टोमॅटोचा बाजारखेळ अन सोशल मिडियावरची शेती

तिसऱ्यांदा चांद्रमोहिम राबविणारा भारत देश हा नावापुरताच ‘कृषिप्रधान’ देश राहिला आहे. कारण तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या पाठीमागे वेगाने पळणाऱ्या भारतातील शेतीचे क्षेत्र तितक्याच वेगाने कमी होत चालले आहे. त्यातही ‘शेती’ ही इतकी बेभरवशाची झाली आहे की शेतकऱ्यांनी शेतातून नक्की कोणते पीक घ्यावे हे नव्याने शिकण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच टोमॅटोचा भाव कोसळला म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून सरकारच्या विरोधात आपला संताप जाहीरपणे व्यक्त केला. तर सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने अवघ्या महिना-दिडमहिन्यात करोडो रुपये कमाविल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टोमॅटोचा बाजारखेळ भलेही शेतकऱ्याच्या अंगलट आला असेल मात्र इकडे सोशल मिडियावरची शेती बहरली असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे अशा पोस्ट शेतकरी वर्गापेक्षा शहरी भागात जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत.

गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील शिक्षित शेतकरीवर्ग आपल्या शेतीपासून खूप दूर गेलेला आहे. एकतर शेतीची आणि मेहनतीची सवय मोडल्यामुळे त्याने दुसऱ्याकरवी (बटाईने) शेती करण्यावर भर दिल्याने त्याला पावसाचा आणि हंगामाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यातही शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्याला उंटावरून शेळी हाकण्याचे धोरण नाईलाजाने का होईना हाती घ्यावे लागत आहे. यातूनही वडिलोपार्जित शेतजमीन टिकवायची म्हणून शेती फुलवायची तोशीस त्याला करावी लागते. नोकरीतून मिळणाऱ्या वेतनात शहरी जीवन जगत त्यातूनही काही बचत करायची अन ती बचत गावाकडच्या शेतीत खर्ची घालायची यातच धन्यता मानणाऱ्या शहरी युवा शेतकऱ्यांना शाश्वत शेतीबद्दल माहिती असली तरी धाडसी प्रयोग म्हणून तो त्याकडे पाहतो. यापेक्षा शेतजमीन विकून त्या पैशात शहरात प्लॉट खरेदी करण्याकडे त्याचा कल वाढत आहे. अशा निरुत्साही वातावरणातही विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोस्ट सोशल मीडियातून झळकल्या की शेतीपासून दूर गेलेला हा शेतकरीवर्ग आपल्या शहरी दोस्तांकडून व्हायरल झालेल्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत सोशल मिडियावरची ‘व्हायरल शेती’ कसायला सुरुवात करतो.

आता हेच बघा ना….मे 2023 मध्ये टोमॅटोला रास्तभाव मिळाला नाही म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आपले टोमॅटोचे पीक रस्त्यावर फेकून देत राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात अचानक वाढत्या मागणीने टोमॅटोचा भाव वधारला. दहा-पंधरा रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोने अचानक उसळी घेत एकशे ऐंशी पर्यंत मजल मारली. या विक्रमी भाववाढीत बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. झालं सोशल मीडियाला एव्हढं निमित्त पुरेसे आहे…. लगेच करोडपती झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या ‘पोस्टी’ सोशल मीडियावरून व्हायरल होवू लागल्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तुकाराम भागोजी गायकर या टोमॅटो उत्पादकाने एका महिन्यात १३ हजार टोमॅटो कॅरेटची विक्री करत दीड कोटी रुपये कमावल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. तर जुन्नरच्याच ईश्वर गायकर आणि त्यांच्या पत्नी सोनाली गायकर या दाम्पत्याने अवघ्या दोन महिन्यात १२ एकर शेतीतून घेतलेल्या टोमॅटो उत्पादनातून २ कोटी ३० लाख रुपये कमावल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टच्या सत्यतेबाबत शंका न घेता यावर विश्वास ठेवत लाईक आणि कमेंटने सिंचन करीत सोशल मिडियावरची शेती बहरली आहे. सध्या आपण या व्हायरल होणाऱ्या पोस्टवर फिदा होत जुन्नरच्या त्या गायकर कुटुंबाचा हेवा करत बसलोय…..आयला आपण पण शेतकरी कुटुंबात जन्म घ्यायला हवा होता असा मध्यमवर्गीय स्वप्नाळू विचार पण मनात डोकावून गेला असेल पण ही मिळालेली बंपर लॉटरी एकीकडे आणि रास्त भाव मिळाला नाही म्हणून रस्त्यावर टोमॅटो फेकणाऱ्या संतप्त शेतकऱ्यांच्या झुंडी दुसरीकडे…कुणावर विश्वास ठेवायचा ?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

4

)

  1. nageshdharne

    खूप छान, मुकुंदजी

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद नागेश सर 🙏🏼🙏🏼🙏🏼

      Like

  2. Rupali

    Kal katheen aahe. Vyapar petheteel vyapari gareeb hotana kahi disat nahi.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      अगदी बरोबर आहे. भाजी उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा भाजी मार्केटमधील दलाल श्रीमंत होताना दिसतात. यात काही प्रमाणात शेतकऱ्यांची देखील चूक आहे. ते शेतीमाल पिकवतात पण तो माल बाजारात विक्रीसाठी पाठवायला मध्यस्थ (दलाल) शोधतात. इथेच त्यांचे आर्थिक शोषण होत असते.

      Liked by 1 person