तुज ठायी ज्याची प्रीती । त्याची घडावी संगती ।।

Describe one habit that brings you joy.

तुम्हाला आनंद देणारी तुमची एक सवय सांगा ? असा प्रश्न कुणी विचारला तर क्षणभर आपण कावरेबावरे होवून जातो. एकतर मुळात आपल्या वाट्याला जे जगणं आलंय त्याचा आनंद कसा घ्यायचा ? हेच मुळात आपल्याला समजलं नसेल तर मग आपण आपल्या आनंद देणाऱ्या एखाद्या सवयीबद्दल कसे बोलणार ? आपण त्याच्याबद्दल कधी विचारच केलेला नसतो. उठसूट रडतराऊ सारखं कुठल्याही कारणावरून रडत-भेकत जगण्याची सवयच लागलेली असते. होय,त्याला सवयच म्हणतात. म्हणजे तुमच्यावर गुदरलेला एखादा प्रसंग किंवा घटना वेदनादायी नाही असं त्या क्षणाला कोणीच म्हणणार नाही. पण घडून गेलेल्या ‘त्या’ क्षणाची पुन्हा-पुन्हा उजळणी करीत बसणं ही जी आपली मानसिकता बनते ना ! तिलाच ‘सवय’ असं म्हणतात. तर ही सवयच अलीकडच्या काळात खूप वाढताना दिसत आहे. पण ह्या लागू पाहणाऱ्या ‘सवयी’ला जो चार हात दूर ठेवतो, तो मात्र रोज जगण्यातला ‘आनंद’ उपभोगत असतो. अशा माणसाकडे ‘आनंदी’क्षणांची खाणच असते. त्याला जर तुम्ही एक आनंदाचा क्षण विचारला तर तो तुम्हाला आनंदाची एक रंगबिरंगी सफरच घडवून आणेल. बरं…. आयुष्यात आनंद शोधावा लागतो का…? तर या प्रश्नाचं खरं खरं उत्तर ज्यांच्या संवेदनाच बोथट झाल्यात अश्यांसाठी आनंद ही एक ‘शोध’ प्रक्रियाच आहे. आपल्या धर्मसंस्कार आणि मातृ-पितृ संस्कारातून देखील आपल्या ‘आनंद’ शोधण्याचे संस्कार केले जातात. पण संवेदना-जाणीवाच बोथट झाली असेल तर ह्या झालेल्या संस्कारांचा काहीच उपयोग होत नाही. मग अशा बोथट माणसाला आनंदाची जाणीव करून देणारे ‘बूस्टर डोस’ वरचेवर पाजावे लागतात. अशा ‘डोस’ पाजणाऱ्या व्यक्तीला हीच संवेदनारहीत बोथट माणसे ‘गुरू’ म्हणतात. तर अर्ध्याहून अधिक जीवन जगल्यानंतर आनंदाच्या शोधात अध्यात्मिक ‘गुरू’ करण्यासाठी ठिकठिकाणी आश्रमातून, मठातून गुरुबंधन (गंडा) बांधून घेण्यासाठी लागलेल्या ‘रांगा’ आपल्याला दिसत असतात. आयुष्यात अचानक आलेल्या एकाकीपणातून रिकाम्या-फावल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून देखील सोवळ्या ओवळ्यातील धर्माचारण करणारे देखील शेवटी आत्मसंतुष्टीसाठीच ही सर्व उठाठेव करीत असतात.

