What’s the most money you’ve ever spent on a meal? Was it worth it?
जर तुम्हाला कुणी विचारलं, आजवर जेवणावळींवर तुम्ही सर्वाधिक खर्च केंव्हा केलात ? तो खर्च सत्कारणी लागला का ? तर या प्रश्नाचं एक साधं उत्तर देवून आपण हा विषयच निकाली काढू……खाऊ घातलेलं काढायचं नसतं अन किती खाल्लं हे मोजायचं नसतं. आदरातिथ्य, सरबराई ही तर भारतीय संस्कृती आहे. मी मुद्दामच ‘हिंदू’ संस्कृती म्हणत नाही. कारण पुन्हा हा विषय धार्मिक बनवला जाईल. या मातीचंच वैशिष्ट्य असं आहे की इथं नांदणाऱ्या सर्वच धर्मांमध्ये आदरातिथ्य आणि ‘जेवणावळी’ची संस्कृती भिनलेली आहे. भारतीय जनजीवनात कुठल्याही धर्माचा कुठलाही सण-समारंभ असो, सार्वजनिक उत्सव अथवा धार्मिक विधीचा कुठलाही कार्यक्रम असो, लग्नविधी असो किंवा जल्लोषाचे निमित्त असो….जेवणावळी ह्या झडल्याच पाहिजेत. याउलट फार तर असं म्हणूयात कुठल्याही कार्यक्रमाची उंची, तो कार्यक्रम आयोजित करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेची प्रतिष्ठा ही जेवणावळीत पंक्ती किती उठल्या ? यावरच मापली जात असते. त्यामुळे भारतीयांना what’s the most money you’ve ever spent on a meal ? Was it worth it ? हा प्रश्नच मुळात हास्यास्पद वाटेल. हां, आता अलीकडच्या काळात महागाईने त्रस्त झालेले भारतीय खिश्याचा अंदाज घेवूनच ‘जेवणावळी’वर खर्च करताना दिसतात हे मात्र शंभर टक्के खरं आहे.

प्रत्येक भारतीय माणूस त्याच्या आयुष्यात मिळणाऱ्या सर्वोच्च सुखाच्या क्षणी एकदा का होईना ‘जेवणावळी’चा बेत हा आखतोच. प्रसंगी भलेही त्याला त्यासाठी डोक्यावर कर्जाचं ओझं ठेवायची वेळ आली तरी चालेल. एक दिवसाच्या त्या जल्लोषी आनंदाचे सुख आणि जमवलेल्या भोजनभाऊंच्या गर्दीमुळे त्याला मिळणाऱ्या प्रतिष्ठेपायी तो डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यात आयुष्यातील किमान दहा वर्षे वाया घालवेल. वाया कसले म्हणा ! प्रत्येक महिन्याला कर्जाचा हप्ता चुकविताना मिळालेली ‘प्रतिष्ठा’ जोखण्यात आणखी नवे कर्ज उभारेल, पण ‘जेवणावळीं’ची प्रथा तो मोडीत काढणार नाही. ‘अतिथी देवो भवं’ हीच भारतीय संस्कृती असल्याने दारात आलेल्या आगंतुकाला देखील विन्मुख न पाठवण्याचा शिरस्ता असलेल्या देशात आमंत्रित केलेल्या पाहुण्याला उपाशीपोटी कसे पाठविले जाईल ? कोणत्याही कार्यक्रमाचे यशापयश जर जेवणावळींवर ठरणार असेल तर जेवणावळीला साजेशी भव्यता आणण्यासाठी तो पाण्यासारखा पैसा उधळेल. त्यामुळे जगाच्या पाठीवर निदान भारतीयांना तरी असला फडतूस प्रश्न विचारण्यात काही हशील नाही.

