निरर्थक वाटणाऱ्या ‘अर्थ’पूर्ण घटनांची एक निष्फळ कथा..!

Scour the news for an entirely uninteresting story. Consider how it connects to your life.

वृत्तपत्र माध्यमात काम करीत असल्याने ‘टेबल स्टोरी’ प्रकाराला किती महत्व असते ! याची जाणीव माझ्यासारख्या बोरूबहाद्दराला तेव्हढी परिपक्वता आल्यावरच कळते. बऱ्याचवेळा आम्हा पत्रकारांना दिवसभर भटकूनसुद्धा ‘बातमी’लायक घटना दृष्टीक्षेपात येत नाहीत. अश्यावेळी बातमी मूल्य कमी असणाऱ्या घटनांचा धांडोळा घेत एखादी टेबल स्टोरी बनविण्याकडे आमचा कल असतो. शेवटी रोज लोकांना ‘चमचमीत’ बातमी पुरवू याची थोडीच शाश्वती असते. पण नोकरीच करतोय म्हणून रोजची बुंदी तर पाडलीच पाहिजे….आचाऱ्या सारखी ! पण काही वेळा अशा वरकरणी निरर्थक वाटणाऱ्या अर्थपूर्ण घटनांची देखील एक निष्फळ स्टोरी तयार होते. वाचकांचं माहीत नाही पण स्वतःलाच आतून हलवून सोडते. त्या घटना, त्यातील पात्र आपल्याला खूप जवळची वाटू लागतात. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडायचा प्रयत्न केलात तर तयार होईल एक अर्थपूर्ण घटनांची ‘निष्फळ’ स्टोरी…!!

सोलापूरच्या होटगी रोड औद्योगिक वसाहतीत सर्व प्रमुख वृत्तपत्रांची मुख्यालये आहेत. ९४-९५ सालची गोष्ट आहे. त्यावेळी ह्या होटगीरोड हमरस्त्याच्या कडेला एक झोपडीत चहा कॅन्टीन होते. शंकरप्पा नावाचा ७५ वयाचा वृद्ध आणि त्याची पत्नी असे दोघेच हे कॅन्टीन चालवायचे. कॅन्टीन अगदी मध्यरात्री पर्यंत सुरू असल्याचे. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार आणि मुख्यत्वेकरून चार वृत्तपत्रांचे कर्मचारी हे शंकरप्पाचे गिऱ्हाईक. आम्हाला रात्री २ वाजता देखील चहा प्यायची सवय लागली ती या शंकरप्पा मुळेच. अतिशय निर्विकार पण तापट वृत्तीचा शंकरप्पा मध्यरात्रीसुद्धा सुट्या पैशावरून वाद घालायला सज्ज असायचा. त्याला गिऱ्हाईकांच्या गप्पांशी घेणेदेणे नसायचे. स्वतःबद्दल देखील कुणाजवळ बोलत नसायचा. त्याला मुलबाळ आहेत की नाही ? याची कधीच माहिती मिळाली नाही. वृद्धावस्थेत हे जोडपे रस्त्याच्या कडेला धोकादायक जागेवर झोपडी टाकून राहतात आणि उदरनिर्वाहासाठी कॅन्टीन चालवतात याचंच आम्हाला अप्रूप वाटायचं. तर ह्या शंकरप्पाची एक इच्छा होती….पेपरमध्ये फोटो छापून येण्याची. गंमतीने आम्ही त्याला आश्वासन पण द्यायचो. पण कधी जमलंच नाही….पुढे रस्त्याच्या विस्तारीकरणात ती झोपडी कधीतरी अतिक्रमण हटाव मोहिमेत काढण्यात आली. पुढे शंकरप्पा आणि त्यांच्या पत्नीचे काय झाले ? याची माहिती नाही मिळाली. अजूनही त्या रस्त्यावरून जाताना झोपडी नसलेला तो फुटपाथ रात्री अधिक भेसूर वाटतो. पायाला प्लॅस्टिक बांधून खुरडत चालणारा धिप्पाड देहाचा शंकरप्पा कंदिलाच्या प्रकाशात चहासाठी येणाऱ्या गिऱ्हाईकांची वाट पहात असल्याचा भास होतो.

