पावसाळा कुणाला आवडत नाही ? पहिला पाऊस अंगावर घ्यायला, उघडीप न देता संततधार पडणाऱ्या पावसात ऑफिसला दांडी मारून ‘एक उनाड दिवस’ साजरा करायला कुणाला बरं आवडणार नाही ? आजूबाजूच्या धुळीने मातकट झालेल्या इमारती पावसाने धुवून स्वच्छ झालेल्या नजरेत साठवून घेत रस्त्याच्या कडेला चहाच्या टपरीवर कोंडाळ्यात अर्धेअधिक अंग भिजवत ‘कट’वाला चाय पिण्याची मजा कुणाला नको असते ? नाक्यावर, चौकात आडोसा धरून मक्याची कणसे भाजून देणाऱ्या तेलकट-कळकट चेहऱ्याच्या मावशीबाई सोबत भर पावसात पैश्याची घासाघीस करत शेवटी स्वस्तात कणीस खाल्ल्याचा आनंद कुणाला नकोय ? हा सगळ्या प्रकारचा आनंद एकाच चक्करमध्ये उपभोगायची नामी संधी फक्त पावसाळ्यातच मिळू शकते. पुन्हा असा ‘उनाड दिवस’ उजाडायला वर्षभराची प्रतीक्षा करावी लागते. पण नेमकं अशावेळी रस्त्यावरून भरधाव वेगात जाणारी वाहने अगदी आपल्या जवळून अंगावर पाणी उडवत जात असतील तर…..!

स्वेच्छेने किंवा कुणाच्या तरी आग्रहामुळे अंगावर पाणी उडवून घेत ओलं व्हायला कुणाचीच ना नसते. आपल्याकडे तर धुळवड, रंगपंचमी सारखे सण आहेत. अगदी विझलेल्या (शांत केलेल्या) होळीची राख अंगाला फासत मातीत लोळवणारी ‘धुळवड’ देखील आपल्याला नकोशी वाटत नाही. त्यानंतर येणाऱ्या रंगपंचमीच्या दिवशी तर जवळचे ओले रंग संपल्यावर नुसतेच पाणी ओतणे किंवा डोक्यावर अंडी फोडण्याचा केला जाणारा ‘उच्छाद’ देखील कधी किळसवाणा वाटत नाही. कारण हे आपल्याला माहीत असते. निर्भेळ आनंद व्यक्त होण्यासाठी घडविलेला तो सार्वजनिक जल्लोष असतो. पण रस्त्यावरून तुम्ही तुमच्याच घाईत चालत निघाला असाल आणि अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्यावरील साचलेले पाणी उडवत तुम्हाला पार भिजवून टाकले….तुमच्या स्वच्छ, परिटघडीच्या ड्रेसवर मुक्तपणे घाणीची उधळण केली तर…..किती चरफडत असता त्यावेळी तुम्ही ? अन तो वाहनचालक मात्र आपल्याच मस्तीत पुढे निघून जात असतो….सांग माझ्या ढुंगणाला म्हणून…! माझी तर अशी सटकते ना..!! माझ्या सुसंस्कारित बोली भाषेने आजवरच्या आयुष्यात जेव्हढ्या काही सालंकृत ‘शिव्या’ शिकवल्या आहेत ना, त्या सगळ्या एका दमात किंवा त्यातली उच्चतम कोटीची एखादी अस्सल गावरान ‘शिवी’ हासडून मी माझा संताप व्यक्त करत असतो. बरं त्यापलीकडे जावून त्या क्षणाला आपण दुसरं काही करू देखील शकत नाही. अगदीच तुमच्याजवळ मोकळा वेळ असेल तर लगेच त्याचा दुसऱ्या वाहनांच्या मदतीने पाठलाग करून, त्याला गाठून त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार करू शकतो. खूपच राग अनावर झाला तर मुस्काटात भडकावीत एखादे अनप्लँड भांडण अंगावर घेवू शकतो. पण हे असं का होतंय..? याच्या मुळाशी जाण्याची संवेदनाच आपण हरवून बसलोय की काय ? असंच वाटत राहते. कारण अंगावर पाणी उडवत जाणे ही एक विकृती बनत चालली आहे. याला विरोध करण्यासाठी सर्वसंमतीचा सामूहिक विचार पुढे येणे खूप अत्यावश्यक झाले आहे.

असं म्हणतात की जगातील सगळ्या विकसनशील देशांमध्ये तुलनेत भारतातच सर्वातजास्त रस्त्यांची दुर्दशा झालेली दिसून येते. अलीकडच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजना, महामार्गाचे विस्तारीकरण, स्मार्टसिटी योजना, राज्यरस्त्यांची दुरुस्ती अशी कामे बऱ्याच ठिकाणी युद्धपातळीवर करत दळणवळण सुलभ आणि वेगवान करण्याचा स्तुत्य प्रयोग केला आहे. पण या बांधलेल्या नव्या रस्त्यांवर देखील पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण वाढलेलेच दिसत आहे. मुळात रस्ते बांधणी करतानाच खड्डे पडू नयेत याची काळजी घेत रस्त्यांचे बांधकाम करणे आवश्यक असते. यात कुठलंही रॉकेट सायन्स वापरण्याची गरज नसते. मात्र कंत्राटी कामातून मलिदा मिळविण्याच्या बोकाळलेल्या वृत्तीमुळेच रस्तेबांधणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असते. त्यातूनच खड्डे पडणे, रस्ते खचत जाणे या क्रिया घडतात. मग पावसाळ्यात पाणी साचते अन त्यातून दुसऱ्याच्या अंगावर पाणी उडविण्याच्या विकृतीला पोषक वातावरण निर्माण होते. ही विकृती आता सामाजिक आजार बनली आहे. यातून अनेक ठिकाणी उद्भवणाऱ्या वादातून हिंसक घटना देखील घडत असल्याचे आपण वाचतो-ऐकतो-पाहतो…..पण वर्षानुवर्षे या परिस्थितीत बदल काही घडत नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंगावर पाणी उडविण्याची ‘देशी’ मॅरेथॉन बेलाशक सुरूच राहणार आहे…! तूर्त इतकेच.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Girish Kulkarni उत्तर रद्द करा.