शनिवारवाड्याच्या सज्जावर झडणाऱ्या जेवणावळीत अख्खी ‘पेशवाई’ बुडाली हे जितक्या उपरोधाने आजही बोलले जाते. तेव्हढ्याच अहमिकेने पेशव्यांच्याही चार पावले पुढे जावून हीच नावे ठेवणारी मंडळी पंचपक्वान्नाच्या जेवणावळी घालत असतात. कारण फक्त ‘प्रतिष्ठा’ जपण्याचा सोस अन समाजात जल्लोष साजरा करण्याची रूढ झालेली प्रथा मोडीत निघता कामा नये या अट्टहासापायी भारतीय माणूस जेवणावळींकडे पहात असतो. आज एखादा सार्वजनिक कार्यक्रम साजरा करायचा असेल तर मुख्य कार्यक्रमाच्या खर्चापेक्षा जेवणावळींचा खर्च अधिक असल्याने त्यासाठी सर्वात अगोदर प्रायोजक म्हणून एखाद्या धनिकाची निवड करून त्याच्या गळ्यात हार घालावा लागतो. बरं त्या कार्यक्रमांचे कर्तुमकर्ते दुसरेच असतात. पण जेवणावळी देणाऱ्या प्रायोजकाला अधिक प्रमाणात प्रसिद्धी देण्याची पाळी आयोजकांवर येत असते. अशा कार्यक्रमांचा राजकारणी लोक नेहमीच (गैर)फायदा घेत असतात. बरं यातही ‘लग्नात दुसऱ्याची मुंज उरकणे’ असे प्रकार या प्रायोजकाच्या मर्जीने सुरू असतात. असे बहुढंगी सार्वजनिक कार्यक्रम लक्षात राहतात ते फक्त जेवणावळी आणि त्याच्या प्रायोजकामुळेच हे देखील तेव्हढेच खरे आहे. लग्नाच्या जेवणावळींचा थाट तर काही औरच असतो. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पैपाहुण्या वऱ्हाडी मंडळींना आणि प्रतिष्ठीतांना लग्नविधीचे काहीही पडलेले नसते. लग्न किती शाही पद्धतीचे झाले हे फक्त अक्षता सोहळ्यानंतर दिल्या जाणाऱ्या जेवणावळीवरच ठरते. नवरा-नवरी आणि लग्नघर सोडले तर शुभकालात विधी पूर्ण करण्याची घाई कुणालाच नसते. सगळ्या पाहुण्यांची भोजनगृहाकडे वळण्याची घाई असते. कित्येकदा नवरा-नवरीचे तोंड देखील न पाहता पंक्ती झोडून येणारे भोजनभाऊ वऱ्हाडाच्या गर्दीत मिसळलेल्या असतात.

जेवणावळीत ‘प्रतिष्ठा’ अत्यंत लोभस, रसाळ आणि समाजधार्जिना पदार्थ समाविष्ट झाल्याने उंची पद्धतीच्या जेवणावळी कधी सुरू झाल्या हे देखील भारतीयांच्या लक्षात आले नाही. केळीच्या पानावर सुग्रास शुद्ध सात्विक गरमागरम पदार्थ अन त्यावर साजूक तुपाची धार हा जेवणावळीतील ‘पेशवाई’ प्रकार बाजूला पडून तामसी वृत्तीचे पदार्थ, झणझणीत सामिष पदार्थांचा समावेश झाला. यावर पुढचे पाऊल म्हणजे ‘चांदीच्या ताटात’ वाढले जाणारे ‘शाही भोजन’ हा प्रकार आता पुन्हा नव्याने सर्वमान्य झाला आहे. एरव्ही रोज घरी स्टीलच्या ताटात किंवा अनब्रेकेबल फायबरच्या थाळीत जेवणारी मंडळी ‘शाही भोजनाचे’ आमंत्रण मिळावे म्हणून धडपडताना दिसतात. अशा ‘शाही भोजन’ पंक्तीतून काय जेवलो ? यापेक्षाही चांदीच्या ताटातून जेवलो आणि कुणासोबत जेवलो याचीच ‘पत-प्रतिष्ठा’ मोजण्यास सुरुवात झाली. संप, आंदोलने, मोर्चे असो सोबत जमवलेल्या गर्दीला जेवण हे द्यावेच लागते अशा पंक्ती देखील या जेवणावळीत मोडतात बरं का ! कारण त्यावरच आंदोलनाची यशस्विता आणि नेतृत्वाचा कस तपासल्या जात असतो. आता राहता राहिला दर महिन्याला न चुकता होणाऱ्या मैत्रीतल्या पार्ट्या (जेवणावळी), ह्या मात्र आळीपाळीने यजमानपद भूषवित खर्चाचा आवाका लक्षात घेऊन होत असल्याने सध्या त्या तरी खर्चाच्या मूल्यावर जोखल्या जाताना दिसत नाहीत. कारण दरिद्री मित्र ‘सुदाम्याचे’ पोहे खाणारा ‘कृष्ण’ याच भूमीवरचा..बाकी जेवणावळींचा खर्च आणि त्याची सार्थकता यावर कुणा भारतीयाबरोबर ‘लॉजीकली डिबेट’ करणे म्हणजे महामुर्खपणाच समजावा.

:- मुकुंद मधुकर हिंगणे.
यावर आपले मत नोंदवा