माणसाला आपल्या आयुष्यातील संचित आनंदसाठ्याची मुक्त उधळण करण्यासाठीच प्रत्येक धर्माच्या धर्मआचार संहितेमध्ये सणांची निर्मिती केली आहे. हिंदू धर्मात तर वर्षाच्या बाराही महिन्यात, प्रत्येक पंधरवड्यात एका धार्मिक उत्सवाचे-सणाचे आयोजन केले आहे. शेवटी सण म्हणजे तरी काय..? आनंदाचे सार्वत्रिक उत्सवी प्रकटीकरण. आणि अशा सणांचे प्रकटीकरण सांगणारी शुचिर्भूत संहिता म्हणजेच धर्म…..व्यक्तिगत म्हणाल तर माझ्या आकालनशक्तीनुसार माणसाच्या जगण्याला शुद्ध-सात्विक आचार-विचारांची शिकवण देणारी आनंद-संहिता म्हणजेच धर्म. एकदा का ही व्याख्या तुमच्या मनात ठसली की मग धर्माचे अवडंबर दूर होते आणि जीवनातील सार्वजनिक स्वरूपातील आनंदाचे क्षण उधळायला आणि उधळल्या गेलेल्या आनंदी क्षणांना फिरून टिपायला आपण सज्ज राहतो. ख्रिश्चन धर्मियांचा ‘नाताळ’ सण असेल, मुस्लिम धर्मियांची ‘रमजान ईद’ असेल किंवा हिंदू धर्मियांची गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असेल हे सर्व सण आनंदाचे सार्वजनिक प्रकटीकरण करणारे उत्सवी दिवस आहेत. या उत्सवातून आनंदाची लयलूट करीतच आपण पुढे वर्षभर ताजेतवाने रहात असतो.

गणेशोत्सवाबद्दल तर माझ्यासारखीच सर्वांची मते असणार यात शंकाच नाही. गणपती बाप्पा म्हणजे ओंकार स्वरूप, आरंभनायक, विद्येची-कलेची देवता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदाची पखरण करणारी वरद देवता. आनंदी क्षणांची निर्मितीचे मूळच गणरायाच्या उपासनेत आहे. अशा जीवनभर आनंद व्यापणाऱ्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली की मन उल्हासित होत नाही असा भारतीय शोधून सापडणार नाही. माझा तर व्यक्तिगत असा अनुभव आहे की, गणरायाला फक्त हिंदू धर्मीयच नाही तर इतर धर्मीय देखील मनापासून पूजतात. इस्लामिक देश असुद्यात नाहीतर यहुदी, ख्रिश्चन धर्मियांचे देश असुद्यात अलीकडे भारतातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आकर्षण सर्वांनाच आहे. व्हाईट हाऊसमध्ये देखील गणेशोत्सव साजरा केला गेला यातच सर्वकाही आले. त्यामुळेच माझ्याप्रमाणेच सर्वच गणेशभक्त गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात चक्क दिवस मोजत असतात. यंदा गणराया १९ सप्टेंबरला येतायत. गणरायाची मूर्ती काम करणाऱ्या मूर्तीकारांनी मूर्ती बनविण्याचे काम केंव्हाच सुरू केले आहे. आजकाल कोणत्याही धार्मिक सणाला बाजारातल्या ‘अर्थकारणा’शी जोडल्या जात असल्याने सणापासून मिळणाऱ्या ‘आत्मिक’आनंदापेक्षा झगमगाट वाढला आहे हे जरी खरं असलं तरी त्याचं पावित्र्य कमी होवू नये यासाठी ‘श्रद्धाळू’ कायम तत्पर असतात. श्रीगणरायाची आराधना हीच आनंदाच्या पर्वणीची सुरुवात असते. वर्षातल्या आनंदपर्वाला इथूनच खरी सुरुवात होते. माझ्या या मताशी सर्वजण सहमत होतील. त्यामुळे कुणी जर मला विचारले की, Describe one habit that brings you joy तर मी त्याला सांगेन की दरवर्षीच गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणे ही कृतीच मला आनंदाचा ठेवा देते…बाकी जल्लोष गणेशोत्सवात….गणपती बाप्पा मोरया..!!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

यावर आपले मत नोंदवा

Comments (

5

)

  1. gosavimanik123

    🙏🙏” गणपती बाप्पा मोरया ” 💐💐

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      बाप्पा मोरया 🙏🙏

      Like

      1. Avinash Hingne

        मस्त

        Liked by 1 person

      2. मुकुंद हिंगणे

        धन्यवाद अवि 🙏🙏

        Like

  2. jnzende

    छान

    Liked by 1 person