रविवारी स्टोरी लिखाणाची संधी मिळायची. त्यासाठी आठवडाभर अगोदरच जमवाजमव करून लिखाण करून चारदा तपासून अंतिम मंजुरीसाठी संपादकांच्या टेबलावर ठेवावे लागायचं. मग त्याला मंजुरी मिळाली की मग प्रसिद्धी क्रम ठरायचा. असंच कधीतरी स्टोरीसाठी मी हा रस्त्याच्या कडेला काम करीत असलेल्या लोहार कुटुंबाचा फोटो काढला. पण ही स्टोरी मी कधीच प्रसिद्ध करू शकलो नाही. कारण असं काहीच नव्हतं. एकतर अंगीभूत असलेला आळशीपणा नडला किंवा लिहिलेल्या स्टोरीतील कंटेंट दमदार नसल्याने संपादकांनी स्टोरी नाकारली असावी. नक्की कारण नाही सांगता येत, पण त्या कुटुंबाला फोटो प्रसिद्ध करण्याचं आश्वासन देवून फसविल्याचा अपराधीपणा आजही वाटतो. अर्थात हा अपराध रोजच आमच्या हातून घडतो. मात्र प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांच्या बद्दल काही वाटत नाही. ज्यांची अपेक्षा नसते पण तुम्ही त्यांना स्वप्न दाखविता अशा भाबड्या लोकांचा हिरमोड करणे हा अपराधच असतो. त्याची खंत मात्र वाटत राहते. हल्ली हा फोटो मी संधी मिळेल तेंव्हा सोशल मीडियावर व्हायरल करीत असतो. दुधाची तहान ताकावर भागविण्याचा प्रकार…दुसरं काय !

एकदा सुट्टे पैसे हवे होते म्हणून मंदिरा समोर बाकड्यावर बसलेल्या एका वयस्कर माणसाला विचारणा केली तर त्याने खिशातून चक्क शंभर रुपयांची चिल्लर काढली. त्याच्या कपड्यावरून तो भिकारी तर नक्कीच वाटत नव्हता. विमनस्क अवस्थेत दिसत होता. पण मंदिराच्या दारात पैसे मागणाऱ्या भिकाऱ्यामधला नक्कीच नव्हता. मग ‘त्या’ रांगेत तो काय करत होता…? त्याच्या घरचे कुणी नाहीत का ? मी चिल्लरची विचारणा केली तर लगेच बाकड्यावर बसून पँटच्या दोन्ही खिशातून चिल्लर बाहेर काढून मोजून द्यायला त्याने सुरुवात केली. काही माणसं ‘उत्तर’ म्हणून सापडतात आणि ‘प्रश्न’ बनून कायमची मनात रुतून बसतात. तो कोण ? कुठला ? काहीच माहिती नाही. मंदिराच्या भोवती अलीकडे दर्शन घेणाऱ्या वृध्दांपेक्षा ‘पैसे’ मागणाऱ्या वृध्दांची अधिक गर्दी असते. मन सुन्न करणारी व्यथा असली तरी अजून तरी कुणी त्याची स्टोरी केलेली नाही. कदाचित कंटेंट मध्ये फारसा ‘दम’ नसेल..तूर्त एव्हढंच..!

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to gargisolapur उत्तर रद्द करा.

Comments (

7

)

  1. gargisolapur

    शंकरप्पा ला मी पण चांगला ओळखत होतो , लक्ष्मी foundry त कामाला असताना त्या झोपडीत आमचा पण अड्डा बसायचा

    Liked by 1 person

  2. kulkarnisubhash5110

    Best content…

    Liked by 1 person

  3. rituved

    छान

    Liked by 1 person

  4. Randhir Abhyankar

    मस्त!!! पण काहीतरी वेगळंच वाचतो आहे, असं सारखं वाटत होतं….काहीतरी शोधण्याचा प्रयत्नात आहे……

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      विस्मरणात जाणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा घेतलेला धांडोळा…दुसरं काय !

      Liked by 1 person

  5. Rupali

    Chhan watale likhan. Ek series suru kara. Kashtakari lokanche interview ghevoon. Grassroot level la apla desh kiti badalala he kalel.

    Liked by 1 person

    1. मुकुंद हिंगणे

      नक्कीच…. असे विषय हाताळायची संधी मिळाली की सुरू करेन 👍👍

      Liked by 1 person