मेरे पास टाईम ही टाईम है…..तुम्हारे पास क्या है..?

My favorite thing’s in life don’t cost any money. It’s really clear that the most precious resource we all have is time. अर्थातच माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टींसाठी मला कधीच पैसे खर्च करावे लागत नाहीत. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आपल्या सर्वांकडे सर्वात मौल्यवान अशी एक गोष्ट असते. ती म्हणजे ‘वेळ’…! आपण तिचा उपयोग कसा करतो यावरच आपला ‘आनंद’ अवलंबून आहे.

अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांची जुगलबंदी असलेल्या ‘दिवार’ या हिंदी सिनेमातील एक प्रसिद्ध संवाद आहे. गेल्या दोन पिढ्यांनी या संवादाचे पारायणे केली आहेत. अमिताभ बच्चन शशी कपूरला विचारतोय,”आज मेरे पास गाडी है, बंगला है, बँक बॅलन्स हैं..!! तुम्हारे पास क्या है ?” यावर शशी कपूर उत्तर देतो,”मेरे पास माँ है !” बस्स या जुगलबंदीवर थिएटरमध्ये एकच कल्ला व्हायचा. शिट्ट्या अन गोंधळात पडद्यावर ‘चिल्लर’ उधळली जायची. भारतीय मनांवर अधिराज्य गाजवणारा हा संवाद आहे. आजकाल या संवादाची जरा वेगळ्या सिच्युएशन वर व्यक्तिगत पातळीवर अनुभूती मी घेत असतो. चोवीस तासातले जवळपास अठरा तास अलर्ट रहाव्या लागणाऱ्या वृत्तपत्रीय नोकरीतून बाहेर पडून लेखनाचा ‘फ्रिलान्स’ मार्ग निवडल्याने आजकाल मला मोकळा वेळ भरपूर मिळतो. अर्थात या मिळालेल्या ‘वेळेत’ही लेखनकार्य सुरू ठेवल्याने बऱ्यापैकी ‘बिझी’ करून घेतले आहे. पण नोकरी थांबवण्याचा निर्णय कसा चुकीचा होता….याबद्दल माझे हितचिंतक मला आडून-आडून वेगवेगळ्या पद्धतीने एकच प्रश्न कायम विचारत असतात. मग सध्या काय करता…? सध्या भारतात विशेषतः मध्यमवर्गीयांच्या जगात हा छळणारा प्रश्न कुणी न कुणी सतत विचारतच असतो. बरं विचारणारा हा काही त्याच्या विवंचनेत धावून जाणारा नसतो. पण जगाची माहिती आपल्याला असावी, या अविर्भावात तो समाधान होईपर्यंत उलटतपासणी घेत असतो. आपण किती ‘कमावू’ आहोत हेच त्याला दाखवायचे म्हणण्यापेक्षा सिद्ध करायचे असते.

आमच्याकडे तर सध्या काय करतो..? या प्रश्नाचं अगदी थेट उत्तर मिळतं. “बस्स….निवांत” असं उत्तर जगाच्या पाठीवर फक्त सोलापूरकरच देवू शकतात. हा प्रांतीय अधिकार फक्त आम्हालाच मिळाला आहे. पण त्यातही एक गोची आहेच. उत्तर माहिती असतानाही हा प्रश्न विचारणारे जगाच्या पाठीवर फक्त सोलापूरकरच असतील. तर अशा शहरात निवांतपणे आपली आवड जोपासण्यासाठी ‘वेळ’ काढणे हा देखील सामाजिक गुन्हाच मानल्या जात असल्याने आपण चार पैसे कमावतो हे दाखविण्यासाठी तरी सतत ‘कार्पोरेट’ अवतारात रहावे लागते. ( कार्पोरेट नोकरी तासाभरात बदलू शकते. एकतर ते आपल्याला डच्चू देतात किंवा आपण त्यांना सोडचिठ्ठी देतो) तर पत्रकारसाहेब म्हणून मिरवायचं सोडून ही काय अवदसा सुचली ! म्हणून आजही माझे अनेक हितचिंतक ‘बळीचा बकरा’ म्हणून माझ्याकडे पहात असतात. ह्याचं कसं भागतं ? हा एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा प्रश्न त्यांना सतावत असतो. एव्हाना डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल असाही अर्थशास्त्रीय अंदाज माझ्यापर्यंत पोहोचविण्याची तसदी घेत असतात. अगदीच काही नाही तर….आता काय त्याचा मुलगा कमावतोय… आता बसून खायचे दिवस सुरू झालेत त्याचे…असेही टोमणे ऐकावे लागतात. या सगळ्यातून विसावा मिळावा म्हणूनच avatibhavati.in हा ब्लॉग सुरू केला. तर लिहितोय चांगला…पण वाचणार कितीजण ? बरं त्यातून पैसे मिळणार आहेत का ? आता यावर चर्चा आणि संशोधन सुरू आहे. त्यावर प्रबंधलेखन पूर्ण झाले की ‘एका ब्लॉगरची कथा’ यावर काहीजण पीएचडी देखील मिळवू शकतील. विद्यापीठांनी मात्र अशा विषयासाठी खास मान्यता द्यायला हवी. म्हणजे माझ्यासारख्या अनेक बोरूबहाद्दरांच्या आयुष्याचे सार्थक होईल. त्यामुळेच मी माझी आवड जपताना त्यासाठी भरपूर वेळ काढतोय..कारण, मेरे पास टाईम ही टाईम है, तुम्हारे पास क्या है..?

:- मुकुंद मधुकर हिंगणे.

Leave a reply to मुकुंद हिंगणे उत्तर रद्द करा.

Comments (

12

)

  1. Umakant Kawale

    छान

    Like

  2. gosavimanik123

    “ह्याचं कस भागत” ?
    ✍️✍️👌👌😀😀

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      बघा की राव 🤣🤣🤣

      Like

  3. Rupali

    MAst lihile aahe. Ya var aapan (bhartiya) tasan tas gappa karu shakto 😊

    Like

    1. मुकुंद हिंगणे

      वोच तो कर रहे हम लोग 🤣🤣🤣

      Like

    2. मुकुंद हिंगणे

      भारत दौरा कधी आहे या वर्षात ?

      Like

      1. Rupali

        May madhe aale hote ani december cha vichar aahe

        Like

      2. मुकुंद हिंगणे

        यावेळी आलात तर पंढरपूर, तुळजापूर दर्शनाचा दौरा आखा…

        Like

      3. Rupali

        Dar velish tharvto ani radda karto 😁

        Like

      4. मुकुंद हिंगणे

        मग आता यावेळी नुसतं ठरवा… रद्द करू नकात.🤣🤣 देव बिचारा वाट पहात असेल कधी माथा टेकवायला येतात म्हणून..

        Like

      5. Rupali

        Hahaha. amchya kade mhantat ki dev darshanala yog lagto. Tyachya manat aale ki aaloch

        Like

      6. मुकुंद हिंगणे

        हो हे मात्र अगदी खरंय. मी तर इतक्या जवळ असूनही गेल्या २५ वर्षात विठ्ठलाचे फक्त तीनवेळा जवळून दर्शन घेतले आहे. योग यावा लागतो…दुसरं काय !

        Like