भविष्याची ओढ कुणाला नसते….’उद्या’च्या पोटात काय दडलंय हे जाणून घेण्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. कुंडलीवरून जातकाचे भविष्य सांगणाऱ्या प्रगाढ पंडित ज्योतिषापासून अगदी कुडमुड्या ज्योतिषा पर्यंत, दारावर येणाऱ्या पिंगळ्या पासून नंदीबैलवाल्या पर्यंत कुणाला न कुणाला आपलं भविष्य विचारून घेण्याची धडपड आपण करीतच असतो. यातही पुन्हा काळी जादू, बंगाली तोटके, जारण-मारण, तंत्रविद्या असल्या गूढ प्रकारात देखील आपण कधीतरी अविश्वासाने,भीतभीत डोकावलेलो असतोच. मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद साधत आपल्या भविष्याची चाहूल घेण्यासाठी पाश्चात्य देशात ‘प्लॅनचेट’ या तंत्रविद्येचा आधार घेतला जातो. तर आपल्याकडेही ‘प्लॅनचेट’ या तंत्रविद्येचा शिरकाव झालेला आढळतो. ही विद्या डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या मार्फतच भारतात रुजली असावी असा माझा समज आहे. ५० ते ७० च्या दशकात जन्मलेल्या पिढीला ‘प्लॅनचेट’ कसं करायचं असतं ? याची माहिती नक्कीच आहे. मात्र १९८० नंतर जन्मलेल्या पिढीला ‘प्लॅनचेट’ बद्दल माहिती अथवा त्यावरचा विश्वास नसावा. एखाद्या हॉलिवूडच्या हॉरर चित्रपटाची कथा समजून घटकाभर मनोरंजन करून ते आपल्या मेंदूतून लगेच डिलीट करतील. पण आमच्या पिढीतील बहुतेकांनी ‘प्लॅनचेट’च्या माध्यमातून प्रसिद्ध मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद साधत आमच्या प्रश्नांची उकल करण्याचा, भविष्य जाणून घेण्याचा हा काळ्या जादूचा भीतीदायक खेळ नक्कीच अनुभवला आहे. प्लॅनचेट करताना आत्म्याच्या मनाविरुद्ध काही झालं तर आवाहन करून बोलवलेला तो आत्मा परत जात नाही. मग तो तुमच्याशी जीवघेणा खेळ खेळायला सुरू करतो. यात तुमचा बळी देखील जावू शकतो ही भीती असताना देखील आमची पिढी हा हॉरर खेळ खेळायची. मृत्यूनंतर आत्मा दुसरा जन्म घेतो, त्याच्या पहिल्या जन्मातील काही इच्छा अपूर्ण असतील तर त्याचा अदृश्य स्वरूपातील आत्मा भटकत राहतो. या असल्या अंधश्रद्धाळू भाकड गोष्टींवर विश्वास बसणाऱ्या वयात प्लॅनचेट करणे फार भारी वाटायचे. आता त्या खुळचट प्रकारचे हसू येते.

१९८४-८५ च्या सुमारास महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबाद ( आत्ताचे छत्रपती संभाजीनगर ) येथे असताना माझ्या एका ख्रिश्चन वर्गमित्राच्या घरी मी अभ्यासाला जायचो तेंव्हा मी प्लॅनचेट कसे करतात हे बघितले होते. माझ्या मित्राच्या घरातील सर्व सदस्यांचा प्लॅनचेटवर खूप विश्वास होता. मात्र त्यांच्याकडे प्लॅनचेट करताना ते फक्त ख्रिश्चन मृत आत्म्यांनाच आवाहन करून बोलवायचे. याबाबत मी माझ्या मित्राला एकदा छेडले असता तो म्हणाला, आम्ही दुसऱ्या कम्युनिटीच्या पवित्र मृत आत्म्यांना आवाहन करून जरी बोलावले तरी ते येत नाहीत. याउलट इतर कम्युनिटीतील दुष्ट-पापी मृत आत्मे सैतान बनून येतात. ते उलट आपल्या समोर संकटे ठेवतात. मी म्हणालो की, मृत आत्म्यांना देखील धर्म-जात असते का ? तर तो म्हणाला की, का नसते ? ते मृत पावताना ज्या धर्मात किंवा जातीत असतात तीच जात किंवा धर्म कायम असतो. त्यांचा आत्मा जोपर्यंत दुसऱ्या जन्मात प्रवेश करत नाही तोपर्यंत आहे त्याच जाती-धर्मात ते असतात. त्यामुळे ते आपल्या अदभूत शक्तींचा वापर फक्त आपल्याच जिवंत बांधवांसाठी करतात. मला हे त्यावेळी पोरवयात असताना लॉजीकली पटले होते. त्यामुळे अनेक मृत ख्रिश्चन शास्त्रज्ञ, योध्दे, समाज सुधारक यांच्या पवित्र आत्म्यांना बोलावले जायचे. मात्र मी तिथे उपस्थित असतानाही माझ्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या पवित्र आत्म्यांकडून मिळायची नाहीत.

