मंदिरे हवीत की ज्ञानमंदिरे…?

ज्या देशातील शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थांचे पेव फुटलेले असेल आणि देवळातील दानपेट्या ओसंडून वाहत असतील अशा देशाचे भवितव्य काय असेल ? या माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. पण ते राजकीय अभ्यासक, नेता, कार्यकर्ता अथवा समर्थकाकडून नकोय. किंवा शासकीय सुविधा लाटलेल्या शिक्षण महर्षी अथवा शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी वर्गाकडून देखील अपेक्षित नाही. कारण ही सर्व मंडळी एकाच विचाराचा अनुनय करीत प्रवाहाच्या दिशेने पोहणारे जलतरण पटू असतात. यांच्याकडून मला खरे उत्तर कधीच मिळणार नाही याची मला खात्री आहे. जोपर्यंत विरोधाभासाची स्थिती नष्ट झालेली नसते तोपर्यंत देश विकासाबाबत संक्रमणावस्थेतून जात असतो अशीच आपण आपली समजूत करून घ्यावी लागते. आता ही संक्रमणावस्था किती वर्षे कायम राहणार ? याची उत्तरे सर्वसामान्य माणसांच्या बौद्धिक आकलन क्षमतेच्या बाहेरची असतात. असाच शासकीय यंत्रणांचा समज असल्याने या प्रश्नाला अगदी तुम्ही माहितीच्या अधिकाराचा वापर करून देखील तुम्हाला छापील उत्तरच मिळेल. म्हणूनच सुरुवातीला स्पष्ट केलं की या प्रश्नाचं उत्तर या वर्गाकडून मला अपेक्षित नाही. मग हे उत्तर द्यायचं कुणी .? सर्वसामान्यांनी…! त्यांना तर मतदानाशिवाय कुणीच काडीचीही किंमत देत नाही. काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला ज्यांच्याकडून अपेक्षित असतात ते पात्र नसतात. तर पात्र लोकांकडून मिळालेली उत्तरे आपले समाधान करू शकत नाही. मग अशा अवस्थेला ‘भ्रमित’ अवस्था म्हणायचे का ? मग हा देशच भ्रमितावस्थेत आहे असं समजायला हरकत नसावी. कारण इथे अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अपेक्षित वर्गाकडे नाहीत.

सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, मी आचार्य रजनीश किंवा ओशो यांचा निस्सीम भक्त किंवा अनुयायी नाही. त्यामुळे त्यांचे सर्वच विचार शिरोधार्ह मानणारा मी त्यांचा पाईक नक्कीच नाही. ते एक तत्त्वचिंतक आहेत एव्हढीच ओळख माझ्यासाठी आजवर पुरेशी ठरलेली आहे. पौगंडावस्थेत ‘संभोगापासून समाधीकडे’ हे त्यांचे मराठी भाषेत अनुवादित केलेले पुस्तक एका रात्रीत चोरून वाचण्याचे ‘पापकर्म’ मी ८० च्या दशकात केले आहे. केवळ माझा आवडता नट विनोद खन्ना या माणसाच्या का नादी लागला ? हे शोधण्यासाठी मी तो खटाटोप केला होता. एव्हढीच आचार्य रजनीश यांच्याबद्दल मला माहिती आहे. पण आज एका फेसबुक फ्रेंडने त्यांचे ‘कोट’ असलेली पोस्ट व्हायरल केली, ती माझ्या वाचनात आली. त्या कोटमध्ये रजनीश म्हणतात,’ ज्या देशातील शाळांची छपरे गळकी आहेत आणि मंदिरावर सुवर्ण कळस आहे, अशा देशांचा विकास होणे अवघड आहे’. या वाक्यांनी मला केंद्रित केलंय. खरंच आहे की, आता हे वाक्य ओशो रजनीश आपल्या प्रवचनात कधी बोलले ? त्यावेळी भारतातील शाळांची दैनावस्था होती, आता ती आहे का ? की उगीचच लक्ष वेधून घेण्यासाठी ही वाक्ये त्यांच्या तोंडी घातली असावीत. मला आत्ता पडणारी प्रश्ने काही अंशी का होईना पण ओशोंनी बोलून दाखविलेल्या विचारांना समांतर जाणारी अशीच वाटली म्हणून हा संदर्भ मांडावा वाटला.

