तुमच्या ‘यशा’चे सूत्र तुमचा जनसंपर्क

How would you describe yourself to someone?

आजच्या तरुणाई समोर एकच ‘लक्ष्य’ ठेवण्यात आले आहे… ते म्हणजे ‘यश’ मिळविणे. यशस्वी होण्यासाठी जी मुलसूत्रं आचरणात आणावी लागतात त्यासाठी चक्क ‘कोर्सेस’ उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात असे कोर्स केल्याने मूलसूत्रांची ‘ओळख’ करून घेतलेला तरुण आयुष्यात यशस्वी होतोच असे नाही. जगाशी संपर्क साधण्यासाठी पायाभूत शिक्षण हे जरी महत्वाचे असले तरी विद्यापीठाच्या मिळवलेल्या पदव्या म्हणजेच आयुष्याची ‘यशस्विता’ असे मात्र नाही. तसे असते तर जी लौकिकार्थाने जगात आज यशस्वी माणसे दिसत आहेत ती सर्वच त्यांच्या क्षेत्रात विद्यापीठाच्या उच्च पदव्या घेतलेले दिसले असते. अगदी प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण करीत शैक्षणिक प्रवासालाच कायमचा रामराम ठोकलेले अनेकजण आज त्यांच्या क्षेत्रात मैलाचा दगड (माईल स्टोन) ठरले आहेत. पुस्तकी जगातील विद्यापीठ हे ज्ञान मिळविण्याचे एक केंद्र असले तरी मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगाशी केला जाणारा मुक्त व्यवहार हेच सर्वात मोठे प्रभावशाली केंद्र आहे. इथे तुम्ही जगाशी संपर्क साधून आपली योग्यता सिद्ध करू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतःची अशी खास ओळख सांगता आली पाहिजे…..मी कोण ? हा प्रश्न खऱ्या अर्थाने इथेच निर्माण होतो. वेदशास्त्रात “अहं ब्रह्मास्मि” या अवस्थेचा खूप व्यापक अर्थ सांगितला आहे. अर्थात ‘मीच प्रत्यक्ष ईश्वर’ ही दर्पोक्ती इथे अजिबात अपेक्षित नाही. तर मी एक कुशल कार्मिक आहे. जो आपल्या उपयोगी ठरू शकतो, हीच भावना, अभिनिवेश आपल्याला लोकांमध्ये मिसळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

अर्धवट शिक्षण ही फक्त भारताची समस्या नाही. अप्रगत, प्रगतीच्या मार्गावर असलेले आणि पूर्ण प्रगत म्हणून घोषित झालेल्या सर्व राष्ट्रांमधून अर्धवट शिक्षण ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण केलेली दिसत आहे. मग अशा राष्ट्रांचा प्रगतीचा वेग मंदावलेला दिसतो तो फक्त त्याच कारणाने हे जर खरं कारण असेल तर मग जगाच्या बाजारात शैक्षणिक पदव्यांचे उत्पादने उत्पादित करणारे ‘विद्यापीठ’ नावाचे उद्योगच सगळीकडे दिसले असते. यातला गमतीचा भाग म्हणजे सध्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेत जी अभ्यासक्रमे आहेत. त्यात संशोधन करून अनेक बदल घडविणारे अनेक संशोधक हे लौकिक अर्थाने अर्धशिक्षित होते. आज त्यांचाच जीवनपट अभ्यासून आपण पीएचडी मिळवतो. सांगायचा मुद्दा हा आहे की, जगाच्या व्यवहारात तुम्हाला स्वतःला मांडण्यासाठी क्रमिक अभ्यासक्रमाचे शिक्षण ही एक ओळख आहे. पण हे पूर्णत्व नाही. शेवटी तुमच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला तुमच्याकडून त्यांच्या उपयोगी पडणारे ‘कौशल्य’ हवे असते. त्यामुळे आपल्याजवळ इतरांसाठी ‘दि बेस्ट’ असे काय आहे ? याची तुम्ही माहिती आत्मविश्वासाने देणे हीच तुमची ओळख असते. एकदा का ही ओळख सांगण्याची कला, शैली तुम्ही आत्मसात केलीत की तुमचा जनसंपर्क अर्थात पब्लिक रिलेशन (पी.आर.) वाढायला सुरू होतो. जगाच्या बाजारपेठेत वाढणारा जनसंपर्क हाच तुम्हाला ‘यशस्वी’ बनवत असतो. त्यासाठी तुम्हाला अविश्रांत मेहनत, कल्पकता, विश्वास आणि दुर्दम्य आत्मविश्वासाची गरज असते. जे सर्व घटक तुम्हीच तुमच्यामध्ये निर्माण करायचे असतात. हल्ली आपण सकारात्मकता (पॉझिटिव्हीटी) बद्दल फार बोलतो. हा प्रॉडक्ट कुठल्या कारखान्यात तयार होत नसतो. तर तो एकमेकांच्या संपर्कात आल्यावर तयार होणारी ती ‘ऊर्जा’ असते. अर्थात अशाप्रकारच्या सर्वसमावेशक अश्या उर्जेलाच आपण पॉझिटिव्हीटीचा दर्जा देत असतो. एकमेकांच्या संपर्कात येवून तयार होणाऱ्या ऊर्जेचा फायदा जर मोजक्या लोकांना होणार असेल त्याचबरोबर नुकसान मात्र त्यापेक्षा जास्त लोकांचे होणार असेल तर अशा उर्जेला आपण नकारात्मकता (निगेटिव्हीटी) असं समजायला हरकत नाही. तर अशी निगेटिव्हीटी निर्माण करणारे देखील अलीकडे ‘यशस्वी’ होताना दिसतात. पण आयुष्याची सार्थकता त्यांच्या नशिबी येत नसते. म्हणूनच जग अश्या लोकांना आपला ‘यशस्वी’ आदर्श म्हणून स्वीकारत नसते. तेंव्हा तुमचे लौकिक अर्थाने किती शिक्षण झाले आहे यापेक्षाही तुमची आवड असणाऱ्या क्षेत्रात तुम्ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत किती जनसंपर्क वाढवता यावरच तुमची ‘यशस्विता’ आणि जीवनाची ‘सार्थकता’ अवलंबून आहे. तेंव्हा सर्वप्रथम इतरांसमोर तुम्हाला तुमची ओळख सांगता यायला हवी…..यशाच्या मार्गावरचे हेच पहिले पाऊल आहे…!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to jnzende उत्तर रद्द करा.

Comments (

3

)

  1. gosavimanik123

    👍

    Liked by 1 person

  2. rituved

    👍

    Liked by 1 person

  3. jnzende

    👍

    Liked by 1 person