मग मी पण हट्टी असल्याने दुसऱ्या मित्राच्या घरी अभ्यासाला गेल्यावर रात्री उशिरा मित्राच्या साहाय्याने प्लॅनचेट केल्यावर आपल्या जाती-धर्मातील मृत आत्म्यांना बोलवायचो. पण साधू-संत, मोठे शास्त्रज्ञ, पुराणकाळातील, मध्ययुगीन काळातील पवित्र आत्म्यांना बोलवायचो. माझ्या घराण्यातील मृत सदस्यांना बोलवायचो. बऱ्याचवेळा ते यायचे येत नसायचे. प्लॅनचेट साठी एका मोठ्या ड्रॉईंग पेपरवर एबीसीडी, एक ते दहापर्यंत आकडे याशिवाय होय-नाही असा चार्ट बनवून घ्यावा लागत होता. मध्यरात्री सगळे झोपी गेल्यावर तयार केलेला चार्ट पाटावर मांडून त्यावर फुलपात्र, वाटी किंवा स्टीलचा छोट्या आकाराचा पेला उपडा ठेवायचो. मग खोलीत अंधार करून बरोबर रात्री बारा वाजून गेल्यानंतर मेणबत्तीच्या प्रकाशात आपल्याला हव्या असलेल्या प्रसिद्ध मृत व्यक्तीच्या आत्म्याला आवाहन करीत बोलवायचे. हे आवाहन प्लॅनचेटच्या तयार केलेल्या चार्टवर वाटी उपडी करून त्यावर दाब न देता बोट ठेवून करायचे. आपण तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जसे कौल मागायला ‘चिंतामणी’ या गोल गरगरीत दगडावर जसा हलका हात ठेवतो अगदी तसे हलके बोट ठेवायचे. आवाहन केलेला पवित्र आत्मा आला की वाटी हलायची. मग प्रश्न विचारायचे….पोरवयात आणि विद्यार्थीदशेत असल्याने अभ्यासाचे, परीक्षेत पेपर सोपा जाईल की अवघड असलेच प्रश्न असायचे. त्यातही सोबतच्या मित्राची खात्री असेल तरच वर्गातली अमुक-अमुक मुलगी ‘लाईन’ देईल का ? असले प्रश्न विचारले जायचे. चाचा नेहरू, महात्मा गांधींपासून डॉ. होमी भाभा अश्या पुण्यातम्यांना तसेच पणजोबा-खापर पणजोबांना आवाहन करून बोलाविले जायचे. हा मॅड आणि अंधश्रद्धाळू खेळ आवडीने खेळला जायचा. आत्मे, भुते, पुनर्जन्म असल्या भाकड गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे वय असल्याने त्या पोरवयात प्लॅनचेट ही एक गुढविद्या वाटायची.

मात्र प्लॅनचेटवर आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला कधी बोलवायचे नसते अशी तंबी दिली जायची. कारण असा आत्मा एकदा आला की परत माघारी जात नसतो. तो तुमच्या शरीरात प्रवेश करून त्याचा बदला पूर्ण करून घेतो असा कडक इशाराही प्लॅनचेट गुरूकडून चेल्यांना मिळायचा. शिवाय प्लॅनचेट सुरू असताना जर मोठा आवाज झाला किंवा तुमची एकाग्रता भंग पावली तर बोलावलेला मृत आत्मा परत जात नसतो. मग असा मृत आत्मा तुमच्या भोवतालीच घुटमळत राहतो. कधी-कधी तुम्हाला भास पण व्हायला लागतात. तोच जर सैतानाचा आत्मा असेल तर…? तो तुमचा गळा दाबायचा देखील प्रयत्न करतो या असल्या भीतीने चड्डीत मुतण्याची वेळ यायची. एकदा आमच्या वर्गातील आत्महत्या केलेल्या मुलीने प्लॅनचेटद्वारे दुसऱ्या वर्गमैत्रिणीच्या शरीरात प्रवेश केल्याची कहाणी पण अनुभवली होती. पण हा थरारक खेळ आम्ही डेअरिंगने खेळायचो. आता चोविसतास टीव्ही, मोबाईल आणि ऑनलाईन गेममध्ये अडकलेल्या पिढीला हा खुळचट आणि अंधश्रद्धाळू गुढविद्येचा प्रकार तरी माहिती आहे का ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा