Was today typical?
भारतीय लोकांची एक साधारण मानसिकता आहे. सेकंदागणिक त्यांना सतत काहीतरी अतर्क्य, अदभूत, रोमांचकारी किंवा अगदीच भीषण थरार घडवून आणणाऱ्या घटना घडाव्यात असे वाटत असते. दिवस उजाडतानाच सर्व ईप्सित सुखे एखाद्या अज्ञात शक्तीद्वारे आपल्या पायाशी लोळण घ्यावीत मात्र इतरांच्या सुखावर ‘वरवंटा’ फिरवा अशी मनोकामना करीतच दिवस सुरू होत असतो. बहुदा याच मानसिकतेचा अभ्यास करून वर्तमानपत्रांनी ‘आजचे भविष्य’ या कॉलमचे नियोजन केले असावे. भविष्यावर, ज्योतिष शास्त्रावर माझा विश्वास नाही हे ठासून सांगणारा माणूस भल्या पहाटे उठून दारात पडलेल्या वर्तमानपत्राची घडी उकलतो तेच आतील पानावर छापलेले आजचे राशिभविष्य नजरेखालून घालण्यासाठीच. मग भलेही आठ दिवसांपूर्वीचे राशिभविष्य नजरचुकीने पुनर्मुद्रित (रिपीट) झाले असले तरी देखील तो बारकाईने वाचून काढतो. आठ दिवसांपूर्वी आपण असेच भविष्य वाचले होते. मात्र त्यादिवशी कथनाप्रमाणे काहीच घडले नव्हते. कदाचित आज घडेल या आशेने तो पुन्हा वाचतो. तर ज्यांचा सूर्योदय आशादायी भविष्य कथनाने होतो अन सूर्यास्त उद्याची आशादायी चाहूल देवून जातो अशा देशात ‘आजचा दिवस कसा होता ?’ या प्रश्नाला देखील आशादायी उत्तरच अपेक्षित असते.

जशी माध्यमे क्षणाक्षणाची उत्कंठा वाढीला लावणाऱ्या सनसनाटी बातम्या आणि स्पेशल रिपोर्ट्स वाचक-दर्शकांसमोर आणण्यासाठी आतुर होवून दिवसभर तोंडाला फेस येईल अशी घाई करीत असतात. त्याचप्रमाणे इथले राजकीय क्षेत्रदेखील विकासाच्या राजकारणापेक्षा सनसनाटी निर्माण करणाऱ्या घटना घडवून आणण्यात मश्गुल असते. दरड कोसळणे, रेल्वे अपघात, रस्ते अपघात, घातपाती कृत्ये यांचा भडीमार संपला की मग अतर्क्य चालींच्या तोडफोडीच्या राजकारणाला सुरुवात होते. एकूणच आजचा दिवस टिपिकल गेला असं उत्तर या देशवासियांना पचनी पडणारे नाही हे राजकारण्यांना माहीत आहे. ते तरी बिचारे काय करणार ? विकासकामे तर त्यांना करायची नसतात. मग आपल्याला मत देणाऱ्या मतदाराचे मनोरंजन कसे केले जावू शकते याच फिकरीत ते आणि त्यांचे बगलबच्चे असतात. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप, गटबाजी, पक्ष फोडणे, सरकार कोसळवून नवे सरकार सत्तेवर आणणे असे हाय व्होल्टेज ड्रामा खेळून आजचा दिवस अतिशय हॉट आणि स्पेशल होता तर उद्याचे भविष्य आणखी हायव्होल्टेज असल्याची खात्री देणारे राजकारण दिवस मावळे पर्यंत सुरू असते. तरीही रात्री झोपताना दिवसभराची उजळणी करीत आम्ही आमच्या मनाला विचारतच असतो…..आजचा दिवस सामान्य होता का…?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to rituved उत्तर रद्द करा.