आता हा दुसरा नेहमीच वाचनात येणारा संदर्भ…. ब्रिटिश इतिहासकार, लेखक आणि राजकारणी असलेल्या थॉमस बाबींग्टन मेकॉले यांचा. भारतीय संस्कृती आणि परंपरा यामधून विकसित झालेले भारतीय शिक्षण मोडीत काढले तरच ब्रिटिश या देशावर राज्य करू शकतील अशा आशयाचे भाषण ह्या थॉमस मेकॉले यांनी २ फेब्रुवारी १८३५ मध्ये ब्रिटिश असेंम्बलीत केले होते. ही पोस्ट मी जेव्हापासून सोशल मीडियावर कार्यान्वित झालोय तेंव्हापासून ही पोस्ट मी कुठल्या न कुठल्या प्रसंगी व्हायरल झालेली वाचली आहे. ह्या महाशयांनी आपली प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती मोडून आपल्याला गुलाम बनविणारी ब्रिटिशांची शिक्षण पद्धती लादली हे उघड करणारी ही पोस्ट आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीचा विषय जेंव्हा जेंव्हा ऐरणीवर येतो तेंव्हा तेंव्हा ह्या थॉमस मेकॉले नावाच्या माणसाला आपण भारतीय तोंड भरून शिव्यांची लाखोली वहात असतो. ह्या पोस्टचा आणि मेकॉलेचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून फक्त एव्हढ्यासाठीच होताना दिसतो….बिचारा मेकॉले थडग्यातून बाहेर येवू शकला असता तर मृत्यूनंतरही त्याला अशाप्रकारे स्मरणात ठेवणारे भारतीय पाहून अचंबित झाला असता.

स्वातंत्र्यानंतर ७०-७५ वर्षानंतर काय चित्र दिसतंय तर मुघलकाळात अतिक्रमित झालेल्या हिंदुधर्मीयांच्या मंदिरांचे शुद्धीकरण करीत पुनर्निर्माण करण्यासाठी ‘सत्तांतर, दंगली’ घडतायत. थॉमस मेकॉलेला पार ‘कोलून’ आम्ही खासगी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. छाती दडपून जाईल अशा शिक्षणसंस्थांच्या भव्य इमारती उभारल्यात. एखाद्या चक्रवर्ती सम्राटाचा राजमहाल देखील झक मारेल अशा इमारतीमधून आम्ही जगाची भाषा शिकवायला सुरुवात केलीय. तर दुसरीकडे ‘मंदिर वही बनाएंगे’चा नारा देत ‘सत्तांतरे’ घडवून आणलीत. मग आता मेकॉलेच्या म्हणण्यानुसार आम्ही शिक्षणपद्धती स्वीकारली असताना ओशो रजनीशांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शाळांची छपरे गळकी ठेवत नाही. फक्त तिथे आर्थिक लायकी असणाऱ्यांनाच विद्या दानाचे पवित्र कार्य घडवून आणतोय. आम्ही हे करत असताना मंदिरांना देखील सुवर्ण कळस चढवीत असू तर आम्ही विकासाच्या वाटेवर नाहीत असं कसं म्हणता येईल. गुरुकुल पद्धतीत देखील चातुर्वण्य व्यवस्थेनुसारच शिक्षण दिले जात होते. आता ती व्यवस्था मोडीत निघाल्यावर आम्ही ऐपत नसणाऱ्या दरिद्री लोकांना शिक्षण देणार नसू म्हणून आम्ही दोषी कसे ? मुळात आम्ही ज्ञानमंदिरे उघडीच ठेवलीत…..ज्यांची ज्ञानामृत प्राशन करण्याची ताकद आहे त्यांनी या मंदिरात प्रवेश करावा….अगदीच नादारीचा विषय नको म्हणून काही आरक्षणे दिलीत की सरकारी शिक्षण व्यवस्थेत…मग आता उलट्या बोंबा कश्याच्या…? हाच सिम्पल सवाल हाय माय लॉर्ड..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

4

)

  1. jnzende

    👍👍

    Like

  2. gosavimanik123

    “ज्या देशाच्या शाळांची छपर गळकी आहेत व
    मंदिरांवर सुवर्ण कळस आहेत त्या देशाचा विकास
    होणे अवघड आहे ” 🙏🙏

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      धन्यवाद माणिक 🙏🙏

      Like

  3. kulkarnisubhash5110

    मंदिरेच ज्ञान मंदिर हवीत….

    Like