक्क सांगण्यासाठी वारसदारांना आप्तांशी संघर्षच करावा लागतो हेच महाराष्ट्राने अनुभवले आहे.

आता पवार घराण्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्राच्या बेरजेचे राजकारण करणार की नुसताच पॉवर प्ले ठरणार ?

आता सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर आलेला काका-पुतण्याचा संघर्ष हा केवळ सत्तेशिवाय फारकाळ लांब न राहणाऱ्या पवार घराण्यातील राजकीय खेळ आहे की शरदचंद्र पवार यांना कायमचे घरी बसवत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुरू केलेला हा राजकीय संघर्ष आहे हे महाराष्ट्राला लवकरच कळेल. इथेही ‘विठ्ठल-बडव्यांच्या’ उपमेची जपमाळ ओढत ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांना विठ्ठल आणि त्यांच्या अवती-भवती असणाऱ्या नेत्यांना बडव्यांची उपमा देऊन झालीय (बिचारा पांडुरंग). सध्यातरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर हक्क सांगत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात टाकून घेतली असली तरी देखील फुटीच्या शक्तीपाताने कमजोर झालेल्या राष्ट्रवादी पक्षाची सूत्रे आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी शरदचंद्र पवार जीवाचे रान करणार. त्याबरोबरच नकळत घडू पाहणाऱ्या महापातका मधून परिमार्जन म्हणून अजितदादा नव्या चिन्हासह नव्या पक्षाची आगामी काळात घोषणा करू शकतील. किंवा काही झाले तरी पवार घराण्यातील कुणी ना कुणी सत्तेत आहे ना ! या राजकीय प्रगल्भतेतून अजितदादांचा स्वीकार होवून शेवट गोड केला जावू शकतो. पवारांविषयी तर्क लावणे जरा कठीणच. पण सरतेशेवटी एक प्रश्न कायम राहणार आहेच……काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षातून महाराष्ट्राने काय साध्य केले ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

3

)

  1. Avinash Hingne

    खूप छान

    Liked by 1 person

  2. niteshphul2009

    अतिशय उत्तम विश्लेषण सर…आपण जो इतर काका-पुतण्या यांचे उदाहरणासहित या राजकीय पारंपरिक खेळीचा डाव मांडला खरच छान आहे.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद मित्रा.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

      Liked by 1 person