तब्येत उत्तम राहण्यासाठी तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी उपयोगात आणता…?

What strategies do you use to maintain your health and well-being?

आपल्या परिचयाचा व्यक्ती काही दिवसांच्या अंतराने भेटला किंवा एखादा दूरचा नातेवाईक जरी भेटला तर संवादाची सुरुवात ” कसे आहात ?” किंवा “काय म्हणते तब्येत” या सरळ वाटणाऱ्या गर्भित अर्थाच्या प्रश्नानेच होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर कदाचित आपणहून बोलायला सुरुवात करण्यासाठी मनात विषयाची जुळवाजुळव करायला काही वेळ तर नक्कीच लागतो. तोपर्यंत चौकशी म्हणूनच हा प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारायचा प्रघात असावा. शिवाय प्रकृतीची विचारपूस करीत जवळीकता सिद्ध करणे, हा देखील त्यामागचा हेतू असतो. मात्र हा सहज वाटणारा प्रश्न देखील वयाची पन्नाशी ओलांडलेल्या माणसाला खोचक किंवा बोचरा वाटू शकतो. कारण पन्नाशी नंतर किंवा साठीच्या उंबरठ्यावर तब्येतीची विचारपूस करणारे प्रश्न हे काळजी व्यक्त करणारे असेच वाटत असतात. कारण शरीराने देखील तोपर्यंत आपली व्याप्ती चांगलीच वाढवलेली असते. वजन आणि पोटाचे आकारमान नियंत्रणाबाहेर जायला सुरुवात झालेली असते. अर्थात तब्येतीची विचारपूस करणारा जर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणारा असेल तर मग मात्र असा प्रश्न आपल्याला ‘सिरीयस’ व्हायला भाग पाडत असतो. बरं तो फक्त प्रश्न विचारून थांबत नाही. तर एकामागून एक असे भराभर सूचना आणि सल्ल्यांचा भडीमार ‘तो’ सुरू करतो. मग मात्र आपल्याला अपराधाच्या जाणिवेने अस्वस्थ व्हायला लागतं.

मला कुठं काय धाड भरलीय… चांगला तंदुरुस्त आहे. अजूनही भरभर चालल्यावर किंवा जिना चढल्यावर धाप लागत नाही. तुम्ही उगीचच काळजी करताय…..समोरून आलेला चेंडू टप्पा खाल्यावर जसा स्पिन होऊन बॅटची कड उडालेला झेल अचूक टिपावा तसा उल्हास समोरच्याचा असतो….मग या पोटाच्या ‘वळकट्या’ काय म्हणतायत. झालं….येवून जावून कुठला विषय नाही मिळाला की मग वाढत्या पोटावर लेक्चर द्यायला मोकळे….हे अलीकडेच म्हणजे या दशकातच सुरू झालेले फॅड आहे. तरुण पोरांनी फिट राहणं एकवेळ समजू शकतो…. व्हायचं-जायचं असतं. शिवाय तरुणांना ‘ढेरी’ चांगली दिसतच नसते म्हणा…त्यामुळे त्यांनी जिम लावून ते सिक्स पॅक, एट पॅक करणं एकवेळ ठीक पण साठीकडे झुकणाऱ्या माणसाला तुम्ही झिरो फिगर करायला सांगणं म्हणजे यमदूताला ड्युटी सुरू होण्यापूर्वी झोपेतून उठवून आणण्यासारखेच आहे. अलीकडे मुदतीत पोटाची अतिरिक्त चरबी जाळणारे फंडे सारखे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या घरात आणि तुमच्या डोक्यात थैमान घालत असतात. चटकन विश्वास बसेल असे एकाच तोंडावळ्याचे दोन फोटो एक ढेरिवाला अन दुसरा ढेरिगायब…. पुढे फक्त महिनाभरात घडलेला अविश्वसनीय चमत्कार….अशा जाहिराती आपल्या ज्ञानकक्षा वाढवीत असतात. त्यातही भर म्हणजे कुणीतरी अपरिचित तुमच्या व्हॉट्सअप वर या संदर्भात सारख्या पोष्टी टाकत असतं… हा अनुभव तर फार ‘झिट’ आणणारा असतो. एकतर व्हॉट्सअप करणारा परिचित नसतो…त्याला आपला नंबर कुठून मिळाला ? बरं नंबर मिळाला तर मिळाला….त्याला नेमकी आपली वाढणारी ‘ढेरी’च का खुपली ? बरं त्या आगंतुकाला ब्लॉक जरी केलं तरी पुन्हा काही दिवसांनी नव्या नंबरने हा खेळ सुरूच होतो….मेहनतीने ..स्वकष्टाने कमावलेल्या ‘ढेरी’चे असे रोज धिंडवडे निघत असल्याने वाढते वजन आणि ढेरी पेक्षाही ही त्रासदायक गोष्ट रोज क्षणोक्षणी ‘तब्येती’चा मुक्त विकास करणाऱ्या समस्त ढेरपोट्या जमातीबरोबर घडत असते.

महानगरातील दगदगीचं जीवनमान सोडलं तर भारतात इतर मध्यमवर्गीय शहरातून एकप्रकारचा ‘निवांतपणा’ मिळत असतो….अशा शहरांची सकाळ देखील सूर्य चांगला कासराभर वर सरकल्यावरच होते. आम्ही सोलापूरकर तर याबाबतीत खूप भाग्यवान आहोत. इथं तुम्ही कुणालाही “कसा आहेस ?” म्हणून विचारलात तर एकाच पठडीतील उत्तर मिळेल….निवांत आहे. आता अशा शहरातून ‘ढेरपोटे’ क्लब असायला हवेत ना..! पण नाही….इथे आमच्यासारखे अल्पसंख्य ‘ढेरपोटे’ जीव मुठीत धरून पोट खपाटीला गेलेल्या वाळल्या-सुकड्या जमातीचा हा अन्याय रोज सहन करत असतो. लोकशाहीत संख्येला महत्व असते… आम्ही संख्येने त्यांच्यापेक्षा कमी आहोत. बरं सरकारने आम्हां अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायला हवे….पण सरकारही आमच्याकडे साफ दुर्लक्ष करते. त्यांना फक्त पाच वर्षातून एकदा आमच्याकडून ‘मत’ हवे असते. हीच आमची व्यथा आणि चिंता आहे. ‘चिंता से घटे चतुराई’ असं म्हणतात. पण खरं म्हणजे ‘चिंता से बढे गोलाई’ असं म्हणायला पाहिजे. सरकार आम्हाला विचारत नाही ह्या चिंतेपोटीच देशात ढेरीबाजांची संख्या वाढत आहे असं म्हणालास वावगं ठरणार नाही. मोदीजी हमारे लिए कुछ तो करो…! आता सांगा ढेरीबाज असणे आणि सुदृढ राहणे यात फरक असतो की नाही? तुम्हाला तुमच्या शर्टाबाहेर डोकावू पाहणाऱ्या ‘नवजात’ ढेरीची शपथ आहे…..देशाला खरं तेच सांगा…नाहीतर राहुलची पदयात्रा वाया जाईल…. जरा तरी खरं बोला…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

4

)

  1. gosavimanik123

    Reblogged this on Site Title and commented:
    खुप छान सर 👍

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद माणिक 🙏🙏

      Like

  2. Nilkanth Watte

    खुपच छान 👌

    Like